Print
Hits: 8670

क्रोधाला ओळखणे व त्यातून बाहेर येणे
व्यसनापासून लांब राहण्याच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण निराश किंवा क्रोधितही होतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत असेच वाटत असते की आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. पण राग येण्यासाठी ही बंधने नसतात. राग कोणावरही आणि कधी ही येतो. राग ही पूर्णतः सर्वसामान्य मनुष्याची भावना आहे. पण जेव्हा हा राग आवाक्याबाहेर जातो त्यावेळेस समस्या तयार होतात. आपल्या वैयक्तिक नातेसंबंधात तसेच आपल्या आयुष्याच्या पुढील मार्गक्रमणातही समस्या निर्माण होतात.
ही गोष्ट आपल्याला विचलित करू शकते.

एकदा एका गावामधे एक मुलगा रहात होता. तो सतत क्रोधित अवस्थेतच असायचा. छोट्या छोट्या गोष्टीत उदास व्हायचा. कधी कधी तर इतरांशी खेकसूनही बोलायचा. त्याच्या वडलांनी एकदा त्याला खिळे आणि हातोडी दिली व सांगितले जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा खिळा भिंतीला ठोकायचा. मुलाने प्रत्येकवेळी राग आल्यावर खिळा ठोकायला सुरवात केली. बराच वेळा खिळा ठोकताना त्याच्या हाताला ईजा होत असे. जेव्हा त्या मुलाने पाहिले की भिंतीवर खूप खिळे ठोकले गेले आहेत तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या रागाचे प्रमाण भरपुर आहे. यावर काही तरी उपाय करावा असेही त्याला वाटू लागले.

काही दिवसांनी तो वडलांकडे आला. वडील त्याला म्हणाले,"तू यातून काय शिकलास?". मुलगा वडलांना हात दाखवत म्हणाला, "मी विनाकारण रागाच्या भरात माझ्या हाताला ईजा करून घेतली याचा अर्थ रागामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. वडिलांनी त्याला भिंतीवरचे खिळे काढून आणायला सांगितले. मुलाने खिळे काढून आणल्यावर वडिलांनी भिंतीकडे बोट दाखवत विचारले," तुला काय दिसतय". त्यावर मुलगा म्हणाला," भिंतीवर खुप भोक पडली आहेत". लागलीच वडलांनी सांगितले की, "बघ आपल्या रागामुळे फक्त आपलेच नाही तर इतरांचेही नुकसान भरपूर होते. इतरांनाही ईजा होते. क्रोधाने नातेसंबंध संपूष्टात येतात, दोन व्यक्तींमधील विश्वास संपतो, चांगले विचार मरतात आणि आपण स्वतःही विचलित होतो.

ज्या व्यक्तींना क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही असे लोक पुढे आपल्या जवळील नातेसंबधीतांनाही शिवीगाळ करु शकतात. रागावर नियंत्रण नसणा-या पालकांमुळे मुलांवरही परिणाम होतात. सतत क्रोधित राहणा-या व्यक्तींमुळे त्यांच्या सहवासातले इतर लोकही आक्रमक होऊ शकतात.

आपण क्रोधित झालो असल्याचे आपल्याला कधी जाणवते? जेव्हा आपण आरडा ओरडी करतो तेव्हा, जेव्हा आपण एखाद्याला मारहाण करत असतो तेव्हा, किंवा आपण वस्तुंची फेकाफेक किंवा मोडतोड करतो तेव्हा.

"मी संतप्त झालो आहे. मी तुझा तिरस्कार करतो. मला तू आवडत नाहीस... असे वाटते की तुझा सर्वनाश करावा?

