भास होणं सुरू झालेलंच होतं. एक दिवस ओळखीच्या एका हमालाने अशोक पवार यांना अशा भयानक अवस्थेत रस्त्यावर पडलेलं पाहिलं आणि घरी नेऊन पोहोचवलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली होती की, पुन्हा पूर्वीचाच ‘उपाय’ अंमलात आणण्यावाचून घरच्यांना दुसरा पर्यायच नव्हता. पुन्हा एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यावेळी मेंटल हॉस्पिटलमधील औषधोपचार पूर्ण होऊन निरीक्षणाखाली ठेवलेल्या रूग्णांमध्ये या प्रकारच्या रूग्णांचा समावेश केला जाई. मेंटल हॉस्पिटल मधील त्या दोन वर्षाच्या आठवणी अशोक पवार यांच्या अंगावर अजूनही शहारा आणतात.
पण स्वत:च्याच हाताने तर ही परिस्थिती ओढवून घेतली गेली होती. आता तर दारूचे भयानक परिणाम लक्षात येऊनही दारू सोडण्याची मानसिक ताकद पूर्णपणे संपलेली होती.
मेंटल हॉस्पिटलमधील त्या वॉर्डाची जबाबदारी त्यावेळी डॉ. अनिता अवचट यांच्याकडेच होती. पूर्वी हमाल पंचायतीत असणार्या त्यांच्या दवाखान्यात येणार्या अशोक पवारांना त्यांनी ओळखलं. ‘मुक्तांगण’तेव्हा नुकतंच सुरू झालेलं होतं.
त्यांनी अशोक पवार यांना ‘मुक्तांगण’ मध्ये दाखल करून घेतलं. आणि भरकटत चाललेल्या श्री. पवार यांच्या आयुष्याला या एकाच गोष्टीने जी दिशा दिली, ती अत्यंत महत्वाची ठरली. कुठल्याही थरापर्यंत गेलेल्या ‘व्यसनी’ माणसाच्या गाभ्यातील ‘माणूसपण’ आरपार पाहू शकणारी डॉ. अनिता अवचटांची नजर, त्या नजरेतील प्रेमळ धाक आणि ‘माणूस सुधारू शकतो’ यावरील गाढ विश्वास यांनी अक्षरश: मरणापर्यंत गेलेल्या कित्येक ‘दारूड्या’ ना पुन्हा ‘माणसात’ आणलं. त्यांना नव आयुष्य दिलं. “मॅडम" च्या लाडक्या पेशंटस पैकी आपण एक आहोत, याचा अशोक पवार यांना अतिशय अभिमान आहे. त्यापूर्वी कित्येकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अशोक पवार यांना ‘मॅडम’ च्या एका नजरेतून काही शब्दांतून जगण्याचं बळ मिळे. डॉ. अनिता अवचट आणि श्री. पवार यांचे Councellar (समुपदेशक) श्रीरंग उमराणी यांच्याविषयी श्री. पवार यांच्या मनात अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे.
अशी सुमारे साडेतीन वर्षे गेली आणि त्यानंतर मुक्तांगण मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा व्यसन उलटलं! जवळजवळ दोन वर्ष पुन्हा पूर्वीइतकंच दारू पिणं सुरू राहिलं. दोन वर्षांनी स्वत: डॉ. अनिता अवचटांनीच अशोक पवार यांना परत बोलावून घेतलं.
कोणत्याही व्यसनी माणसाच्या बाबतीत ही ‘सुधारण्याची संधी’ पुन्हा मिळणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आपल्या हातून घडणार्या चुकाही समजावून घेऊन पुन्हा कोणीतरी आपल्यावर विश्वास दाखवतं आहे ही गोष्टच त्यांच्यातील ‘माणूसपण’ जागवायला कारणीभूत ठरते, कारण बाहेरच्या जगातून सतत नकार आणि अपमानच वाटायला येत असता डॉ. अनिता अवचटांनी नुसते ‘उपचार’ केले नाहीत, तर सर्वार्थाने श्री. पवार याचं आयुष्य मार्गी लावून देण्याची जणू जबाबदारीच घेतली. स्वत: श्री. पवार यांच्या पत्नीला पत्र लिहून त्यांनी परत बोलावून घेतलं मुक्तांगणमध्येच ते काम करू लागले. पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते मिळालेल्या पहिल्या पगाराचा चेक श्री. पवार यांना लाखमोलाचा वाटतो. कारण ‘आपणही काही मिळवू शकतो’ हा आत्मविश्वास त्या चेकने दिला होता. काही वर्षातच श्री. पवार याचं घरं उभं राहिलं आणि पत्नी व मुलासहित पुन्हा सुखी संसार सुरू झाला.
अर्थात, आजही प्रश्न, अडचणी संपलेल्या नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर माणसांत मिसळताना थोडं बिचकायला होतंच. शिवाय ‘वडील’ म्हणून मुलाशी जे जवळीक नातं- निर्माण व्हायला हवं ते अजूनही चांगल्या प्रकारे निर्माण झालेलं नाही. आता मात्र बदलला आहे, तो अशा अडचणींकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक दृष्टीने आयुष्यात येणार्या सर्वच प्रसंगांना सामोरं जाणं, वाट पाहण्याची ताकद कमावणं आणि आत्मसन्मानाची जाणीव. ही ‘मुक्तांगण’ ने दिलेली देणगी आता कामी येते आहे.
आजही कधीतरी नैराश्याच्या क्षणी दारूचा विचार मनात येतो. पण पूर्वीचे ते ‘रस्त्यावरचे दिवस’ आठवतात. ‘मॅडम’ चे शब्द आठवतात आणि पुढच्याच क्षणी आपोआप तो विचार झटकून टाकला जातो. सकारात्मक दृष्टीकोन रूजवण्याचा प्रवास आता सुरू झाला आहे.
श्री. अशोक पवार यांसारख्याच इतर व्यसनमुक्तांशी बोलताना लक्षात यायला लागलं की, व्यसनाचं स्वरूप जरी सारखंच असलं, तरी प्रत्येक माणसाचा स्वभाव, कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी यानुसार ते वेगवेगळा परिणाम घडवून जात असत.
मुक्तांगणचा परिसस्पर्श - भास होणं सुरू झालेलंच होतं...
- Details
- Hits: 6321
0