Print
Hits: 6512

कित्येक दिवस अन्नाचा कणही मिळाला नाही, तेव्हा आर. टि. ओ जवळच्या पुलाखाली जाऊन पडलो.......

लोक दहव्या - बाराव्या दिवसाचा अंत्यविधी म्हणून पिंडदान करायला येतात.

ते खाऊन तरी पोट भरता येईल, असं वाटलं - भूक इतकी अनावर होती की ‘कावळा शिवण्यासाठी’ लोकांनी ठेवलेले पिंड अक्षरश: झेप टाकून खायचा प्रयत्‍न करायचो, आणि लोकांचा बेदम मारच खायचो! पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन्‌ तास वाट पाहणारे लोक माझ्या तोंडात मात्र अन्नाचा कणही जाऊ देत नव्हते........

कावळा ते पिंड चिवडत असताना मी भिकार्‍यांनी खाऊन इकडेतिकडे पडलेली शितं वेचून खायचो.....‘अन्न म्हणजे काय’ हे त्या क्षणी खर्‍या अर्थाने कळलं. ते सगळं आज आठवलं, की आज आपण स्वप्नात आहोत की काय, असं वाटतं..."

वाचतानाही अंगावर शहारे यावेत, अशा या एकाच काय, अनेक जीवघेण्या अनुभवातून श्री. अशोक पवार गेलेले आहेत. दारूचे व्यसन माणसाला किती भीषण पातळीवर आणून ठेवू शकतं, त्याचा अत्यंत जळजळीत अनुभव त्यांनी घेतला आहे! काही वर्षापूर्वी जगाच्या दृष्टीने ‘संपल्या’ तच जमा असलेला एक ‘दारूडा’ ते आज जवळजवळ सात वर्षे व्यसनमुक्त राहून समाधानाने, मानाने जगू पाहणारा ‘अशोक पवार’ हा प्रवास कसा झाला?

जवळजवळ २०-२५ वर्षापूर्वी त्यांच्या या व्यसनाची सुरूवात झाली. मित्रांच्या संगतीत दारूची चटक कधी आणि कशी लागली, ते कळलंच नाही. आणि मग त्याचं ‘व्यसन’ बनायला काही वेळ लागला नाही! १९७५ साली स्वत:ची रिक्षा घेतली आणि त्यातून स्वत:चा पैसा हातात खेळायला लागल्यावर तर हे व्यसन अधिकच वाढलं. आणि इतक्या थराला गेलं की दारूशिवाय चालेनासचं झालं. त्याचे सर्व परिणामही दिसायला लागले. अखंड दारूच प्यायल्यामुळे पोखरलं गेलेलं शरीर, सतत चक्कर, नैराश्य यामुळे चार लोकांत मिसळण्याचीच भीती वाटू लागली! तरीही रिक्षाचा धंदा कसाबसा चालला होता. एक दिवस मात्र, या सगळ्याचा ब्रेकडाऊन झाला आणि अक्षरश: रिक्षात घेतलेले गिर्‍हाईक मध्येच उतरवून हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं.

खरं तर धोक्याची घंटा पूर्वीच कधीतरी वाजलेली होती. पण घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याकडे सतत दुर्लक्षच केलं होतं. आता घरच्यांवरच पूर्णपणे अवलंबून राहायची वेळ आली कारण मनात भीतीचा जबरदस्त गंड निर्माण झाला होता. उठून चालताही येत नव्हतं. कुणाशीही बोलायची भीतीच वाटू लागली होती.

जवळजवळ २५-३०वर्षापूर्वी, या व्यसनाविषयी पुरेशी जागरूकता, वेगळं उपचार केंद्र असं काहीही नव्हतं. त्यामुळे अशा रूग्णांना सरसकट ‘मेंटल हॉस्पिटल’चाच रस्ता दाखविला जायचा!

आणि तिथल्या भयानक वातावरणात रूग्णाची शारीरिक आणि मानसिक हानी जास्तच वेगाने व्हायची. केवळ ‘दारूडा’ च नव्हे. तर ‘वेडा’ असाही शिक्का मारला जायचा. आणि रूग्ण सुधारण्याऐवजी नकळत त्याच दिशेने त्याचा उलटा प्रवास सुरू व्हायच!