जेव्हा आपण असे काही शब्द वापरतो तेव्हा खरतर आपल्यात खदखदत असलेला रागच बाहेर पडत असतो. ब-याचवेळा असही होत की आपल्याला एवढा भयंकर राग आलेला असतो की इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. आपल्या नकळत आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेऊ लागतो. आपल्या उपचारानंतर आपण आपल्या व्यसनापासून दुर असतो. आपल्याला व्यसनामुळे ज्या कचेरीतून कमी करण्यात आले होते त्याठिकाणी आपण पुन्हा रुजू होण्यासाठी जातो. आपण आशा धरून ठेवतो की ते त्वरीत रुजू करून घेतील. पण तसे होत नाही. ते आपल्याला उद्या या, पुढच्या आठवड्यात भेटा असे सांगतात, आणि हे असे सुरुच राहते. एकदिवस ते आपल्याला कुत्सितपणे सांगतात की आम्ही आपणास ठेऊन घेऊ शकत नाही. आपली निराशा होते. कामावर घ्यायचे नव्हते तर मग मला इथून तिथे फे-या का मारायला लावल्या? हे आधी सांगू शकत नव्हते का? आपल्याला यागोष्टीचा त्रास होतो, आपले मन दुखविले जाते.

थोड्यावेळाने हे कळते की आपले मन दुखवल्यापेक्षाही रागाची तिव्रता जास्त झालेली आहे. तो राग इतरांवर व आपल्या स्वतःवरही येत राहतो.

आपण हे सर्वकाही आपल्या जवळच्या मित्रांजवळही बोलू शकतो,"मी इतका निराश झालो आहे की मला आत्महत्या करावीशी वाटते". जेव्हा तो मित्र विचारतो,"तु रागावला आहेस का?" आपले नेहमी हेच उत्तर असते की," नाही, मी फक्त उदास झालो आहे." त्यावेळेस खरतर आपणास सर्वकाही हातून निसटल्यासारखे, सर्व आशा संपुष्टात आल्या सारखे वाटत असते. भविष्यातही ही परिस्थिती बदलेल अशी चिन्ह आपणास दिसत नाही. अशावेळेस आपण जर आपल्या आत झाकून पाहिले तर दिसून येते की आपण स्वतःवरच जास्त नाराज झालेलो आहोत.

शांत राहून नाराजी व्यक्त करणे हाही एक रागाचाच प्रकार आहे. यात आपण निष्क्रिय व शांत रहातो. आपल्याला जरी एखाद्या व्यक्तीवर नाराजी किंवा राग व्यक्त करायचा असेल तरी आपले तोंड उघडत नाही किंवा आपल्याला तशी हलचालही करता येत नाही.

रामु म्हणतो," जेव्हा माझी पत्नी ओरडते, मी गप्प रहातो. मी माझ्या समोरासमोर व्यक्त होणा-या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे. पण आतमध्ये माझ्यातला असंतोष खदखदत असतो. मी मान्य करतच नाही की मला राग आलेला आहे. मी राग न आल्याचा अभिनय करु लागतो".

जेव्हा रामु तो राग गिळत असतो त्याचा राग संपुष्टात येते नाही. तो सुप्त ज्वालामुखी सारखा बनत जातो. कधी ना कधी त्याचा उद्रेक हा होणारच असतो. असा राग गिळणे म्हणजे ऍसिडने स्वाभिमानावर केलेला शिडकावाच असतो अशावेळेस आपणास व्यसन हाच एकमेव मार्ग असल्याचे जाणवू लागते.

विक्षिप्तपणे किंवा कुत्सितपणे व्यक्त केलेल्या भावनाही रागाच्याच असू शकतात.
एकदा मी घरी आलो तेव्हा पाहिले की माझ्या पत्नीने रात्रीच्या जेवणासाठी दही-भाताशिवाय काहीच बनवलेले नाही. जेव्हा तिने जेवण वाढले तेव्हा मी हसलो आणि म्हणालो, "रात्रीच्या जेवणासाठी काय झक्कास जेवण तयार केल आहेस मला आधी माहित असते तर माझ्या काही मित्रांनाही जेवणाला बोलावले असते नाही का".

आपली ही अजून एक खूप मोठी समस्या असते. अशी प्रतिक्रिया राग या प्रकारातली दिसत नाही पण ती रागाचीच असते. याचे कारण आपण स्वतःला दुर्दैवी, कमनशिबी मानत असतो. आपले कुटुंबिय, आपले मित्र, आपले सहकारी आणि संपूर्ण जगच आपल्या जे पाहिजे आहे, जसे पाहिजे आहे, ज्याची आपल्याला गरज आहे व आपली जी इच्छा आहे ते देऊ शकत नाहीत असे वाटत असते. कधी कधी तर आपल्या मागण्या, इच्छा योग्य आहेत किंवा नाही याचा विचारही करत नाही आणि त्यापूर्ण न झाल्यामुळे राग मात्र येतच असतो. आपले आयुष्य इतरांप्रमाणे नाही याची वारंवार खंत वाटत असते. आपण या जगातील क्रुर व्यक्तींच्या कटात फसलेलो आहोत असे वाटत असते. तसेच आपला नशिबावर फारच भरोसा असतो किंवा दोष द्यायला एक चांगले कारण मिळालेले असते. फक्त कमनशिबीपणा माझ्या वाट्याला आणि चांगले नशिब फक्त इतरांच्या वाट्याला आले असल्याचे वाटत असते.


