Print
Hits: 5369

"Once an alcoholic always an alcoholic''
बाप रे! हे मी काय वाचत होते? म्हणजे माझा नवरा आता आयुष्यभर असाच राहणार का? मी आणि मुले आम्ही सर्वांनी आपापल्या इच्छा - आकांक्षा मारूनच जगायच का? १०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. माझा नवरा सखाराम बापट दारूच्या व्यसनात पुर्णपणे गुरफटला होता.

रोज उठून मारझोड, शिव्यागाळी, आरडाओरडा, दारू पिऊन सर्व साधारणपणे सर्वजण जे करतात तेच आमच्याही घरी चालू होते. भरीत बर नोकरी पण गेली. त्यामुळे पैशाची पण टंचाईच. परिस्थितीत पिणं चालूच होतं. तोंडाने मात्र सतत म्हणत असत की “अग मला प्यायचं नाहिये. पण प्यावं लागतच” तेव्हाच कुठेतरी जाणवलं की यांना दारु सोडायची तर आहे पण सोडता येत नाहीये काहीतरी करायला हवं हे कळत होतं पण नेमकं काय करावं उमगत नव्हत आणि नेमकं त्याच वेळी तो रविवारचा सकाळ माझ्या वाचनात आला त्यात “मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची” माहिती आली होती काही व्यसनमुक्त रूग्णांचे अनुभव सुध्दा आले होते आणि माझ्या डोळ्यापुढे आशेचा किरण दिसू लागला. प्रयत्‍न करण्याची दिशा पक्‍की झाली आणि १२ वर्षापुर्वी सखाराम बापटांची पहिली ऍडमिशन झाली.

त्यावेळी पालकांच्या मिटींगच्या वेळी डॉ. अनिता अवचट मॅडमची आणि माझी पहीली भेट झाली. तेव्हा “माझ्या बायकोला ऐकायला कमी येते म्हणून मी दारू पितो” असं सखारामनी मॅडमला सांगितलं होतं घरच्या लोकांचही तेच मत त्यामुळे मलाही तसंच वाटायचं मॅडम म्हणाल्या, “तो काय म्हणतोय त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तुझ्या कानाचा आणि त्याच्या पिण्याचा काहीही संबंध नाही. तु स्वतःला अजिबात अपराधी वाटून घेऊ नको त्यात तुझा काहीच दोष नाही. आमच्याकडे एवढे पेशंट आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बायकांना खूप छान ऐकायला येत तरी ते पितातच.” हे ऐकून मला खूपच धीर आला. मनात म्हटलं, चला, सुरूवात तर छान झाली आपण उगाचच स्वतःला कमी समजत होतो. इथे काहीतरी वेगळ्या पध्दतीने विचार केला जातोय. आपल्याला इथून नक्‍कीच मदत मिळेल.

१२ वर्षापुर्वी वाटलेला तो विश्वास आजही कायम आहे. उलटणार्‍या प्रत्येक दिवसाबरोबर तो आणखीनच दृढ होतो आहे या नंतरची सर्व वाटचाल मुक्तांगणच्या मदतीनेच झाली आहे. व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि उपचारांनी तो बरा होऊ शकतो हि शिकवण मुक्तांगणनेच दिली त्याचबरोबर हा आजार पुन्हा पुन्हा उलटू शकतो हे ही मुक्तांगणनेच सांगितले आणि हा अनुभव तर मी अजूनही घेतेच आहे अजूनही सखारामचे ऑन-ऑफ चालूच आहे परंतु मध्ये २/३ वर्षे व्यसनमुक्तीत गेली. स्वतःचा व्यवसाय सुरू झाला.

