Print
Hits: 6755

मानसशास्त्राची मदत घेण्यात गैर काय?
आपल्या मानसिक, भावनिक समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्यात गैर असे काहीच नाही उलट जीवनात यशस्वीतेकडे वाटचाल करण्यात मानसशास्त्रज्ञांचा सल्ला मोलाचा ठरतो, हे निश्‍चित.

लोक बहुतेक वेळा मानसशास्त्रज्ञाला भेटण्याचे टाळतात कां? तर त्यामुळे आपल्याला समाज वेडा ठरवेल या भीतीने. खरे तर मानसशास्त्रज्ञांविषयी आपल्या मनात असलेला गंड काढून टाकायला हवा. ज्या प्रमाणं केस कापण्यासाठी आपण ब्युटीशियनकडे जातो, कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे किंवा भाजी विकत घेण्यासाठी भाजीवाल्याकडे जातो. अगदी त्याच सहजतेने आपल्या समस्या सोडवण्यासाठी ‘मदत’ घेण्यासाठी आपण मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला हवे.

लोक अनेकदा मानसशास्त्रज्ञ सायकॉलॉजिस्ट आणि मनोचिकित्सातज्ज्ञ हा मनाचा डॉक्टर असतो. त्याने त्या विषयातील पदवी (एम.बी.बी.एस. आणि एम.डी. किंवा डी.पी.एम.) घेतलेली असते. मानसिक रोगांचे निदान करणे, त्यावर उपचार करणे हे त्याचे काम असते. मनोरूग्णांना फायदेशीर औषधे देण्याचे, शॉक उपचारपध्दती (गरज असेल तर) द्यायचे त्यांना अधिकार असतात. मानसशास्त्रज्ञ हा विषय घेऊन कुणी पदवी घेतली असेल किंवा पी.एच.डी. केली असेल तर त्याला मानसशास्त्रज्ञ म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ क्लिनिकल, इंडस्ट्रीयल, बाल, शिक्षण वगैरे मानसशास्त्रीय उपशाखांचा अभ्यास करून त्या त्या क्षेत्रात कार्यरत असतात. उदा. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ सामान्य (पण काही समस्या असलेले) आणि मनोरूग्ण दोघांवरही उपचार करू शकतो क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आपले उपचार सल्ला पध्दतीने आणि मानसिक उपचारपध्दतीने सायको थेरपी करतो. मानसशास्त्रज्ञ त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाची, त्याच्या समस्येची परीक्षा करतो. त्यासाठी काही चाचण्या असतात. उदा. पर्सनॅलिटी टेस्ट, डिप्रेशन टेस्ट वगैरे त्यामुळे त्या व्यक्तीची समस्या तपशीलवार आणि पूर्णपणे समजते.

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ असेल तर तो कारखान्यात उमेदवार निवड (नव्याने नियुक्त करण्यात येणारे लोक) करण्यात गुंतलेला असतो. त्या क्षेत्रातील व्यक्ती-व्यक्तींमधील नातेसंबंधाचे विश्लेशण तो करत असतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये बालमानसशास्त्रज्ञाची गरज असते. विद्यार्थ्याचे भावनिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना करियरसाठी सल्ला, मार्गदर्शन देण्यासाठी बालमानसशास्त्रज्ञाची मदत होते.

सर्वसामान्य माणूस (मनोरूग्ण नसलेला) जेव्ह बराच काळ निराश झालेला असतो तेव्हा तर त्याला मानसशास्त्रज्ञाची गरज असते. मानसशास्त्रज्ञाला भेटून आपल्या समस्यांची सोडवणूक करणे हे आवश्यक असते. पण प्रश्न असा आहे की, या व्यक्ती मानसशास्त्रज्ञाकडे जातात कां? ज्यावेळी मानसिक समस्या सोडविण्याचे सगळे उपाय थकतात, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनात आपण मानसिकदृष्ट्या आजारी तर नाही किंवा आपली इच्छाशक्ती इतकी कमजोर आहे - वगैरे विचार येतात.

अर्थात, या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ हेच आहे. कारण मानसिक समस्या फक्त मनोरूग्णांनाच असतात असे नाही. सर्वसामान्यालाही त्या असतात. मनोरूग्णाच्या समस्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या यात फरक आहे. तुम्ही मनोरूग्ण नसाल, पण तुमचे काही भावनिक प्रश्न असतील, ते तुमचे तुम्हाला सोडवता येत नाहीत. कारण त्या प्रश्नांकडे सर्व बाजूंनी पाहण्याची क्षमता तुमच्यात नसते. अनेक व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांनाही खुपदा हे जमत नाही मग ते यासाठी आपल्या व्यावसाय बंधूंची मदत घेतात.

