Print
Hits: 8490

थोडा पूर्व इतिहास
१९८० सालापासून महाराष्ट्रात गर्द उर्फ ब्राऊन शुगरचा प्रश्न तयार होऊ लागला होता. वर्तमानपत्रातून त्यावर लेखही येऊ लागले होते. डॉ. अनिता व डॉ. अनिल अवचट यांच्या मित्राचा मुलगाच या व्यसनात सापडला. त्याच्यावर उपचार करताना या प्रश्नाच्या गांभिर्याची त्यांना कल्पना आली. डॉ. अनिल अवचट यांनी मुंबई येथे या प्रश्नात आधीपासून काम करणार्‍या डॉ. आनंद नाडकर्णी या सायकियाट्रिस्ट मित्राच्या सहाय्याने या प्रश्नांची सांगोपांग माहिती घेऊन आधी ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये लेखमाला लिहिली व ती नंतर गर्द या पुस्तकाच्या आकारात प्रसिध्द केली. हे पुस्तक सुप्रसिध्द साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांच्या वाचनात आले. अतिशय अस्वस्थ होऊन त्यांनी अवचट पतिपत्‍नींना बोलावून या प्रश्नाबाबत ते काही करणार असल्यास आर्थिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली.

डॉ. अनिता अवचट त्यावेळी येरवडा मनोरूग्णालयात सायकियाट्रिस्ट होत्या. त्या सुमारास,अधिक्षकांचा पदभारही सांभाळत होत्या. त्यांनी वरिष्ठांची परवानगी काढून तेथे नव्याने तयार झालेल्या इमारतीत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले.

‘मुक्तांगण मित्र’ ही संस्था स्थापन केली. आधी हा उपक्रम मनोरूग्णालय व मुक्तांगण मित्र असा संयुक्त होता. तीन वर्षांनी तो मुक्तांगण मित्र संस्थेकडे पूर्णपणे सोपवला गेला. २९ ऑगस्ट १९८६ सालापासून हा उपक्रम अव्याहतपणे चालू आहे.

मुक्तांगणची उपचारपध्दती
व्यसन हा एक आजार आहे. तो शारिरीक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. तो गुंतागुंतीचा आजार आहे. हा जन्मभराचा आजार आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवता येते. परत परत उद्‌भवणारा हा आजार असला तरी त्याची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्‍न आपण करू शकतो. ती ओढ का व कशी निर्माण होते हे समजल्यास अशी मात करता येते आणि माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो.
मुक्तांगणच्या उपचार पध्दतीत पुढील काही पायर्‍या आहेत.

 1. केंद्रात दाखल झाल्यावर अंमली पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो (विथ्ड्रॉल सिम्प्टम्स किंवा टर्की) तो कमी करण्यासाठी करावे लागणारे उपचार
 2. व्यसनी माणसाच्या पूर्वेतिहास जाणून घेणे व या अंमली पदार्थ सेवनाची सुरूवात कुठून व कशी झाली, ते वाढत कसे गेले, त्याचे त्याच्यावर व कुटुंबियांवर काय व कसे दुष्परिणाम झाले याविषयीची माहिती त्याच्याकडून व कुटुंबियांकडून गोळा करणे. ते वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्न कसे सोडवता येतील याचे अनेक पर्याय त्याच्यापुढे ठेवणे.
 3. व्यसन हा आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, त्याची जबाबदारी इतर कोणाची नसून आपलीच आहे, याची जाणीव व्यसनी माणसास उत्स्फूर्तपणे झाली तरच या सर्व उपचाराचा फायदा होतो. अशी जाणीव लवकरात लवकर, परिणामकारकरित्या निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरण मुक्तांगणमध्ये निर्माण केले आहे. इथे सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक उपक्रम चालू असतात. उदा. योग, ध्यान, खेळ, समूह उपचार, संगीत उपचार, मनोनाट्य, व्यवसाय शिक्षण, महिन्याचे हस्तलिखित मासिक, खेळांच्या स्पर्धा, व्यसनमुक्तीचे वाढदिवस, कुटुंबियांच्या सभा, अपत्यांच्या सभा कलाकुसर वर्ग, निसर्गात जाऊन झाडे, पक्षी, प्राणीनिरीक्षण, फिल्म शो इ. या सर्वांचा रोख व्यसन या प्रश्नाशी असतो. व्यसन सुटल्यावर पोकळी निर्माण होते, ती उत्तमरितीने भरून काढण्यासाठी या विविध उपक्रमांचा फायदा होतो.
 4. पुनर्वसन - येथील वास्तव्याच्या शेवटच्या भागात त्याला झेपेल असा कार्यक्रम तयार केला जातो. पूर्वीची देणी मिटविणे, आपण केलेल्या जखमा भरून काढणे, गेलेले काम परत मिळविणे, मोडलेले लग्न परत जमवून आणणे इ. गोष्टींचा समावेश यात होतो.

कौन्सिलींग सेंटर
हे शहराच्या मध्यभागात असून तिथे रोज संध्याकाळी ५ ते ९ या दरम्यान शोशल वर्कर्स, कौन्सिलर्स उपस्थित असतात. उपचार घेऊन बाहेर जाणार्‍या माणसास तिथे सभांना किंवा वैयक्तिक मार्गदर्शनास बोलावले जाते. व्यसनात अडकलेल्यांच्या बायका मुलांवर या व्यसनामुळे जबरदस्त मानसिक दुष्परिणाम झालेले असतात. त्यासाठीही उपक्रम असतात. महिन्यातून एकदा बायकांच्या ‘सहचरी’ गटाचे, दांपत्यांच्या, ‘सहजीवन’ गटाची आणि मुलांच्या ‘अंकूर’ गटांची सभा असते. वर्षातून एकदा या सर्वांची सहलही आयोजित करण्यात येते.

परगावचा पाठपुरावा
पुण्यातल्या लोकांना येथील कौन्सिलिंग सेंटरचा फायदा मिळतो तसा परगावच्या लोकांना मिळावा म्हणून व्यसनमुक्तांच्याच पुढाकाराने खालील ठिकाणी पाठपुरावा केंद्रे उघडण्यास आली आहेत.

 1. नाशिक
 2. सोलापूर
 3. सातारा
 4. मुंबई
 5. उरूळीकांचन
 6. पिंपरी-चिंचवड
 7. सांगली
 8. कोल्हापूर
 9. कराड
 10. औरंगाबाद

शिवाय पुण्यातही कासेवाडी आणि जयभवानीनगर, कोथरूड येथील झोपडपट्यात कास्प संस्थेच्या सहकार्याने कौन्सिलिंग सेंटर्स चालविण्यात येतात. वरील शहरांमधील व्यसनमुक्त आठवड्यात १ ते ३ वेळा जमतात. पुण्याहून एक कौन्सिलर महिन्यातून एकदा दोनदा, काही ठिकाणी चारदा पाठवला जातो. आजपर्यंत या केंद्रात दहा हजाराहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रीतील बहुतेक जिल्ह्यांमधील लोक आहेत, अलिकडे केंद्राची प्रसिध्दी ऐकून कर्नाटक, नागालँड, जम्मू येथूनही पेशंट येत असतात.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
सेटिया हॉस्पिटल समोर, हॉटेल लँडमार्क च्या मागे
मोहनवाडी, विश्रांतीवाडी, पुणे ४११ ०१५
फोन: +९१ २० २६६९७६०५