परत परत होणार्‍या ऍडमिशनमुळे त्याच्या विचारात फरक पडू लागला. आत्मविश्वास वाढला. आपण पण काहीतरी करू शकतो याचे समाधान मिळू लागले आर्थिक घडीही चांगलीच बसली आहे. मुक्तांगणच्या वारंवार संपर्कात राहिल्यामुळे त्यांचे नैराश्य कमी झाले आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे. कुटुंबात, समाजात मिसळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आपोआपच विचारांची देवाणघेवाण होत आहे. नवीन मित्र मिळतात. जितकं समाजात, नातेवाईकांच्यात मिळून मिसळून वागावे तेवढे व्यसनापासून दूर रहाण्यास मदत होते. जो स्वतःला पुर्णपणे विसरून दारूच्या व्यसनात आकंठ बुडाला होता तो मुक्तांगणच्या मदतीने व्यसनमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागला आहे आपण कोण आहोत, आणि नेमके कशासाठी जगतो आहोत हे त्याला कळायला लागले. बायको मुलांच्या बाबतीत कर्तव्याची जाणीव झाली.

मुक्तांगणची मदत ही काही पेशंटसाठीच नसते, ती त्याच्या नातेवाईकांसाठी सुध्दा असते. मुख्य पुरूष व्यसनात अडकल्यामुळे घराची पार रया गेलेली होती. आमचा सर्वांचाच आत्मविश्वास ढासळला होता. स्वतःला कमी लेखायची सवयच लागली होती. पण मुक्तांगणच्या सल्यामुळे आम्हीपण मनाने खंबीर, कणखर झालो कितीही वेळा आजार उलटला तरी निराश न होता परिस्थितीला तोंड द्यायला शिकणे. जी काही असेल ती परिस्थिती स्वीकारून पुढे जायला शिकलो. आमच्या सर्वांच्यात झालेला बदल हा मॅडमच्या शिकवणीचेच फळ आहे.

मोठ्या मॅडमच्या निधनानंतर छोट्या मॅडम (मुक्ता) पण त्याच विश्वासाने, निर्धाराने काम करीत आहेत. वयाने, अनुभवाने लहान असूनसुध्दा ती चांगल्या प्रकारे काम करत आहे. मुक्तांगणचे सर्वच सहकारी, सल्लागार, मित्र यांच्या सर्वांच्याच मदतीने सखारामचे व्यसनमुक्तीचे प्रयत्‍न चालू आहेत. कोणीतरी लिहिलेले वरील वाक्य सखारामने खोटे ठरवावे हिच माझी मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ईश्वर त्याला तेवढे बळ देवो ही परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.श्री
“नमस्कार माझं नाव सुचित्रा, आणि मी सहचारिणी ग्रुपची एक सकारूड आहे. या ग्रुपशी माझी मैत्री झाली गेल्या दोन वर्षापूर्वी, अर्थातच कारण काय तर नवर्‍याची दारू. नवर्‍याची दारु जेव्हा असह्य झाली तेव्हा माझे हात पाय पूर्ण गळून गेले होते. आता काय करायचं ते सुचत नव्हतं, त्यातच मला मुक्तांगण या संस्थेची माहिती मिळाली.

गंमत तुम्हाला सांगायला हरकत नाही दारू ही समस्या एवढी अंगावर आली होती तरी सुध्दा कुठ तरी ती लपवण्याचा प्रयास सुध्दा मी त्या माझ्या मनाच्या अत्यावस्थ स्थितीत केला होता. जेव्हा लग्न केलं तेव्हा सुध्दा नवरा दारू पीतच होता. तेव्हा वाटलं होत कि मी त्यांच्या आयुष्यात आले की मग तो दारू अजिबात पहाणार सुध्दा नाही. आज या गोष्टीला खूप वर्षे झाली. दारू अधूनमधून चालूच असते मी सहचारीणीत येत असल्यामुळे मी मात्र एक गोष्ट पक्‍की शिकले कि - “माझ्यामुळे तो दारू पितही नाही आणि माझ्यामुळे तो दारू प्यायचा थांबणारही नाही.”

