आपणही खूप काही करू शकतो. असा विश्वास वाटायला लागला. ‘मुक्ता मॅडम’ विषयीची कृतज्ञता त्याच्या शब्दाशब्दातून सतत जाणवते. मुक्तामॅडम बद्दलचा हा विश्वास, आदर मुक्तांगणमधील सर्वांच्याच बोलण्यातून सतत प्रत्ययाला येतो.
व्यसनमुक्तीमध्ये रूग्णाच्या घरच्यांचा सहभागही अत्यंत महत्वाचा असतो. ‘मुलांवर एवढे चांगले संस्कार केले, तरी वाया गेला हो’! असं म्हणून नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता, धीर न सोडता सतत ८ ते १० वर्ष नितीनच्या व्यसनमुक्तीसाठी डोळस प्रयत्न करणार्या त्याच्या वडिलांना फार मोठं श्रेय द्यायला हवं. ऍल्काहोलिक ऍनॉनिमस च्या बैठकांना ते स्वत: अत्यंत नियमितपणे हजर रहात. आता नितीन स्वत:च्या स्वभावदोषांकडे डोळसपणे पहायला लागला आहे. मुक्तांगणमध्ये अनेक जबाबदार्या तो मनापासून पार पाडतो आहे. एखादं काम मनापासून करण्यातला आनंद काय असतो हे अनुभवतो आहे. कोणत्याही मोहाला बळी पडून लोकांना फसवायला गेलो तर मीच फसेन, ही फार महत्वाची जाणीव निर्माण झाली आहे.
समाजाच्या दृष्टीने ‘संपल्यातच’ जमा झालेल्या अशा अनेक व्यसनमुक्तांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची अशी कोणती ‘किल्ली’ मुक्तंगणला गवसलेली आहे? याच उत्तर मुक्तांगणच्या कार्यपध्दतीत लपलेलं आहे. मुळातच, मुक्तांगणच्या दृष्टीने ‘व्यसनमुक्ती’ याचा अर्थ ‘दारू सुटणे’ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. ती तर फक्त सुरूवातच आहे. पण व्यसन हा एक ‘आजार’ आहे. आणि उपचार केवळ आजार दूर करण्यापुरतेच पुरेसे नाहीत, त्यामागचा आजाराला बळी पडू शकणारा ‘स्वभाव’ बदलायला हवा. हे तत्व पाळत आल्यानेच कित्येक हजार व्यसनमुक्तांच्या आयुष्यात हा आमूलाग्र बदल ‘मुक्तांगण’ ला घडविता आलेला आहे.
मुक्तांगणमधील ३५ दिवसांचे उपचार संपले की, रूग्णाचा गेलेला आत्मविश्वास, भोवतालच्याजगात पुन्हा मिसळण्याची हरवलेली मानसिक शक्ती, मनात निर्माण झालेले कित्येक गंउ, या सार्यावर ३५ दिवसांत उपचार शक्य नसतात. मुक्तांगणमधून बाहेर पडलेल्या कित्येक रूग्णांना त्याचं स्वत:च घरही स्वीकारेल की नाही याची शाश्वती नसते. म्हणूनच, व्यसनमुक्ती ही एक प्रक्रिया आहे, हे इथे रूग्णांच्या मनावर बिंबवलं जातं. बाहेरच्या जगात एकदम अंगावर येणारे ताण, स्पर्धा, यामुळे रूग्ण पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते. या सगळ्या ताणांना इथल्या सहकार्यांशी ‘शेअरिंग’ करताना वाट मिळते. आणि वाट पुन्हा चुकण्यापूर्वीच सावरलं गेल्याने पुन्हा व्यसनाधीन होण्याची शक्यता बर्याच अंशी कमी होते. ‘मुक्तांगण’ हे आमचं हक्काचं घर आहे. ही अनेक व्यसनमुक्तांच्या तोंडून ऐकायला मिळालेली, भावना, याच आपुलकीचं द्योतक आहे.
शिवाय मुक्तागणचा कर्मचारी वर्ग म्हणजे एकेकाळचे इथलेच व्यसनमुक्त असल्याने येणार्या प्रत्येक रूग्णाला इथे खर्या अर्थाने ‘सह-अनुभूतीने’ वागविलं जातं. त्याची दया किंवा कीव केली जात नाही.
हे मुक्तांगणच्या कार्यपध्दतीतील अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इथे येणारा प्रत्येक रूग्ण हा जगाच्या द्रुष्टीने एक ‘व्यसनी’ असला तरी तो प्रथम माणूस आहे, केवळ त्याची वाट चुकलेली आहे, हे भान इथे रूग्णाशी संवाद साधताना सतत बाळगलं जातं, ‘व्यक्ती’ म्हणून असणारा त्याचा आत्मसन्मान जागवण्याची आणि जोपासण्याची दक्षता घेतली जाते. म्हणून, मुक्तांगणचे उपचार वरवरचे रहात नाहीत. मुळातल्या स्वभावदोषांचा शोध घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
शिवाय, मुक्तांगणच्या कार्यपध्दतीत जाणवलेलं एक महत्वाचं वेगळेपण म्हणजे, व्यसनमुक्त झाल्यावर इथल्या कर्मचारी वर्गात सामावलं जाणं, ही काही सोपी प्रक्रिया नाही. इथल्या कर्मचारी वर्गात प्रत्येकाचीच अक्षरश: कुठंलही काम करण्याची तयारी असावी लागते.
कामात निकषावर उतरल्यावरच खर्या अर्थाने व्यसनमुक्त या कर्मचारी वर्गात प्रत्येकाचीच अक्षरश: कुठलंही काम करण्याची तयारी असावी लागते. कामात मनापासून स्वत:ची गुंतवणूक असणं, या निकषावर उतरल्यावरच खर्या अर्थाने व्यसनमुक्त या कर्मचारी वर्गात सामावले जातात. मुक्तांगणमध्ये आल्या आल्या रूग्णाला होणारा Withdrawal Symptoms चा त्रास, सतत होणार्या उलट्या, प्रसंगी रूग्णाचं आक्रमक होणं, हे सगळं जेव्हा भोवतालचे सहकारीच निस्तरतात, घरच्यांनीही केली नसती इतक्या मायेने सर्व प्रकारची शुश्रुषा करतात. तेव्हा रूग्णाला त्यांच्याविषयी आपुलकी तर निर्माण होतेच, पण आपणही कधीतरी याच अवस्थेत होतो व आपल्याला होणारा त्रासही आपल्या सहकार्यांनी असाच निस्तरला होता, ही जाणीव मुक्तांगणच्या कर्मचारी वर्गात दिसते.
मुक्तांगणचा परिसस्पर्श - व्यसनमुक्तीची कोणतीही एकच...
- Details
- Hits: 6319
0