Print
Hits: 4936

संवेदना फाऊण्डेशन, पुणे येथील एपिलेप्सी स्वमदत गटाने २२ फेब्रुवारी २००८ रोजी चार वर्षे पूर्ण केली. आम्ही आमचे कार्य ’ना नफा ना तोटा’ या तत्वाने चालवत असतो. आम्हाला माहित आहे की अजून आम्हाला बरेच अंतर गाठायचे आहे, अजूनही आम्हाला ब-याच गोष्टी मिळवायच्या बाकी आहेत. तरीही हा एक असा मोठा पल्ला आम्ही गाठला आहे जो आम्हाला आमच्या प्रगतीविषयी विचार करायला व नवी पाऊले उचलण्यासाठी प्रेरणा देतो.

एपिलेप्सी विवाह सुचक मंडळ
पुण्यातील एपिलेप्सी स्वमदत गटातील सभासद १८ ते ३५ वयोगटातील आहेत. याचे एक साधे कारण आहे. एपिलेप्सीसहित जगणा-या लहान मुलांसाठी त्यांचे पालक जागृक असतात. पण १८ वर्षांनंतर एपिलेप्सीसहित जगणारे आमचे मित्र स्वतःला स्वतःच प्रेरणा देतात, ते नियमितपणे मिटींगला यायला लागतात. आम्ही नेहमीच त्यांच्या वयोमानानुसार कार्यक्रम घेतो. आम्हाला पहिल्यापासूनच या वयोगटामधे लग्न हा गहन आणि महत्त्वाचा विषय असल्याचे दिसून आले. एखाद्या मुलीचे एपिलेप्सीचे झटके जरी पूर्ण थांबले असले तरीही इतर स्थळे तिला नाकारतात.

एपिलेप्सीसहित जगणारे पालक व लोक नेहमीच लग्न व त्यांचे अपयशी आयुष्याबाबतीत चिंताग्रस्त असायचे. पालकांपैकी एक असलेले श्री. मोहन फाटक यांनी पुढाकार घेतला व वर्षभरापूर्वी (फेब्रुवारी २००७) संवेदना फाऊण्डेशनच्या विवाह सुचक मंडळाची स्थापना केली. आम्ही संबंधित विषयावर स्थनिक वर्तमानपत्रात लेख लिहिले (ऑक्टोंबर २००७) आणि आम्हाला त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसेच महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात स्थित असलेले मराठी नागरिक, ज्यांनी ऑनलाईन हे लेख वाचले त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. आजतागायत जवळजवळ २०० एपिलेप्सीसहित जगणा-या लोकांनी आमच्या या विवाह सुचक मंडळात आपले नाव नोंदवले आहे. आजपर्यंत आमच्या गटातील जवळजवळ ८ जोडप्यांनी लग्न केले आहे यामुळे आम्हाला आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल अभिमान वाटतो. अजून काही सभासदांचा साखरपुडा झालेला असून याच वर्षी त्यांचाही लग्नसोहळा संपन्न होणार आहे.

समाजात कार्यरत असलेल्या व शरीरातील वेगवेगळ्या व्याधींवर कार्य करणा-या मदत गटाशी व त्याच्या विवाह सुचक मंडळाशी आम्ही जोडलेले आहोत. तसेच आम्ही समाजातील इतर मदत गटांच्या विवाह सुचक मंडळांच्याही संपर्कात आहोत. जर एखाद्या एपिलेप्सीसहित जगणा-या व्यक्तीस एपिलेप्सी असणारा साथिदार नको असेल तर त्याला दुसरी समस्या असलेल्या जोडीदाराचा पर्याय समोर ठेवला जातो.

संवेदना विवाह सुचक मंडळाचा वधु-वर मेळावा
संवेदना फाऊण्डेशन ११ मे २००८ रोजी एपिलेप्सीसहित जगणा-या व्यक्तींसाठी वधु-वर मेळावा आयोजित केला होता. तसेच जे लोक एपिलेप्सी असणा-या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी तयार आहेत अशाही व्यक्ती या मेळाव्यास आल्या होत्या. भारतात भरलेला हा पहिला वधुवर मेळावा होता. ह्या मेळाव्यास महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून सुद्धा एपिलेप्सी सहित जगणारी २१ मुले आणि २८ मुली आल्या होत्या. ह्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या मेळाव्याचे पुणेकरांकडून चांगलेच स्वागत झाले.

एपिलेप्सी वधुवर मंडळात आता आपण ऑनलाईन सुद्धा नावनोंदणी करू शकता. www.vivah.aarogya.com
कृपया नोंदणीसाठी संपर्क साधा:
संवेदना फाऊण्डेशन
सेलफोन क्रमांक: +९१ ९८५०८८७६४४ +९१ ९३७००४९९३५ किंवा +९१ ९८२२००८०३५