पूर्वी याच गोष्टीचा जास्त त्रास होत होता. प्रत्येकवेळी त्याच्या दारूवर लक्ष केंद्रीत करणे. त्याचे काम त्याने नीट केले नाही तर त्याच्या नोकरीच काय होईल? त्याने नोकरी केली नाही तर पैशाचे गणित कस जमणार? या ना त्या अनेक बाबींमधे मी कळत नकळत फक्त दारू आणि दारूच या विचारांनी बेजार झाले होते. त्यामुळे माझे घर कामात लक्ष नव्हते. ऑफिसचे काम मी नीट करू शकत नव्हते. प्रत्येक गोष्ट करायला घेतली कि ती मनापासून स्वत: न करता दोष मात्र दारूला व नंतर नंतर चुकून दारूड्याला जपायला सुरूवात केली होती. या सर्व विचित्रपणामध्ये मी माझे स्वत:चे जीवन अस्ताव्यस्त केले आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती. माझे स्वत:चे जगणे, हसणे, बसणे, उठणे, बोलणे मी विसरूनच गेले होत. मला स्वत:ला माणसासारखे नीट वागले पाहिजे. मलाही हसता, बोलता येतं आणि ते मला करायच आहे याची जाणीव मला बर्‍याच वर्षानंतर मुक्तांगणच्या गुरवारच्या पालक सभेत प्रथम झाली.

सहचारिणी ग्रुपला आल्या मुळे डोक्यावरचे जुने ताण बोलून मोकळे केले गेले आपल्यासारख्याच समस्येतून जाणार्‍या आपल्या बर्‍याच मैत्रिणी आहेत. एका समान पातळीवर राहून आम्ही सर्वजणी आमच्या समस्यांवर आशादायक विचारांची देवाण घेवाण करून एक आदर्श मार्ग काढू शकतो हे धैर्य मला सहचारिणी मुळे आले.

मद्यपाश हा आजार आहे त्या दृष्टीने त्याच्याकडे पहाणे, मद्यपीला बदलण्याची धडपड सोडून स्वत:त बदल करणे, दृष्टीकोनांच्या या मानसिक आजारांची शिकार झाले आहे याचे मला भानच नव्हत.

प्रार्थनेचा अर्थ पूर्ण लक्षात घेवून कोणत्यावेळी प्रार्थनेतील कोणता भाग मी आचरणात आणू शकते याचा प्रयत्‍न हळूहळू करते. प्रत्येकवेळी १०० टक्के यश जरी आले नाही तरी प्रगतीच्या वाटेकडे जाणारे आपले पाहिले पाऊल फार भारदस्त वाटू लागते यातूनच स्वत:वर प्रेम करण्याचा एक उपक्रमही मी शिकले.

पूर्वी घरात दारू असताना दोन्ही बाजूंनी संघर्ष होत असे आता मात्र एका बाजूचा संघर्ष मी बर्‍याचदा टाळू शकते त्यावेळी गप्प बसणे, प्रार्थना आठवणे फार त्रास वाटला तर थोडा वेळ बाहेर जाऊन येणे असे प्रयोग करून मागचे उगाळत न बसता पुढचे फार विचार न करता आताच आलेला प्रसंग पण मी जगू शकत आहे याचे श्रेयही सहचारिणीचेच आहे.

सहचारिणी ग्रुपमुळे मला बर्‍याच गोष्टींमध्ये विचार करण्याची सवय लागली असून तडकफडक निर्णय न घेता मला दुसर्‍याच्या मदतीचा हात मागता येवू लागला आहे. सहचारिणीत येत राहिल्यामुळे माझ्या मनातील खूपशा वाईट विचारांना बाहेर काढून त्याची जागा चांगल्या विचारांनी घेण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे बँकेतील कर्ज भाग संपत चाललाय आणि जणू माझी ठेव वाढत चालली आहे असे मला रोज जाणवते. याचे सर्व श्रेय मी मुक्तांगण व त्यातील सहचारिणी ग्रुप यांना देते.