आपण कोणाला दोष देतो?
जे आपले हातातले आहेत त्यांनाच. पालक, पत्नी, पाल्य, हाताखालचे सहकारी.
लपलेल्या भावनांचे विचलित प्रकटीकरण हे शरीराची त्यातली प्रतिक्रियाच असते. आपल्यातल्या ब-याच लोकांना डोकेदुखी, मानेत दुखणे, शरीरास जडत्व येणे असे त्रास होतात.

याच रागाच्या भावनेच्या प्रकारात स्वभाव आत्मघातकी बनत जातो, अपघात घडण्याच्या शक्यता अधिक असतात. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण दरवाज्याला जोरात धडका देतो, मोटारकार चालवत असताना जोरजोराने हॉर्न किंवा भोंगा वाजवतो, आपण इतक्या वेगाने गाडी चालवतो की कधीही अपघात होऊ शकतो.

उदाहरणार्थ, एकदा मला दुरदर्शनवर क्रिकेटचा सामना बघायचा होता. पण माझ्या वडलांनी मला त्याऐवजी भिंतीवर चित्र टांगण्याचे काम सांगितले. मला खुपच राग आला होता. चित्र टांगण्यासाठी खिळा ठोकताना मी हातोड्याचा जोरदार ठोका दिला. तो खिळ्यावर न बसता माझ्या बोटांवरच बसला. मी माझ्या रागाला ओळखू शकलो नाही.
राग हा वेगवेगळ्या बदलत्या स्वरुपाचा कधी सहज ओळखता येऊ शकणारा तर कधी न ओळखता येणा-या स्वरुपाचा असू शकतो. राग हा आपल्या भाषाशैली, क्रिया किंवा प्रतिक्रियांमधून प्रकट होत असतो.

आपणास यामुळे वेदना व दुःख येऊ शकते, यामुळे आपल्याला व इतरांना दुखापत होऊ शकते तसेच नैराश्यही येऊ शकते.
लपवलेला किंवा सुप्त राग, क्रोध.

भावना
निराशा
नैराश्य
गप्प नाराजगी
स्वतःला कमनशिबी मानणे, स्वतःचे समर्थन

भावना प्रकट करण्याची पद्धत.
मी उदास आहे
माझे मन विस्कळीत झाले आहे.
मला आत्महत्या करावीशी वाटते.
माझी मरायची इच्छा आहे.
(गप्प)
हं हुशार आहेस
(विरुद्धाअर्थी)
बिच्चारा मी
मी एकटाच सहन करतोय.

शाररिक लक्षणे
डोकेदुखी
कडकपणा येणे किंवा आखडणे
भूक मरणे
झोप न येणे
प्रत्येक क्षणी ताण जाणवणे

मानसिक लक्षणे
एकाकीपणा
नैराश्य
गरज नसलेले युक्तीवाद करणे
समाजापासून किंवा समूहापासून एकटे दुर राहणे
गप्प विचारात मग्न राहणे

स्वभाव लक्षणे
शाब्दिक शिविगाळी करणे
हिंसक
व्यसनाकडे वळणे

आपण एवढे रागीट का आहोत?
लवकर व सरळसोटपणे राग येण्याला दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे आपण आपल्यात खूप राग साठवून ठेवतो. याला फक्त थोडीसे उत्तेजन भडकण्यासाठी पुष्कळ असते. आपल्या आयुष्यात निराशा करणारे खूप अनुभव आपण घेतले आहेत आणि अशावेळी आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी सभोवताली फिरताना कारणच शोधत राहतो.

