Print
Hits: 3620

६ सप्टेंबर २००९ ह्या दिवशी संवेदना फाऊंडेशनच्या अहमदनगर शाखेचे उद्घाटन झाले
अहमदनगरचे प्रथितयश डॉक्टर डॉ रविंद्र सोमाणी आणि त्यांच्या पत्नी नंदा सोमाणी ह्यांनी अहमदनगर येथे एपिलेप्सी स्वमदत गट, पॅरालिसिस (लकवा) स्वमदत गट, आणि मायग्रेन (डोकेदुखी) स्वमदत गट एकाच वेळी सुरू झाल्याचे जाहिर केले.

महाराष्ट्रात पुणे आणि काही प्रमाणात मुंबई येथे अनेक स्वमदत गट चालतात. परंतु मराठवाड्यासारख्या ठिकाणी अजून स्वमदत गटाची संकल्पना रुजायची आहे. त्यामुळे असे स्वमदत गट सुरू होणे हे अहमदनगर वासीयांना तसे नवीनच होते. अनेक जणांनी "स्वमदत गट म्हणजे नेमके काय?" असा प्रश्न कार्यक्रमाच्या आधी विचारला. परंतु कार्यक्रमानंतर ह्याबद्दल सर्वांचे शंकानिरसनतर झालेच, शिवाय गटांच्या सभांना नियमीत येण्याचा उत्साह सुद्धा दिसला.

डॉ. रविंद्र सोमाणी ह्यांनी सुरवातीला प्रास्ताविकात त्यांचा हा गट सुरू करण्यामागचा हेतू आणि उद्देश ह्याची माहेती सांगितली. तसेच त्यांना त्यांच्या सहका-यांची लाभलेली मदत ह्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आणि हे तीनही स्वमदत गट असेच नेटाने सुरू रहातील ह्याची त्यांनी ग्वाही दिली.

कार्यक्रमातील वक्त्या यशोदा वाकणकर ह्यांनी डॉ रविंद्र सोमाणी, त्यांच्या पत्नी नंदा सोमाणी आणि त्यांचे सहकारी ह्यांचे मनापासून अभिनंदन केले, आणि नंतर "स्व-मदत गट म्हणजे काय?" ह्या विषयावर सविस्तर विवेचन केले.

त्यांनी सांगितले की आपण एखाद्या व्याधीतून जात असतो, तेव्हा आपण खूप एकटे पडतो. आपल्याला वाटते, की मलाच का हे झाले? पण जेव्हा आपल्याला एखादी त्याच व्याधीतून जाणारी व्यक्ती भेटते, सहवेदनेतून जाणारी व्यक्ती भेटते तेव्हा एक खूप छान दिलासा मिळतो. मन मोकळं करायला एक जागा मिळते. आणि सहवेदनेतून जाणारी व्यक्ती आपल्या अडचणीतील दाहकता नक्कीच समजून घेऊ शकते. दुस-याचे दु:ख ऐकून घेतल्यावर आपण आपल्या दु:खाकडे अधीक डोळसपणे पाहू शकतो. आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या अडचणीशी सामना करण्यासाठी नक्कीच होतो.

अल्कोहोलिक ऍनॉनिमस हा जगातला पहिला, आद्य स्व-मदत गट समजला जातो. १९३५ साली बिल आणि बॉब हे दारूच्या आहारी गेलेले दोघेजण एका संध्याकाळी एकत्र आले. ते गप्पा मारत बसले, आणि त्यात त्यांची संध्याकाळ सरून गेली. त्यांच्या लक्षात आलं की आज ते दोघेजण एकत्र असल्याने दारूपासून दूर राहू शकले. त्यातून अल्कोहोलिक ऍनॉनिमसचा जन्म झाला. मग स्वमदत गट ही संकल्पना इतरही व्याधींसाठी वापरली जाऊ लागली. आणि इतर व्याधींचे स्वमदत गट जन्मास येऊ लागले.

त्यानंतर वाकणकर ह्यांनी स्वमदत गटाची प्रार्थना सर्वांकडून म्हणून घेतली:
"जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया."

"देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्विकारण्याचे धैर्य मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो, ती बदलण्याचे सामर्थ्य मला दे; आणि या दोहोंमधील फरक जाणण्याची ज्ञान मला लाभू दे."

संवेदन फाऊंडेशनचा एपिलेप्सी स्वमदत गटाची सुरवात कशी झाली ह्या विषयी सांगून वाकणकर ह्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

सौ. रश्मी जेशी, संवेदना फाऊंडेशनमधील एक उत्साही कार्यकर्त्या आणि पालक, ह्यांनी एक पालक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला ह्या स्वमदत गटात येऊन फायदा कसा झाला ह्यविषयी सुद्धा त्यांनी सांगितले. आणि नंतर त्यांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

श्री. मोहन फाटक एपिलेप्सी सहित जगणा-या व्यक्तींना लग्नासाठी काय काय अडथळे येतात, ह्या विषयी बोलले. संवेदना फाऊंडेशनने दोन वर्षांपासून सुरु केलेल्या एपिलेप्सी वधू वर मंडळ आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद ह्याविषयी त्यांनी समर्पक माहिती दिली.

डॉ. अविनाश चांदणे, डॉ. हेमंत सोले, आणि डॉ. अमिता ओभान हे तिघे अनुक्रमे एपिलेप्सी, पॅरालिसिस आणि डोकेदुखीचे स्वमदत गट चालवणार आहेत. ह्यापैकी प्रत्येक व्याधीसहीत जगणा-या एकेकाने आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी डॉ. सोमाणींविषयी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली.

शेवटी डॉ. जयंत करंदीकर, कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे ह्यांचे अतिशय सुंदर आणि प्रभावी भाषण झाले. औषधोपचाराबरोबरच एखाद्या आजारातून बाहेर येण्यासाठे आपले मनोधैर्य कसे महत्त्वाचे असते, आणि त्यासाठी योगवुद्या, प्राणायाम, ओंकार अशा अनेकविध प्रकारांचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, ह्याचे त्यांनी प्रात्यक्षिकांसहीत सर्व प्रेक्षकांना अनुभव दिला.

स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.