अशोक पवार यांनाही मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. एक वर्ष तिथे काढून किरकोळ सुधारणा होऊन ते बाहेर पडले. आणि ‘लग्नानंतर’ तरी सुधारतो का पाहू या असं म्हणून घरच्यांनी लग्न करून दिलं. लग्नानंतर एक मुलगा होईपर्यंत परिस्थिती अधिकाधिक बिघडतच गेली. हातात कामधंदा काहीच नव्हता. ते रिकामपण व्यसनात भरच घालत होतं. वडिलांच्या पेन्शनवर व बायकोच्या तुटपुंज्या उत्पन्नावर कशी तरी गुजराण चाललेली होती. स्वत:चं स्वत: उठूनही बसता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दारूच्या व्यसनाचा विळखा किती जबरदस्त असतो याच हळूहळू प्रत्यय यायला लागला. उपचार म्हणून जी काही वेदनाशामक इंजेक्शन्स्‌ दिली जात. ती घेतल्यावर काही काळ चालता येत असे. तेवढ्या वेळाचाही उपयोग(!) करून घेऊन गुत्यापर्यंत जाऊन जमेल तेवढी दारू पिऊन यायची, असा क्रम सुरू झाला. पुढेपुढे तर दारू मिळाली. नाही की, अशा काही असह्या वेदना होत की, “दारू परवडली पण गोंधळ आवर!" असं म्हणून घरचेच लोक नाईलाजाने दारू आणून देऊ लागले. या सगळ्याला कंटाळून बायको मुलासहित माहेरी निघून गेली.

जेव्हा घरच्यांचाही आधार, संपून अक्षरश: रस्त्यावर यावं लागलं, तेव्हा दारूने कशाकशाचा घास घेतलाय हे लक्षात यायला लागलं. पण व्यसनाची वाट भयंकर निसरडी असते. एकदा का ती गुलामी पत्करली की, स्वत:हून मागे फिरायच्या वाटा बंद होऊन जातात. कारण मनावर कोणत्याही प्रकारे ताबा ठेवण्याची शक्तीच संपून जाते. आता त्या निसरड्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला होता. असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीची हवा खावी लागली. अक्षरश: रस्त्यावर मिळेल ते, पालेभाजीच्या टाकून दिलेल्या गड्‌ड्या इत्यादी खाऊन दिवस कंठावे लागले. कसलीही शुध्द राहिलेली नव्हती.


भास होणं सुरू झालेलंच होतं. एक दिवस ओळखीच्या एका हमालाने अशोक पवार यांना अशा भयानक अवस्थेत रस्त्यावर पडलेलं पाहिलं आणि घरी नेऊन पोहोचवलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली होती की, पुन्हा पूर्वीचाच ‘उपाय’ अंमलात आणण्यावाचून घरच्यांना दुसरा पर्यायच नव्हता. पुन्हा एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यावेळी मेंटल हॉस्पिटलमधील औषधोपचार पूर्ण होऊन निरीक्षणाखाली ठेवलेल्या रूग्णांमध्ये या प्रकारच्या रूग्णांचा समावेश केला जाई. मेंटल हॉस्पिटल मधील त्या दोन वर्षाच्या आठवणी अशोक पवार यांच्या अंगावर अजूनही शहारा आणतात.

पण स्वत:च्याच हाताने तर ही परिस्थिती ओढवून घेतली गेली होती. आता तर दारूचे भयानक परिणाम लक्षात येऊनही दारू सोडण्याची मानसिक ताकद पूर्णपणे संपलेली होती.

मेंटल हॉस्पिटलमधील त्या वॉर्डाची जबाबदारी त्यावेळी डॉ. अनिता अवचट यांच्याकडेच होती. पूर्वी हमाल पंचायतीत असणार्‍या त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या अशोक पवारांना त्यांनी ओळखलं. ‘मुक्तांगण’तेव्हा नुकतंच सुरू झालेलं होतं.

त्यांनी अशोक पवार यांना ‘मुक्तांगण’ मध्ये दाखल करून घेतलं. आणि भरकटत चाललेल्या श्री. पवार यांच्या आयुष्याला या एकाच गोष्टीने जी दिशा दिली, ती अत्यंत महत्वाची ठरली. कुठल्याही थरापर्यंत गेलेल्या ‘व्यसनी’ माणसाच्या गाभ्यातील ‘माणूसपण’ आरपार पाहू शकणारी डॉ. अनिता अवचटांची नजर, त्या नजरेतील प्रेमळ धाक आणि ‘माणूस सुधारू शकतो’ यावरील गाढ विश्वास यांनी अक्षरश: मरणापर्यंत गेलेल्या कित्येक ‘दारूड्या’ ना पुन्हा ‘माणसात’ आणलं. त्यांना नव आयुष्य दिलं. “मॅडम" च्या लाडक्या पेशंटस पैकी आपण एक आहोत, याचा अशोक पवार यांना अतिशय अभिमान आहे. त्यापूर्वी कित्येकदा आत्महत्येचा प्रयत्‍न केलेल्या अशोक पवार यांना ‘मॅडम’ च्या एका नजरेतून काही शब्दांतून जगण्याचं बळ मिळे. डॉ. अनिता अवचट आणि श्री. पवार यांचे Councellar (समुपदेशक) श्रीरंग उमराणी यांच्याविषयी श्री. पवार यांच्या मनात अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे.