आदराच्या जाणिवेने पाहू वर्तमानाकडे।
दुखदु:खाच्या संगतीत धरू दानाचे हे कडे
एकटी नाहीस आता चालू सहचारीणीच्या वाटेकडे॥

लहानपणापासून एका चांगल्या सुसंस्कृत घरात मी वाढलेली. माझं लग्नसुध्दा एका सुशिक्षित सुसंस्कृत/माझ्या निवडीच्याच मुलाशी झालं. त्यामुळे अल्काहोलिझम नावाचा प्रकार माझ्या आयुष्यात येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हत. व्यसन म्हणजे काय? हेही मला माहित नव्हतं. कधीतरी सिनेमात किंवा रस्त्यावर पडलेला एखादा माणूस इतकंच काय ते व्यसनाबद्दल माहिती होत त्यामुळे मद्यपाश ह्या रोगाने माझं आयुष्य जेव्हा ढवळून निघालं, तेव्हा मी हतबुध्द झाले. योगायोगाने मुक्तांगणची माहिती मिळाली आणि आम्ही मुक्तांगणमध्ये आलो. सुरूवातीला मी ज्यावेळी अल ऍनॉनला जायला लागले. त्यावेळी मी फार बुजले होत. माझी मला लाज वाटत होती. गेल्या जन्मी मी काहीतरी पाप केलय म्हणून मला इथे यावं लागतयं, अशीच माझी भावना होती. सगळं जग माझ्याकडे विलक्षण नजरेने पाहातय असे मला भास होत असतं. मी विलक्षण घाबरलेल्या मन:स्थितीत होते. सातत्यानं माझं अंग आक्रसलेलं असायचं, त्यामुळे माझी अतिशय पाठ दुखायची. अगदी जवळच्या नातेवाईकांनी दिलेली मदत घेताना कुठेतरी आत आत शरम वाटायची. माझ्यावर आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याचं आकलन मला होत नव्हतं. मुलांकडे माझ अजिबात लक्ष नव्हतं. मुलं त्यांचा आत्मविश्वास पूर्ण गमावून बसली होती. अभ्यासात मागे पडली होती. धाकटा तन्मयची चिडचिड फार वाढली होती. माझं तो काहीही एकत नसे. दोन्ही मुलांमधील एकमेकांची भांडण पण फार वाढली होती.

माझं माझ्या स्वत:कडे पण अजिबात लक्ष नव्हतं. कुठल्याच कामामध्ये माझं मन नव्हतं. सगळीकडे शारीरिक उपस्थिती फक्त असायची. मनाचा शांतपणा कुठेतरी हरवलेला होता.

मला कुठल्याही सार्वजनिक समारंभात जायची भीती वाटायची. आत्मविश्वासाचा अभाव प्रत्येक ठिकाणी जाणवायचा. एक प्रकारची न्यूनगंडाची भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. या सगळ्या प्रसंगामधून जात असताना ‘सहचरी’ या संस्थेचा परिचय मला झाला. माझ्यावर आलेल्या या दुर्धर प्रसंगाला सामोरी जात असताना सातत्याने, दर सोमवारी मी मुक्ता मॅडमना भेटत होते. त्यांच्याशी बोलत होते. त्यांनी सांगितले म्हणून ‘सहचरी’ च्या मिटिंगला मी जायला लागले.

प्रथम जाताना मी फार बुजले होते. मला स्वतःला दोषी समजत होते. पण जसजशी मी त्या मिटींग्जना जायला लागले, तसतसं हे भीतीचं सावट हळूहळू निघून जायला लागलं. सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तिथे गेल्यावर समजली, ती म्हणजे मी सुध्दा वागताना खूप खूप चूकत होते. माझ्या वागण्याचा अर्थ लावायला मी तिथे शिकले त्यावर विचार करायला शिकले. विचार करण्याची प्रक्रिया मी विसरूनच गेले होते.