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतो. हे उदाहरण पाहा. श्री. सिंग यांना लोकांशी संपर्क करणे जमत नसे. इतरांच्या उपस्थितीत चालणे वगैरे गोष्टी सिंग यांना कठिण जात असत. लोकांच्या उपस्थितीत ते स्वत:च्या बाबतीत (Concious) काटेकोर असत. त्यामुळे त्यांच्या हालचाली तणावाखाली होत असतं. मित्रांशी किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलताना त्याच्यावर मानसिक दबाव येत असे.

आपल्या कल्पना, विचार स्पष्ट करून सांगणेही त्यांना जमत नसे. या समस्या त्यांना १५ वर्षे भेंडसावत होत्या आणि जसजसा काळ जाईल तसतशा त्या अधिक जटिल बनत चालल्या होत्या.

आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मानशास्त्रामधील पुस्तके वाचली. पण त्यामुळे आपल्याला उत्तरे मिळत नाहीत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते माझ्याकडे आले. त्यांना सल्ला देताना, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हळूहळू त्यांच्या मनात संपर्काविषयी असलेल्या चुकीच्या कल्पना त्यांना जाणवून देण्यात आल्या वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांशी कसे बोलावे याचे शिक्षण त्यांना दिले. आपल्या रोजच्या जीवनात त्यांचा उपयोग करत असत. लोकांच्या उपस्थितीचा त्यांना जाणवणारा ताण नाहीसा करण्यासाठी सायकोथेरपीचाही उपयोग करण्यात आला.

मानसशास्त्रज्ञाकडे न जाण्यामागे लोकांच्या काही सर्वसामान्य भीती (Common Fears) असतात.

मानसशास्त्राकडे जावे लागणे म्हणजे आपले वेडेपण सिध्द होणे, माझ्या मित्रांना, नातेवाईकांना हे समजले तर ते काय म्हणशील? मानसशास्त्रज्ञ माझ्या समस्यांविषयी गुप्तता राखील की नाही? लोक मला वेडा म्हणशील का? माझ्या समस्या सुटलीतच कशावरून? माझ्या व्यक्तीमत्वातील दोष उघड होती. मानसशास्त्रज्ञावर मला अवलंबून रहावे लागेल.
मनात असलेली ही भीती नाहीशी करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी नीट ध्यान्यात घ्या

  1. आपणा सर्वांनाच, मग आपण मनोरूग्ण असू वा नसू - समस्या असतात. जेव्हा एखाद्या सर्वसामान्य (म्हणजे मनोरूग्ण नसलेला) व्यक्तीला मानसिक समस्या भेडसावतात, तेव्हा त्याला औषधांची किंवा शॉक-ट्रिटमेंटची गरज नसते. केवळ चर्चेतून आणि सायकोथेरपीने त्याची समस्या सुटू शकते.
  2. आपल्या क्लाएन्टकडून मिळणारी माहिती मानशास्त्रज्ञ गुप्त ठेवतो. काही वेळा आपल्या क्लाएन्टच्या समस्येविषयी तो इतरांनी बोलेल पण त्याचे नाव, पत्ता याची माहिती तो इतरांना कधीच देणार नाही.

मानसशास्त्रज्ञाला टाळण्याचा तुम्ही जितका प्रयत्‍न कराल, तितकी तुमच्या समस्यामधील गुंतागुंत वाढत जाईल आणि त्यावरील उपचारपध्दतीही वेळ काढू होईल.

क्लिनिकल मानशास्त्रज्ञाच्या प्रयत्‍नाबरोबर तुमचे स्वत:चे सहाकार्यही महत्वाचे असते. मानसशास्त्रज्ञाशी तुम्ही मोकळेपणाने बोलले पाहिजे. आपल्या समस्यांविषयी मानसशास्त्रज्ञाला सांगणे आणि उपचारपध्दती नीट समजावून घेणे आवश्यक असते. या पध्दतीने तुमच्या समस्या तुम्ही कमीत कमी वेळात सोडवू शकता.

आपला क्लाएन्ट भावनिकदृष्ट्या सशक्त कसा होईल. याकडे मानसशास्त्रज्ञ लक्ष देतो, त्याला आपल्यावर अवलंबून ठेवत नाही त्याची निर्णयक्षमता अधिक प्रगल्भ करतो, आपल्या क्लाएन्टचे निर्णय मानसशास्त्रज्ञ घेत नाही.

थोडक्यात, आपल्या मानसिक, भावनिक समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राची मदत घेण्यास गैर असे काहीच नाही. उलट जीवनात यशस्वीतेकडे वाटचाल करण्यात मानसशास्त्रज्ञाचा सल्ला फार मोलाचा ठरतो, हे निश्‍चित.