अशी सुमारे साडेतीन वर्षे गेली आणि त्यानंतर मुक्तांगण मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा व्यसन उलटलं! जवळजवळ दोन वर्ष पुन्हा पूर्वीइतकंच दारू पिणं सुरू राहिलं. दोन वर्षांनी स्वत: डॉ. अनिता अवचटांनीच अशोक पवार यांना परत बोलावून घेतलं.

कोणत्याही व्यसनी माणसाच्या बाबतीत ही ‘सुधारण्याची संधी’ पुन्हा मिळणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आपल्या हातून घडणार्‍या चुकाही समजावून घेऊन पुन्हा कोणीतरी आपल्यावर विश्वास दाखवतं आहे ही गोष्टच त्यांच्यातील ‘माणूसपण’ जागवायला कारणीभूत ठरते, कारण बाहेरच्या जगातून सतत नकार आणि अपमानच वाटायला येत असता डॉ. अनिता अवचटांनी नुसते ‘उपचार’ केले नाहीत, तर सर्वार्थाने श्री. पवार याचं आयुष्य मार्गी लावून देण्याची जणू जबाबदारीच घेतली. स्वत: श्री. पवार यांच्या पत्‍नीला पत्र लिहून त्यांनी परत बोलावून घेतलं मुक्तांगणमध्येच ते काम करू लागले. पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते मिळालेल्या पहिल्या पगाराचा चेक श्री. पवार यांना लाखमोलाचा वाटतो. कारण ‘आपणही काही मिळवू शकतो’ हा आत्मविश्वास त्या चेकने दिला होता. काही वर्षातच श्री. पवार याचं घरं उभं राहिलं आणि पत्‍नी व मुलासहित पुन्हा सुखी संसार सुरू झाला.

अर्थात, आजही प्रश्न, अडचणी संपलेल्या नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर माणसांत मिसळताना थोडं बिचकायला होतंच. शिवाय ‘वडील’ म्हणून मुलाशी जे जवळीक नातं- निर्माण व्हायला हवं ते अजूनही चांगल्या प्रकारे निर्माण झालेलं नाही. आता मात्र बदलला आहे, तो अशा अडचणींकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक दृष्टीने आयुष्यात येणार्‍या सर्वच प्रसंगांना सामोरं जाणं, वाट पाहण्याची ताकद कमावणं आणि आत्मसन्मानाची जाणीव. ही ‘मुक्तांगण’ ने दिलेली देणगी आता कामी येते आहे.

आजही कधीतरी नैराश्याच्या क्षणी दारूचा विचार मनात येतो. पण पूर्वीचे ते ‘रस्त्यावरचे दिवस’ आठवतात. ‘मॅडम’ चे शब्द आठवतात आणि पुढच्याच क्षणी आपोआप तो विचार झटकून टाकला जातो. सकारात्मक दृष्टीकोन रूजवण्याचा प्रवास आता सुरू झाला आहे.

श्री. अशोक पवार यांसारख्याच इतर व्यसनमुक्तांशी बोलताना लक्षात यायला लागलं की, व्यसनाचं स्वरूप जरी सारखंच असलं, तरी प्रत्येक माणसाचा स्वभाव, कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी यानुसार ते वेगवेगळा परिणाम घडवून जात असत.


व्यसनमुक्तीची कोणतीही एकच उपचारपध्दती, एक साचा बनवून चालत नाही. ही जाणीव ‘मुक्तांगण’ मध्ये अतिशय डोळसपणे जपलेली आढळते. याच दृष्टीने श्री. नितीन देऊस्कर यांचेही अनुभव हृद्य वाटले. कोल्हापूरच्या एका सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातला एकुलता एक मुलगा म्हणून नितीन अतिशय लाडाकोडात वाढला. कॉलेजमध्ये असताना मित्रांबरोबर सहज म्हणून कधीतरी दारू पिऊन पाहिली होती. ‘आपण खूप पैसा मिळवायचा आहे’ असं चारचौघांसारखंच स्वप्न डोळ्यासमोर होतं. राज्यसेवा आयोगाच्या परिक्षाही दिल्या होत्या,

पण अशा मार्गांपेक्षाही झटपट पैसा मिळवून देणारं काहीतरी हातात असावं, असं नेहमी वाटे. म्हणूनच एम्‌. पी. एस्‌. सी., एल. एल. बी वगैरे वडिलांच्या इच्छेखातरच केलं जात होतं. त्यात खर्‍या अर्थाने मन रमत नव्हतं त्यातच एम.पी.एस्‌.सी. ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावरही जेव्हा प्रवेशासाठी लाच मागितली गेली तेव्हा प्रचंड धक्का बसला.