माझ्या जवळच्या मैत्रीणी, नातेवाईक, अगदी जवळचे नातेवाईकसुध्दा मला ‘बिच्चारी’ म्हणायचे. मला या सगळ्या गोष्टी आवडायच्या नाहीत. त्याच्या नजरा मला टोचायच्या. मग माझी खूपच चीडचीड व्हायची. अतर्क्य गोष्टींवर मी विश्वास ठेवायची म्हणजे अमुक एखादी साडी नेसले तर तो दिवस अतिशय वाईट जाणार, अशी अटकळ मनामधे बांधली जायची.

किंवा कधी कधी मी स्वतःला खूप ग्रेट वगैरे पण समजायची. मी म्हणूनच एवढं सगळं खंबीरपणे सहन करत्येय असही मला वाटायचं. पण ‘सहचरी’ मध्ये आल्यावर या सगळ्याच कल्पनांचा भ्रमनिरास झाला. एकतर संबंध जगात असा प्रसंग आलेली मी एकटीच नव्हते, हे मला तिथे गेल्यावर समजलं माझ्यासारख्याच अनेकजणी तिथे आलेल्या होत्या प्रत्येकजण त्यांच्यावर आलेल्या प्रसंगातून खंबीरपणे उभं राहून मार्ग काढून होत्या.

सगळ्याजणी आपआपल्या अनुभवांनिशी बोलत होत्या. संवाद साधत होत्या. त्या संवादातून वेगवेगळ्या गोष्टी मला मिळत गेल्या. माझ्या स्वतःशी मैत्री करण्याची प्रक्रिया ही अशी संवादामुळे सुरू झाली. प्रत्येक वेळी मला माझ्या चुका नव्यानव्याने दिसायलाे. मुलांशी नव्याने संवाद साधायला शिकले, वेगवेगळ्या विषयावर मी मुलांशी गप्पा मारायला लागले. खूप वेगवेगळी प्रदर्शने, त्यामध्ये बॉन्साय, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग्ज, पुष्परचना, सिरॅमिक अशी ठलागल्या. प्रत्येक मिटिंगच्या वेळी माल धक्केच बसत होते. मला नव्या नव्याने माझी स्वत:ची ओळख होत होती. दिवसेंदिवस मी आनंदी होत होते. माझ्या स्वत:च्या वागण्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करत हो्रदर्शने आम्ही एकत्रितपणे पाहिली.

‘सहचरी’ मध्ये येणार्‍या सगळ्याच जणी नव्या दमाने उभं रहायचा प्रयत्‍न करीत असतात. एखादीचे अनुभव अगदी मनाच्या तळाशी जाऊन भिडतात. एखादी अनुभव सांगत असताना आम्ही उरलेल्या सार्‍याजणी तो अनुभव जगत असतो.

मद्यपाश या रोगाची खरी ओळखसुध्दा इथेच आली. मुलांशी गप्पा मारत असताना, त्यांनाही बोलता बोलता मद्यपाश हा एक रोग आहे. हेही समजावून सांगितलं. त्यामुळे वडिलांबध्दल त्यांच्या मनात कुठलाही किंतू नाही. मुळातच त्यांना आपल्या वडिलांविषयी प्रेम आहे, पण या कारणामुळे त्यांनी वडिलांचा तिरस्कार करू नये असं मला फार वाटायचं, त्यासाठी मी सातत्याने त्यांच्याशी गप्पा मारल्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणून माझ्या मुलांच्या मनात वडिलांबद्दल अजिबात तिरस्काराची भावना नाही.

हे सगळं होत असताना माझ्या नवर्‍या समोर राहून या सगळ्याला फार मोठा हातभार लावला. तो जसजसा दारूपासून लांब गेला, तसतसं आमच्यामधले वाद संपायला लागले एक चांगलं सहजीवन आम्ही जगू लागलो आहोत.