दुसरे कारण म्हणजे बराच काळापासून आपण पाहिले आहे की रागामुळे बरेच काही साध्य होते. आपत्तीकालीन परिस्थितीत याचा आपण शस्त्र म्हणून वारंवार वापर करतो. हळुहळू आपला मुळ स्वभावात रागिटपणा येतो. आपला इतरांशी सर्वसाधारणपणे वागतानाही विक्षिप्तपणा येतो.

आपल्याला व्यसनमुक्त झाल्यावर पूर्वावस्थेत येताना ब-याच समस्या येतात त्यांना आपण सामोरे जातो. कधी कधी आपल्याला घरी परतण्यास उशिर होतो. घरी पत्नी चिंता करत असते. त्यावेळेस ती वेगळयाच प्रकारे वागते. यात आपल्यावर विश्वास नाही असा भाग नसतो. कदाचित ती अशावेळेस काही प्रश्न विचारणारही नाही. पण तिला आपली चिंता असणे सहाजिकच आहे. संभाषणात उडणारे खटके आपल्याला क्रोधित करतात.

कधी कधी खुले संभाषणही होतात जसे,"तू मला कित्येकवेळा फसवले आहेस. तू पुन्हा व्यसन करणार नाहीस यावर मी विश्वास कसा ठेऊ? ती आपल्याला जबाबदारी देते पण ती आपण पूर्ण करु असा विश्वास मात्र ठेवत नाही. ती प्रत्येक गोष्टीत पाठलाग करत राहते. आपण पाहतो की आपली मुल जो मान आपल्याला द्यायची तोही आता देईनासे झाले आहेत. आपण वारंवार प्रयत्न करुनही मुले समस्या सोडवण्यासाठी आपल्या आईकडेच जातात. अशी सर्व परिस्थिती आपणास रागाच्या भावनेकडे नेते. तरीही हा राग आपल्याला व्यक्त करता येत नाही व त्याचा संचय होण्यास सुरवात होते.

याच्या तात्पर्यात काय घडते?
आपण अगदी लहान मुलांप्रमाणे वागतो. त्यांच्याप्रमाणेच भावना सांभाळण्याचा प्रयत्न करतो. लहान मुले वारंवार रडतात आपण रडू शकत नाही पण वारंवार व्यसनाकडे वळतो. आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही व आपण अतातायीपणा करू लागतो. ही परिस्थिती व्यसन केल्याने बदलेल असा विचार आपण करु लागतो. एवढ्या काळात आपल्याला कळते की रागाने काही साध्य होत नाही. आपल्या मनातील या भावनेला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक मार्ग दिला पाहिजे.

आपण रागाची हाताळणी कशाप्रकारे करु शकतो?
रागावर नियंत्रण करण्याचे उपाय सोपे नसतात. याची कोणतीही साचेबद्ध योजनाही नसते. आपल्यालाच हे ग्राह्य धरावे लागते की या रागाच्या भावनेमुळे आपण व्यसनाकडे पुन्हा वळू शकतो.

आपल्याला राग येत असल्यास त्याला ओळखा.
आपल्या रागाला हाताळताना पहिली पायरी म्हणजे आपल्याला राग आल्याचे ओळखून स्वतः या गोष्टीचा स्विकार करणे. अशा जागरुक राहण्याने येणा-या रागाची तीव्रता पूर्वीच्या मानाने भरपूर कमी असते. जर आपणास ताण जाणवत असेल व त्याचे कारण शोढण्यात आपण असमर्थ ठरलेलो असल्यास रागाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे व्यक्त करा. कारण त्याविषयी आपण जागृक राहणे लगेचच शक्य होत नाही.

जर आपण निराश असाल तर स्वतःला येणा-या रागाचे कारण आपल्याच मनाला विचारावे. जो पर्यंत आपण रागाला व्यवस्थितपणे ओळखत नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहणे अनिवार्य आहे. जर आपणास सर्वकाही कंटाळवाणे, मन दुखावलेले परिस्थिती असल्यासारखे वाटत असेल तर स्वतःला पुढील प्रश्न विचारावे.

मी कोणत्याही गोष्टीवर रागावलेलो आहे का?
मी ह्या परिस्थितीला तोंड देण्यास घाबरत आहे का?
आपल्या हे लक्षात राहिले पाहिजे की राग हा क्वचितच न परवडणारा असतो पण याचा अर्थ असा नाही की तो निघून जात नाही. राग म्हणजे भावनात्मक प्रतिक्रिया असते आणि ही भावना आहे याविषयी जागृक राहण्यानेच तिव्रता कमी करता येते.