महत्वाकांक्षेने झपाटलेल्या त्या वयात वाटून गेलं, काय बिघडलं लाच दिली तर? सुशिक्षित आणि पात्र असूनही केवळ लाच न दिल्याने ही संधी गेली तर हातातोंडाशी आलेला हा घास सोडून द्यायचा? ........पण आयुष्यभर गॅझेटेड ऑफिसर म्हणून इमानाने, नेकीने सरकारी नोकरी केलेल्या नितीनच्या वडिलांनी याला साफ नकार दिला.

इमानाने दिलेल्या या नकाराचा अर्थ त्या वयात कळला नाही. फक्त एक गोष्ट मनात सलत राहिली की, आपण सुशिक्षित, मध्यमवर्गीय, पापभीरू इत्यादी असल्याने डावलेले जातो आहोत. मग त्या मध्यमवर्गीय संस्कारांविरूध्द जणू बंडच सुरू झालं. दारू पिण्याचं प्रमाण वाढलं.

पुढे काहीशा योगायोगानेच हॉटेल व्यवसायात प्रवेश झाला आणि भराभर पैसा मिळवण्याची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याचा जणू मार्गच खुला झाला. हॉटेलमध्ये नोकरीत भराभर प्रगती होत गेलीच. पण दारू पिण्याचं प्रमाणही त्याच वेगाने वाढत गेलं. नोकरीत जम बसायला लागल्यावर लॉटरीचाही नाद लागला.

गिर्‍हाईकांशी ओळख वाढवणं, त्यांना बिलांमध्ये फेरफार करून देणं वगैरे गोष्टींमुळे पगारापेक्षा जास्तीत पैसाही हातात खेळायला लागला. झटपट मिळणार्‍या पैशाची चटक हेही एक प्रकारचं व्यसनच. तिथूनच पुढे इतर अनेक व्यसनांचा मार्ग खुला होतो. पण डोळ्यावर त्या पैशाची इतकी धुंदी चढलेली असते की, पाय कधी घसरत जातो हे कळत नाही. तसंच नितिनचं झाल. काही काळापूर्वी मनात घर करून बसलेली ‘आपल्यावर अन्याय झाला आहे’ ही भावना पुसली गेली होती. {

जवळजवळ दीड वर्षात घराशी संपर्क नव्हता. वाढत चाललेलं व्यसन अजून घरच्यांपर्यंत पोहोचलं नव्हतं. भरपूर पैसा आणि भरपूर दारू असं ‘सुखात’ चाललेलं होतं.

व्यसनाचे परिणाम दिसायला लागल्यावर मात्र दिवस पालटले. या वाढत्या व्यसनाचा परिणाम नोकरीतील कामावर होऊ लागल्यावर इतके दिवस नितीनवर खुश असणार्‍या हॉटेलमालकाने त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकलं. पैशाची आवक बंद झाली तरी व्यसनाने पूर्ण ताबा घेतला होता. बँकेतील असेल नसेल तो पैसा वापरून चोवीस तास दारू पिणं सुरू झालं. हॉटेलातील नोकरी गेल्याचा अपमान त्या दारूत बुडवून टाकायचा होता.

यथावकाश या सगळ्याचा सुगावा घरी लागला आणि एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत घरातील मुलगा या मार्गाला लागावा, याचा आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला. आता तर घरातील पैसे, चोरणं, आईचे दागिने चोरून विकून दारूसाठी पैसे मिळवणं, इथपर्यंत मजल गेली.

त्यात आपण काहीही चूक करतो आहोत असं वाटत नव्हतं. कोल्हापूरात नितीनवर उपचार करणार्‍या मानसोपचार तज्ज्ञांनी पुण्याचे डॉ. विद्याधर वाट्‌वे यांचा पत्ता दिला. ‘मुक्तांगण’ विषयीही नितीनच्या वाचनात आले होतंच. तेव्हा आता पुण्यात उपचार करून पाहू म्हणून वडील नितीनला घेऊन पुण्यात आले.

पुण्यात आल्यानंतर पूना हॉस्पिटलमध्ये `Antabus' या दारूविषयी तिटकारा निर्माण औषधांद्वारे उपचार सुरू झाले. पण त्याचा फारसा उपयोग होणार नव्हता.


व्यसनी माणसाला दारू मिळवण्याचे सर्व मार्ग पक्के ठाऊक असतात. कोल्हापूर ते पूणे या प्रवासात व पुण्यात आल्यावरही वडील बरोबर असतानाही त्यांचा डोळा चुकवून नितीन दारू प्यायला. त्यामुळे आता त्याच्यावर कोणाचाही ताबा राहिलेला नाही. घरात राहून तो सुधारू शकणार नाही, हे उघड होतं. शिवाय त्याला स्वत:लाही मुक्तांगणबाबत कुतूहल होतं. म्हणून मग मुक्तांगणमध्ये त्याला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्तांगणमध्ये भोवतालच्या व्यसनमुक्त सहकार्याबरोबर होणार्‍या ‘शेअरिंग’ म्हणून अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या बैठाकांमधून आपण एकटे नाही एवढा दिलासा मिळाला आणि मनातील अपराधाची भावना थोडी कमी व्हायला लागली.

