कित्येक दिवस अन्नाचा कणही मिळाला नाही, तेव्हा आर. टि. ओ जवळच्या पुलाखाली जाऊन पडलो.......
लोक दहव्या - बाराव्या दिवसाचा अंत्यविधी म्हणून पिंडदान करायला येतात.
ते खाऊन तरी पोट भरता येईल, असं वाटलं - भूक इतकी अनावर होती की ‘कावळा शिवण्यासाठी’ लोकांनी ठेवलेले पिंड अक्षरश: झेप टाकून खायचा प्रयत्न करायचो, आणि लोकांचा बेदम मारच खायचो! पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन् तास वाट पाहणारे लोक माझ्या तोंडात मात्र अन्नाचा कणही जाऊ देत नव्हते........
कावळा ते पिंड चिवडत असताना मी भिकार्यांनी खाऊन इकडेतिकडे पडलेली शितं वेचून खायचो.....‘अन्न म्हणजे काय’ हे त्या क्षणी खर्या अर्थाने कळलं. ते सगळं आज आठवलं, की आज आपण स्वप्नात आहोत की काय, असं वाटतं..."
वाचतानाही अंगावर शहारे यावेत, अशा या एकाच काय, अनेक जीवघेण्या अनुभवातून श्री. अशोक पवार गेलेले आहेत. दारूचे व्यसन माणसाला किती भीषण पातळीवर आणून ठेवू शकतं, त्याचा अत्यंत जळजळीत अनुभव त्यांनी घेतला आहे! काही वर्षापूर्वी जगाच्या दृष्टीने ‘संपल्या’ तच जमा असलेला एक ‘दारूडा’ ते आज जवळजवळ सात वर्षे व्यसनमुक्त राहून समाधानाने, मानाने जगू पाहणारा ‘अशोक पवार’ हा प्रवास कसा झाला?
जवळजवळ २०-२५ वर्षापूर्वी त्यांच्या या व्यसनाची सुरूवात झाली. मित्रांच्या संगतीत दारूची चटक कधी आणि कशी लागली, ते कळलंच नाही. आणि मग त्याचं ‘व्यसन’ बनायला काही वेळ लागला नाही! १९७५ साली स्वत:ची रिक्षा घेतली आणि त्यातून स्वत:चा पैसा हातात खेळायला लागल्यावर तर हे व्यसन अधिकच वाढलं. आणि इतक्या थराला गेलं की दारूशिवाय चालेनासचं झालं. त्याचे सर्व परिणामही दिसायला लागले. अखंड दारूच प्यायल्यामुळे पोखरलं गेलेलं शरीर, सतत चक्कर, नैराश्य यामुळे चार लोकांत मिसळण्याचीच भीती वाटू लागली! तरीही रिक्षाचा धंदा कसाबसा चालला होता. एक दिवस मात्र, या सगळ्याचा ब्रेकडाऊन झाला आणि अक्षरश: रिक्षात घेतलेले गिर्हाईक मध्येच उतरवून हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं.
खरं तर धोक्याची घंटा पूर्वीच कधीतरी वाजलेली होती. पण घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याकडे सतत दुर्लक्षच केलं होतं. आता घरच्यांवरच पूर्णपणे अवलंबून राहायची वेळ आली कारण मनात भीतीचा जबरदस्त गंड निर्माण झाला होता. उठून चालताही येत नव्हतं. कुणाशीही बोलायची भीतीच वाटू लागली होती.
जवळजवळ २५-३०वर्षापूर्वी, या व्यसनाविषयी पुरेशी जागरूकता, वेगळं उपचार केंद्र असं काहीही नव्हतं. त्यामुळे अशा रूग्णांना सरसकट ‘मेंटल हॉस्पिटल’चाच रस्ता दाखविला जायचा!
आणि तिथल्या भयानक वातावरणात रूग्णाची शारीरिक आणि मानसिक हानी जास्तच वेगाने व्हायची. केवळ ‘दारूडा’ च नव्हे. तर ‘वेडा’ असाही शिक्का मारला जायचा. आणि रूग्ण सुधारण्याऐवजी नकळत त्याच दिशेने त्याचा उलटा प्रवास सुरू व्हायच!
अशोक पवार यांनाही मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. एक वर्ष तिथे काढून किरकोळ सुधारणा होऊन ते बाहेर पडले. आणि ‘लग्नानंतर’ तरी सुधारतो का पाहू या असं म्हणून घरच्यांनी लग्न करून दिलं. लग्नानंतर एक मुलगा होईपर्यंत परिस्थिती अधिकाधिक बिघडतच गेली. हातात कामधंदा काहीच नव्हता. ते रिकामपण व्यसनात भरच घालत होतं. वडिलांच्या पेन्शनवर व बायकोच्या तुटपुंज्या उत्पन्नावर कशी तरी गुजराण चाललेली होती. स्वत:चं स्वत: उठूनही बसता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दारूच्या व्यसनाचा विळखा किती जबरदस्त असतो याच हळूहळू प्रत्यय यायला लागला. उपचार म्हणून जी काही वेदनाशामक इंजेक्शन्स् दिली जात. ती घेतल्यावर काही काळ चालता येत असे. तेवढ्या वेळाचाही उपयोग(!) करून घेऊन गुत्यापर्यंत जाऊन जमेल तेवढी दारू पिऊन यायची, असा क्रम सुरू झाला. पुढेपुढे तर दारू मिळाली. नाही की, अशा काही असह्या वेदना होत की, “दारू परवडली पण गोंधळ आवर!" असं म्हणून घरचेच लोक नाईलाजाने दारू आणून देऊ लागले. या सगळ्याला कंटाळून बायको मुलासहित माहेरी निघून गेली.
जेव्हा घरच्यांचाही आधार, संपून अक्षरश: रस्त्यावर यावं लागलं, तेव्हा दारूने कशाकशाचा घास घेतलाय हे लक्षात यायला लागलं. पण व्यसनाची वाट भयंकर निसरडी असते. एकदा का ती गुलामी पत्करली की, स्वत:हून मागे फिरायच्या वाटा बंद होऊन जातात. कारण मनावर कोणत्याही प्रकारे ताबा ठेवण्याची शक्तीच संपून जाते. आता त्या निसरड्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला होता. असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीची हवा खावी लागली. अक्षरश: रस्त्यावर मिळेल ते, पालेभाजीच्या टाकून दिलेल्या गड्ड्या इत्यादी खाऊन दिवस कंठावे लागले. कसलीही शुध्द राहिलेली नव्हती.
मुक्तांगणचा परिसस्पर्श
- Details
- Hits: 6266
0