संवेदना फाउंडेशन ह्या स्वमदत गटाच्या मासिक सभा, सल्ला केंद्र हे उपक्रम तर अव्याहतपणे चालूच असतात, परंतु ते सोडून इतरही बरेच उपक्रम सतत सुरू असतात. त्यापैकी काही महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे:
- इंडियन एपिलेप्सी असोसिएशनच्या पुणे विभागाची सुरवात डॉ. नंदन यार्दी यांनी संवेदना फाऊन्डेशनच्या संयुक्त विद्यमाने केली. हा समारंभ पुण्याला २ सप्टेंबर २००७ रोजी आयोजित करण्यात आला होता. संवेदनाच्या सभासदांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाची सुरवात करण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ. नंदन यार्दी हे IEA च्या पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत. डॉ. हेमंत संत, डॉ. सतिश निराळे, सौ. राधिका देशपांडे हे या विभागाचे विश्वस्त आहेत तर सौ. यशोदा वाकणकर या IEA च्या पुणे विभागाच्या चिटणीस पदी कार्यरत आहेत.
- २५ जानेवारी २००८ रोजी पुण्यातील सर्व स्वमदत गटांचा मैत्रीमंच - सेतू - या गटाची स्थापना झाली. अगदी १५ डिसेंबर २००७ रोजी स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन ने पुण्यातील १२ स्वमदत गटांना आमंत्रित केले होते. उपस्थित असलेल्या सर्व गटांच्या प्रमुखांनी स्वमदत गट चालवताना येणा-या समस्यांचे अनुभव कथन केले. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले स्वमदत गट हे एपिलेप्सी, मानसिक आरोग्य, व्यसन, स्किझोफ्रेनिया, स्तनाचा कर्करोग, व्यसनी व्यक्तींच्या पत्नी, आत्महत्या निवारण, कोड, पार्किन्सन्स व अनामिक मद्यपि सारख्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. प्रत्येक गटास सर्व स्वमदत गटांच्या कार्यात काही ना काही साम्य दिसून आले. जर सर्व गट एकत्र आले तर एकमेकांना सहाय्य तर होईलच पण समस्यांवरही मात देखील करता येईल हे या कार्यशाळे दरम्यान त्यांना आढळून आले. तसेच आपापल्या क्षेत्रात येणा-या समस्यांना तोंड देण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी नवे व सुधारीत मार्ग त्यांना मिळाले. खरतर यासाठीच सेतूची निर्मिती करण्यात आली होती. संवेदनाला आपण सेतूचा एक हिस्सा असण्याचा अभिमान वाटतो.
- यशोदा वाकणकर यांना ई-टिव्ही मराठी (E TV MARATHI) या दुरदर्शनवर प्रसारीत होणा-या मराठी वाहिनीवरील ’संवाद’ या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम राजू परुळेकर यांनी सादर केला होता. त्याच प्रमाणे आय.बी. एन. लोकमत (IBN Lokamat) या वाहिनीवर १७ नोव्हेंबर या एपिलेप्सी दिनानिमित्त त्यांची मुलाखतही प्रसारीत झाली होती. नवीन निघालेली मराठी "साम वाहिनी" ह्यावर सुद्धा यशोदा वाकाणकरांची मुलाखत झाली. संवेदनाच्या सभासदांनी आकाशवाणी पुणे व एफएम मुंबई या वाहिन्यांवर एपिलेप्सी जागरुकतेसाठी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत.
सिंगापुर एपिलेप्सी कॉंग्रेस
- ७ जुलै २००७ रोजी यशोदा वाकणकर व राधिका देशपांडे संवेदना फाऊन्डेशनच्या वतीने सनटेक सिटी इंटरनॅशनल कॉन्वेन्शन सेंटर मध्ये उपस्थित होत्या. तेथे एपिलेप्सीसहित जगणा-या लोकांविषयी व त्याच्या सहाय्यासाठी परिसंवाद आयोजित केला होता.
- संशोधन: सबा मर्चंट या अमेरीकेत राहणा-या विद्यार्थिनीने आरोग्य.कॉमवर संवेदना विषयी वाचले व ती एपिलेप्सीवर संशोधन करण्यासाठी पुण्यात आली होती. तिच्या संशोधनाचा विषय होता भारतामधे धार्मिकता एपिलेप्सी पिडीत लोकांना बरे होण्यामधे बाधा आणते का? कसे?. ती संवेदनाच्या चर्चासत्राला उपस्थित होती आणि तिने सभासदांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. यशोदा आणि सबा यांनी पुण्यानजिकच्या नसरापुर या ग्रामिण भागाला भेट दिली आणि तेथिल एपिलेप्सी पिडीतांशी संवादही साधले.
- इंडियन एपिलेप्सी असोसिएशन आणि इंडियन एपिलेप्सी सोसायटी ह्या दोन प्रख्यात संस्थांतर्फे दर वर्षी भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमधे कॉन्फरन्सेस भरविल्या जातात. ऑक्टोबर २००८ मधे मुंबईला भरलेल्या एपिलेप्सी परिषदेत संवेदनाचे १५ सभासत उपस्थित होते. तेथे यशोद वाकणकर ह्यांना "विवाह आणि एपिलेप्सी" ह्या विषयावर बोलण्याची संधी मिळाली.