उपचारानंतर कोल्हापूरला परतल्यावर नितीन आणि त्याच्या आई-वडिलांनाही वाटलं. चला, एका मोठ्या धोक्यातून आपण बाहेर पडलो, काही दिवस तसे चांगले गेलेही. पण व्यसन हा एक छुपा आजार असतो. मनाचा तोल क्षणभर जरी ढळला, तरी तो कधी वर येईल हे सांगता येत नाही. काही दिवस अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या बैठका, मुक्तांगणच्या कोल्हापुरातील बैठकांना हजेरी असा क्रम सुरू राहिला. थोड्या दिवसांनी नितीनला वाटलं. आता आपल्यावर स्वत:वर ताबा ठेवणं चांगलं जमायला लागलं आहे, काय हरकत आहे, पुन्हा थोडी दारू घेतली तर? तेवढ्याने आपण काही पुन्हा व्यसनी होत नाही. एव्हना नितीनचं व्यसन सुटलं आहे, यावर घरच्यांचा विश्वास बसला होता. घरात नितीनची स्वतंत्र खोली होती. शिवाय दारू पितानाही तो खोलीतील तांब्याभांड्यात घेऊनच पीत असते. त्यामुळे कुणाला संशय यायचा प्रश्न नव्हता. सुमारे तीन महिने हे चोरून पिणं सुरूच राहिलं. अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या सुनीता काळे यांना ही Denial Stage लक्षात आली आणि त्यांनी नितीनच्या वडीलांना इशारा दिला.

पहिल्यापासून वडिलांनीच आपलं नुकसान केलं आहे, हा गैरसमज मनात पक्का होताच. आता तर आपण दारू पिऊनही करू शकतोय ना काम? मग वडिलांनी त्यावर आक्षेप घ्यायची गरजच काय, असं वाटून पुन्हा खटके उडायला लागले. त्यावेळी नितीन त्यांच्या एका स्नेह्यांनी सुरू केलेल्या केटरिंग कॉलेजमध्ये काम करत होता. नितीनचं पुन्हा वाढलेलं व्यसन कुणापासूनही न लपविणार्‍या वडिलांमुळेच ही गोष्ट नोकरीच्या ठिकाणीही सर्वांना कळून आपली नोकरी जाईल, ही भीती नितीनच्या मनात निर्माण झाली. व्यसन वाढतच गेलं.

पुन्हा एकदा मुक्तांगणमध्ये उपचार घेतले गेले. पण आता आपण दारू पिऊनही काम करू शकतो ही भावना मनात पक्कीच होती. आपला काही तोटा होतो आहे, असं वाटतच नव्हतं. उपचार घेऊन आल्यानंतरही दारू पिणं सुरूचं राहिलं. अल्कोहोलिक ऍनॉनिमस, जनस्वास्थ समिती येथील सहकार्‍यांनी प्रयत्‍न करून पाहिले. कामाच्या ठिकाणच्या सहकार्‍यांनीही सांभाळून घेण्याचा प्रयत्‍न केला. पण आता कोणीही, अगदी मुक्तांगण, सुध्दा आपल्याला सुधारू शकणार नाही ही नितीनची पक्की खात्रीच होती. यात शारीरिक, मानसिक शक्ती पूर्णपणे खचून भीती, अपराधाची टोचणी या भावनांनी मनात घर केलं होतं. पण त्यावर नितीनकडे उत्तर होतं, तेही एकच - दारू!

त्याच सुमारास डॉ. अनिल अवचट कोल्हापूरात आले होते. नितीनच्या व्यसनमुक्तीसाठी एव्हना पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. डॉ. अनिल अवचटांनी नितीनचा मुक्तांगणचा काही हजारांच्या रकमेतील खर्च स्वत: करायची मनावर खोल परिणाम करून गेली.

आपल्यासारख्या ‘वाया’ गेलेल्या माणसावर नुसता विश्वास दाखवणचं. नव्हे तर अर्थिक जबाबदारी घेण्याची तयारीही कोणीतरी दाखवतं आहे आणि आपण मात्र आडमुठेपणाने बदलाची तयारीही दाखवत नाही. अशी टोचणी त्याच्या मनाला लागली.

त्यानंतर मात्र नितीनने मुक्तांगणमध्ये मनापासून सुधारण्यासाठी प्रयत्‍न केले Rational Emotive Therapy (RET) चा त्याला अतिशय फायदा झाला. परेश कामदर, प्रसाद ढवळे यांच्याशी वेळोवेळी तो मनातल्या भावना विचार यासंबंधात ‘शेअरिंग’ करत गेला. सुधारणेसाठी स्वत:हून प्रयत्‍न केल्याने भराभर चांगला परिणाम दिसू लागला.