रागाच्या भावनेचा उगम शोधणे.
एकदा का आपण आपल्या रागाला ओळखायला शिकलो की आपणास वेगवेगळे मार्ग सुचत जातात. त्यानंतर लक्षात येते की मूळ समस्या रागाचा उगम जेथून होतो तिथे आहे.

जसे आपण आपल्या वरीष्ठांवर त्यांनी दिलेल्या वर्तणुकीमुळे रागवलेले असतो. पण त्यांना तशी प्रतिक्रिया देता येत नाही म्हणून तो राग मनामधे तसाच घेऊन आपण घरी येतो. तो राग आपल्या पत्नीवर व्यक्त होतो. चहा कॉफी आणण्यासाठी काही मिनिटांचा उशिरही त्यासाठी पुरेसा असतो.

जर आपण कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की हा राग आपल्याला दुस-या ठिकाणी व्यक्त करायचा होता. म्हणजेच हा राग जागाही बदलत राहतो.

आपला राग हा खरा आहे किंवा योग्य आहे किंवा नाही हे ओळखणे.
उदाहरणार्थ, जेव्हा माझ्या पत्नीने दुपारच्या जेवणात काय करु असे विचारले असता, काहीही चालेल असे मी सांगितले. तिने दुपारच्या जेवणात कोरड्या चपात्या बनवल्या म्हणून मी तिच्यावर धावून गेलो तिला ओरडलो," तुला पु-या बनवता आल्या असत्या तरीही तू मला न आवडणा-या चपात्या केल्या". त्यावर पत्नी म्हणाली," मी तुम्हाला आधीच विचारले होते. मी बनवून झाल्यावर आता तुम्ही ओरडत आहात."
हे संभाषण चालत राहिले व मी जेवण न जेवताच वेळ काढली.

अशा प्रसंगांमधे राग येणे सहाजिकच आहे पण आपल्याला कळाले पाहिजे की आपला हा राग खरा व योग्य नाही आहे. जर माझी काय अपेक्षा आहे हे मी पत्नीला सांगितलेच नसेल तर तिच्यावर राग काढणे कस योग्य ठरु शकेल.

रागाचा ख-याने सामाना करा.
जर आपण आपल्या रागाला ओळखलेच नाही किंवा त्याला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक मार्ग दिला नाही तर आपली अवस्था प्रेशर कुकर सारखी होऊ शते. कुकर मधे ज्याप्रमाणे वाफ निघून जावी म्हणून मार्ग केलेला असतो त्याचप्रमाणे आपल्या रागालाही बाहेर पडण्यासाठी जागा करणे आवश्यक आहे. जर वाफ जाण्यासाठी जागा केलीच नसती तर आतला दाब वाढत जाऊन कुकर फुटून त्याचे तुकडे पडू शकतात त्याचप्रमाणे आपला उद्रेक थांबवण्यासाठी भावना निघण्याकरीता वाट तयार करणे अपरिहार्य आहे.

अशी सुरक्षिततेसाठी जागा बनवणे शक्य आहे का?
संपूर्ण आराम, विश्रांती करणे हे रागिष्ट माणसाला फायदेशीर ठरु शकते. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे शांतता व संतुलित राखण्यास मदत मिळते ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे. दिवसातून एकदा तरी अशा गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रतिक्रिया देणे ताबडतोब थांबवावे. जेव्हा आपण रागात असू तेव्हा आरडाओरडी न करता त्याची तिव्रता कशाप्रकारे कमी करता येईल याचा सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

राग खूपच उर्जा तयार करत असतो. याची साचेबद्ध बांधणी केली पाहिजे. रागापासून मुक्त होण्यासाठी शाररिक हलचाली हे चांगले माध्यम ठरु शकते. अशा उर्जा प्रत्युर्जीत करण्यासाठी मैदानी खेळ, बागकाम करणे किंवा आपल्या घरात स्वच्छता ठेवायला हातभार लावणे हे चांगले पर्याय ठरु शकतात.