दारू पिणं अथवा न पिणं हा माझ्या नवर्‍याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही हे सुध्दा मला आता नक्की - सुचित्रा

मी सौ. रेखा राजीव जोशी माझे लग्न १९८२ साली झाले. तेव्हा व्यसन हे काय असते? हे मला ठाऊक नव्हते कारण माझ्या वडिलांना, भावाला व्यसन नव्हतेच २-३ वर्षांनी संध्याकाळी ऑफेसमधून घरी आल्यावर मला ते म्हणाले की, आज मला पार्टीला जायच आहे. रात्री घरी यायला उशीर होईल. मला पार्टी हा शब्द सुध्दा माहित नव्हता. त्यादिवशी रात्री घरी आल्यानंतर ते हॉलमध्ये झोपले.

त्यानंतर ५ वर्षाच्या अंतराने आमची घोडेगाव व नंतर वडगाव येथे बदली झाली आणि तेथे त्यांचेप्रमाण वाढले आणि माझ्या अशा भोळसट स्वभावामुळे मी त्यांना यावर बोलू शकले नाही.

गेली १८ वर्षे ते पीत आहेत. अशा पिण्याचा प्रकृतीवर परिणाम दिसू लागल्यानंतर मुक्तांगणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना उमगले शेवटी ६ महिने त्यांच्या मनाची तयारी करत २२ एप्रिल १९९९ रोजी त्यांना मुक्तांगण ला ऍडमिट केले. तेथील पालकसभा, सौ. मुक्ता मॅडलचे बोलणे, मा बाबांचे विचार या सर्वांचा प्रभाव पडून दारू हा एक केवळ आजार आहे हे आम्हाला पटले.दारूकडे एका आजाराच्या दृष्टीकोनातून बघा आधी स्वत: बदला मग दुसर्‍यास हे मल पटले. आणि मी माझ्या एगोइस्तिच स्वभावाला आवर घालून माझ्यात बदल केला फक्त त्यांना या व्यसनाच्या जीवघेण्या विळख्यातून बाहेर काढायचे हेच ध्येय ठेवले.

या सर्वात आम्हाला त्याचीही खूप मदत झाली. त्यांनी मला सर्पोट केला. त्यानंतर कॉन्सलिंग सेंटर वरील ग्रुप मिटिंग, मॅरेज कॉन्सलिंग मिटिंग, सहचरी सभा मी त्यांच्या बरोबर केल्या. वेळोवेळी मुक्तांगण ची मदत घेतली. अशा तर्‍हेन ८ महिने आमच्या संसाराची गाडी सुंदर धावत होती. पण २७ जानेवारी हा दिवस काहीतरी वेगळाच उजाडला. सायंकाळी ६ वाजता मला फोन आला की मी शनिवार वाड्यापाशी थांबलेलो आहे आणि प्यायलेलो आहे अशा वेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काय करावे काही सुचेना. पण मी न खचता न चिडता त्यांना समजून सांगितले पण ते म्हणाले की मला प्यायचे होती मी प्यायलो पण आम्ही त्या रात्री त्यांना काही बोललो नाही. पण नंतर त्याना कितीतरी समजावून देखील सुध्दा त्यांनी आमचे ऐकले नाही. याचा त्यांना त्रास होऊन दोन Attack सुध्दा येऊन गेले. पण एवढे होऊन सुध्दा ते ऐकेनात हे पाहून आम्ही मुक्तांगणच्या सल्लागारांचा आम्ही सल्ला घेतला. आणि आज मी परत त्यांना १५ दिवसांच्या ट्रिटमेंट साठी ऍडमिट केले आहे. हे सर्व घडले तरी मी न घाबरता या सर्व गोष्टींना तोंड दिले कारण माझ्या पाठीमागे मुक्तांगण संस्था उभी आहे.

व्यसन हा एक आजार आहे हे मी मान्य केले आहे, स्वीकारले आहे आणि या आजाराशी लढण्याची ताकद मी मुक्तांगण कडूनच घेतली आहे.
सौ. रेखा राजीव
प्रफ़्फ़ुल मोहिते ९८२२६६९२०४
मुक्तांगण व्यसनमुक्ती सल्ला केन्द्र.