कै. डॉ. अनिता अवचट यांच्यानंतर आता डॉ. अनिल अवचट व त्यांची. मुलगी मुक्ता पुणतांबेकर यांनी तितक्याच समरसतेने आणि समर्थपणे हे काम पुढे सुरू ठेवलं आहे. नितीनमध्ये सुधारणा होऊ लागल्यानंतरही त्याचा आळस व निष्क्रीयता कमी झालेली नाही. अजून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्‍न होत नाहीत ही गोष्ट मुक्ताने हेरली व एक दिवस त्याविषयी अत्यंत कडक शब्दात त्याला समज दिली. आजपर्यंत कधीही अशाप्रकारे कडक, अवमानकारक शब्दात न बोललेली मुक्ता आज अशा प्रकारे समज देते आहे. याचा अर्थ आपली तितकीच गंभीर चूक होते आहे हे नितीनच्या लक्षात आलं. तो माझ्या आयुष्यातील `Turning Point' होता असं नितीन सांगतो. ते बोलणं त्याला झोंबलं. पण त्यामुळेच आळस खाडकन उतरला हळूहळू मुक्तांगणमधील काम त्याच्यावर सोपविण्यात यायला लागली.


आपणही खूप काही करू शकतो. असा विश्वास वाटायला लागला. ‘मुक्ता मॅडम’ विषयीची कृतज्ञता त्याच्या शब्दाशब्दातून सतत जाणवते. मुक्तामॅडम बद्दलचा हा विश्वास, आदर मुक्तांगणमधील सर्वांच्याच बोलण्यातून सतत प्रत्ययाला येतो.

व्यसनमुक्तीमध्ये रूग्णाच्या घरच्यांचा सहभागही अत्यंत महत्वाचा असतो. ‘मुलांवर एवढे चांगले संस्कार केले, तरी वाया गेला हो’! असं म्हणून नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता, धीर न सोडता सतत ८ ते १० वर्ष नितीनच्या व्यसनमुक्तीसाठी डोळस प्रयत्‍न करणार्‍या त्याच्या वडिलांना फार मोठं श्रेय द्यायला हवं. ऍल्काहोलिक ऍनॉनिमस च्या बैठकांना ते स्वत: अत्यंत नियमितपणे हजर रहात. आता नितीन स्वत:च्या स्वभावदोषांकडे डोळसपणे पहायला लागला आहे. मुक्तांगणमध्ये अनेक जबाबदार्‍या तो मनापासून पार पाडतो आहे. एखादं काम मनापासून करण्यातला आनंद काय असतो हे अनुभवतो आहे. कोणत्याही मोहाला बळी पडून लोकांना फसवायला गेलो तर मीच फसेन, ही फार महत्वाची जाणीव निर्माण झाली आहे.

समाजाच्या दृष्टीने ‘संपल्यातच’ जमा झालेल्या अशा अनेक व्यसनमुक्तांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची अशी कोणती ‘किल्ली’ मुक्तंगणला गवसलेली आहे? याच उत्तर मुक्तांगणच्या कार्यपध्दतीत लपलेलं आहे. मुळातच, मुक्तांगणच्या दृष्टीने ‘व्यसनमुक्ती’ याचा अर्थ ‘दारू सुटणे’ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. ती तर फक्त सुरूवातच आहे. पण व्यसन हा एक ‘आजार’ आहे. आणि उपचार केवळ आजार दूर करण्यापुरतेच पुरेसे नाहीत, त्यामागचा आजाराला बळी पडू शकणारा ‘स्वभाव’ बदलायला हवा. हे तत्व पाळत आल्यानेच कित्येक हजार व्यसनमुक्तांच्या आयुष्यात हा आमूलाग्र बदल ‘मुक्तांगण’ ला घडविता आलेला आहे.

मुक्तांगणमधील ३५ दिवसांचे उपचार संपले की, रूग्णाचा गेलेला आत्मविश्वास, भोवतालच्याजगात पुन्हा मिसळण्याची हरवलेली मानसिक शक्ती, मनात निर्माण झालेले कित्येक गंउ, या सार्‍यावर ३५ दिवसांत उपचार शक्य नसतात. मुक्तांगणमधून बाहेर पडलेल्या कित्येक रूग्णांना त्याचं स्वत:च घरही स्वीकारेल की नाही याची शाश्वती नसते. म्हणूनच, व्यसनमुक्ती ही एक प्रक्रिया आहे, हे इथे रूग्णांच्या मनावर बिंबवलं जातं. बाहेरच्या जगात एकदम अंगावर येणारे ताण, स्पर्धा, यामुळे रूग्ण पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते. या सगळ्या ताणांना इथल्या सहकार्यांशी ‘शेअरिंग’ करताना वाट मिळते. आणि वाट पुन्हा चुकण्यापूर्वीच सावरलं गेल्याने पुन्हा व्यसनाधीन होण्याची शक्यता बर्‍याच अंशी कमी होते. ‘मुक्तांगण’ हे आमचं हक्काचं घर आहे. ही अनेक व्यसनमुक्तांच्या तोंडून ऐकायला मिळालेली, भावना, याच आपुलकीचं द्योतक आहे.