या प्रयत्नांनंतर आपण संवाद साधण्याच्या अवस्थेत यायला लागतो. आपल्या कुटुंबियांशी चांगले संवाद साधल्याने,त्यांच्या गोष्टी समजून घेतल्याने आपला स्वभाव मनमोकळा होण्यास मदत होईल. जर पती पत्नी आपल्या भावना व्यक्त न करता साठवून ठेवत असतील तर पुढे संवादातही समस्या निर्माण होऊ शकतात व एकामेकांच्या समस्या, भावनांना समजून घेता येणारच नाही.

आपण आपल्या रागासंबंधी संवाद कसा साधू शकतो?
व्यसनातून बाहेर पडल्यानंतर पूर्वस्थितीत येताना ब-याच समस्यांना सामोरे जावे लागते. आपली बाजू व्यवस्थित मांडता न येणे ही आणखी एक समस्या आपल्या समोर असते. अशावेळेस आपण अतिउच्च पातळीवर जाऊन वागायला लागतो, रागाच्या भरातील ही वर्तणूक इतरांना दुखावते. कधी कधी या त्यावर्तणूकीच्या विरुद्ध आपण काही न बोलता इतर कोणालाही आपल्या भावनांचा थांगपत्ताही लागू देत नाही.

एकदा एका झाडाखाली साप रहात होता. तो त्याझाडाच्या बाजूने येणा-या जाणा-या गावक-यांना चावून सतत घाबरवत असे. गावात त्याची दहशत झाली होती. गावक-यांनी एका सज्जन माणसाला सापाची समजूत काढण्यासाठी विनवले. त्यामाणसाने सापाला त्याची वर्तणूक कश्याप्रकारे चुकीची आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वर्तणूकीमुळे कशाप्रकारे इतरांना कसा त्रास होतो हेही समजवले. सापानेही पुन्हा असे करणार नाही असे वचन दिले.

एका आठवड्यानंतर एका माणसाने पाहिले की काही लोक साप रहात असलेल्या झाडाच्या आजुबाजूला जमले आहेत. जवळ जाताना त्याला कळाले की लोक त्या सापाला दगड फेकून मारत आहेत व साप कोणताही विरोध न करता जमिनीवर निपचित पडून आहे. त्या माणसाला बघून साप उठला व माणसाला म्हणाला," तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोणालाही त्रास देत नाही पण हे लोक पहा मला कशी वर्तणूक देत आहेत."

त्यावर सज्जन माणसाने सांगितले,"अरे सर्पा, तुला मी कोणालाही चाऊ नको असे सांगितले होते. कोणालाही विरोध करु नको किंवा इतरांचे अत्याचार सहन कर असे सागितलेच नव्हते.

कधी कधी आपण गोष्टीमधील सापाप्रमाणे वागायला लागतो. आपण इतरांवर आरडाओरडी करून किंवा त्यांना मारुन दुखवत असतो किंवा काही न बोलता, आपल्या भावना व्यक्त न करता गप्प रहात असतो. आपण एकतर एकदम आक्रमक होतो किंवा एकदमच शांत होऊन जातो.

कोणालाही न दुखवता विरोध दर्शवणे किंवा चुका दाखवून देणे.
काहीवेळा आपली चुका दर्शवण्याची पद्धत, आपले शब्द चुकीचे असतात. त्यामुळे आपली बाजू बरोबर असूनही त्यावर लक्ष दिले जात नाही किंवा विरोध केला जातो. जर आपण आपली बाजू मांडण्याची पद्धत व शब्द योग्य असतील म्हणजेच कमी दुखवणारे किंवा कमी तिव्रतेचे असतील तर हे साध्य होऊ शकते.

आपण हे कसे करु शकतो?

तक्रार ऐकताना

तात्पर्य- राग हा आपल्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. पण त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या रागाला ओळखणे व तो योग्य आहे किंवा नाही याची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. आपल्यात दडून बसलेला राग काढण्यासाठी आपण शाररिक हलचालींचा किंवा पूर्णतः विश्राम करण्याच्या पद्धतीचा वापर करु शकतो. रागाला ओळखणे, व्यवस्थित समजून घेणे व योग्य मार्गाने व्यक्त करणे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. यामुळे आयुष्य अधिक आरामदायी व ख-याने संतुलित होण्यास मदत मिळते.