शिवाय मुक्तागणचा कर्मचारी वर्ग म्हणजे एकेकाळचे इथलेच व्यसनमुक्त असल्याने येणार्‍या प्रत्येक रूग्णाला इथे खर्‍या अर्थाने ‘सह-अनुभूतीने’ वागविलं जातं. त्याची दया किंवा कीव केली जात नाही.

हे मुक्तांगणच्या कार्यपध्दतीतील अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इथे येणारा प्रत्येक रूग्ण हा जगाच्या द्रुष्टीने एक ‘व्यसनी’ असला तरी तो प्रथम माणूस आहे, केवळ त्याची वाट चुकलेली आहे, हे भान इथे रूग्णाशी संवाद साधताना सतत बाळगलं जातं, ‘व्यक्ती’ म्हणून असणारा त्याचा आत्मसन्मान जागवण्याची आणि जोपासण्याची दक्षता घेतली जाते. म्हणून, मुक्तांगणचे उपचार वरवरचे रहात नाहीत. मुळातल्या स्वभावदोषांचा शोध घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्‍न केला जातो.

शिवाय, मुक्तांगणच्या कार्यपध्दतीत जाणवलेलं एक महत्वाचं वेगळेपण म्हणजे, व्यसनमुक्त झाल्यावर इथल्या कर्मचारी वर्गात सामावलं जाणं, ही काही सोपी प्रक्रिया नाही. इथल्या कर्मचारी वर्गात प्रत्येकाचीच अक्षरश: कुठंलही काम करण्याची तयारी असावी लागते.

कामात निकषावर उतरल्यावरच खर्‍या अर्थाने व्यसनमुक्त या कर्मचारी वर्गात प्रत्येकाचीच अक्षरश: कुठलंही काम करण्याची तयारी असावी लागते. कामात मनापासून स्वत:ची गुंतवणूक असणं, या निकषावर उतरल्यावरच खर्‍या अर्थाने व्यसनमुक्त या कर्मचारी वर्गात सामावले जातात. मुक्तांगणमध्ये आल्या आल्या रूग्णाला होणारा Withdrawal Symptoms चा त्रास, सतत होणार्‍या उलट्या, प्रसंगी रूग्णाचं आक्रमक होणं, हे सगळं जेव्हा भोवतालचे सहकारीच निस्तरतात, घरच्यांनीही केली नसती इतक्या मायेने सर्व प्रकारची शुश्रुषा करतात. तेव्हा रूग्णाला त्यांच्याविषयी आपुलकी तर निर्माण होतेच, पण आपणही कधीतरी याच अवस्थेत होतो व आपल्याला होणारा त्रासही आपल्या सहकार्‍यांनी असाच निस्तरला होता, ही जाणीव मुक्तांगणच्या कर्मचारी वर्गात दिसते.


आपलंच कधीकाळचं प्रतिबिंब समोरच्या रूग्णात दिसत असल्याने आपण फार काही मोठं करतो आहोत, असा कुठलाही अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात दिसत नाही. उलट, अशोक पवार आणि नितीन देऊस्कर या दोघांच्याही तोंडून अगदी सहज वाक्य बाहेर पडलं, “आम्ही हे स्वत: साठीच करतो आहोत." म्हणूनच मुक्तांगणच्या सर्व व्यवस्थेत एक प्रकारचा मोकळेपणा आणि उत्साह दिसतो. कोणीही ओढल्या चेहर्‍याने कामे रेटताना दिसत नाही. ‘डॉ. अनिता अवचट’ नावाचा एक मूर्तिमंत चैतन्य इथल्या वातावरणात अजूनही दरवळतं आहे. त्यांनी घालून दिलेली घडी, कार्यपध्दती इथल्या प्रत्येकाच्या अंगात ‘भिनलेली’ दिसते.

सर्वात महत्वाचं म्हणजे, व्यसनी माणसाला एक ‘जबाबदार स्वतंत्र व्यक्ती’ म्हणून व्यसनमुक्त झाल्यानंतर जगता यावं, असा मुक्तांगणच्या उपचारांचा रोख असतो. व्यसनासंबंधाची वैद्यकीय परिभाषा, उपचारपध्दती हे सगळं रूग्णाला ‘समजावून’ दिलं जातं. त्याने यांत्रिकीपणे उपचारांना प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा असते आणि खूप मोठ्या प्रमाणात ती पूर्ण होतानाही दिसते. म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या मानसशास्त्राच्या शिक्षाणाच्या रूढ चौकटीतून ‘पदवी’ घेऊन आलेले समुपदेशक Councellars इथे नाहीत.

पण तितकंच शास्त्रीय आणि पारिभाषिक ज्ञान असलेले आणि त्याबरोबरच प्रत्यक्ष व्यसनाच्या वेदनांचाही अनुभव घेतलेले व्यसनमुक्तच इथे समुपदेशकाचे काम करतात. म्हणूनच त्यांचा सल्ला हा कोरडा उपदेश राहात नाहीत. ते समान पातळीवर केलेलं ‘शेअरिंग’ बनतं.

शिवाय मुक्तांगणचा कर्मचारी वर्ग म्हणजे एकेकाळचे इथलेच व्यसनमुक्त असल्याने येणार्‍या प्रत्येक रूग्णाला इथे खर्‍या अर्थाने ‘सह-अनुभूतीने’वागविलं जातं. त्याची दया किंवा कीव केली जात नाही.

अशोक पवार, नितीन देऊस्कर किंवा त्यांच्यासारख्याच इतर व्यसनमुक्तांशी बोलताना सतत एक गोष्ट जाणवत होती की, आपल्या भूतकाळाविषयी कोणत्याही प्रकारचे ‘गंड’ यांच्या मनात उरलेले नाहीत. ‘नको त्या आठवणी’ असा दृष्टीकोन तर दिसत नाहीच, उलट स्वत:च्या अगदी स्वभावदोषांविषयी सुध्दा ते मोकळेपणाने बोलत असतात. त्यांच्याशी बोलताना वाटलं, कित्येकदा तुमच्या आमच्यासारख्या ‘नॉर्मल’ म्हणवणार्‍या माणसांना सुध्दा स्वत:च्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या छोट्याछोट्या अप्रिय घटनांविषयी बोलणं नको वाटतं. ते आठवून ‘त्रास होतो’

मात्र यांचा भूतकाळ तर त्यापेक्षा कित्येक पटीने त्रासदायक आठवणींनी भरलेला असू शकतो. त्याविषयी ते इतक्या सकरात्मकपणे मोकळेपणाने कसे काय बोलू शकतात? याचं कारण एकच की, आपण भूतकाळातील आठवणींमध्ये सतत मनाने नकळत ‘गुंतलेलो’ असतो, म्हणून त्यांच्याकडे तटस्थपणे तिर्‍हाईताच्या दृष्टीने पाहिलं जात नाही. मुक्तांगणमधल्या Councelling मध्ये रूग्णांशी संवाद साधताना नेमकी हीच गोष्ट टाळण्याचं त्यांना शिकवलं जातं. स्वत:चा भूतकाळ सकारात्मकपणे आहे तसा ‘स्वीकारण’ आणि वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करणं त्यांच्यात रूजवलं जातं. म्हणूनच त्या आठवणी ‘अप्रिय’ बनविणारे मनातील धागे ते अलगद सोडवून घेऊ शकतात. शिवाय व्यसनामुळे जे नुकसान झालं. त्याची जबाबदारी पूर्णपणे आपल्या स्वभावदोषांवर आहे. हे भान त्यांच्या बोलण्यातून सतत दिसतं. कुटुंब, नातेवाईक, परिस्थिती इतर कुणावरही स्वत:विषयी कोणत्याही अवास्तव प्रतिमा मनात निर्माण न करण्याचा हा ‘डोळसपणा’ आणि स्वीकारशीलता रूजल्यामुळेच ते पुढच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांमध्येही या जाणीवा अभावानेच आढळतात.

असा ‘डोळसपणा’ इथल्या कार्यपध्दतीत प्रत्येकच ठिकाणी दिसतो. अगदी मुक्तांगणच्या प्रार्थनेत सुध्दा मुक्तांगणने स्वीकारलेली प्रार्थना ही निधर्मी तर आहेच. पण कोणत्याही प्रकारच्या ईश्वरी प्रतिमेचं पूजन, गुणगान त्यात नाही. सुदृढ मानवी आयुष्यासाठी आवश्यक असणारा दृष्टीकोन अत्यंत साध्या शब्दात त्यात मांडलेला आहे वरवर पाहता ‘साधी’ वाटणारी ही प्रार्थना व्यसनी व्यक्तींसाठीच नव्हे, तर तुमच्या आमच्या सारख्यांनाही अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे.

जे टाळणे अशक्य
दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे,
‘निर्धार’ दे कराया
मज काय शक्य आहे,
माझे मला कळाया,
दे बुध्दी देवराया!

जी परिस्थिती मी बदलू शकत नाही. ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो. ती बदलण्याचे धैर्य मला दे. आणि अशा परिस्थितीतील भेद जाणण्याचे ज्ञान मला दे.