ई-सकाळ
पुणे, भारत,
डॉ. संजीव डोळे
होमिओपॅथीने स्वप्नांचा अर्थ लावून त्या आधारे आरोग्यनिदानाचा प्रयत्न केला आणि काही स्वप्नांवर औषधेही सुचविली आहेत...... "झोप" ही संकल्पनाच मानवी जीवनातील एक सुखद अशी अनुभूती आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या झोपेसंदर्भामधील विशिष्ट अशा सवयी आहेत व त्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असलेल्या आपण पाहत आहोत. झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या वेळा, झोपेसाठी विशिष्ट अशी अंथरूण- पांघरुणाची व्यवस्था, झोपेसाठी विशिष्ट अशी शारीरिक स्थिती हे सर्व व्यक्तींमध्ये आपणास भिन्न आढळते. मग ती बालके असोत की वयस्कर मंडळी असोत, प्रत्येकाचे जसे स्वभाववैशिष्ट्य भिन्न असते तसेच झोपेच्या तऱ्हाही भिन्न असतात.
निसर्गाने घेतलेली आपल्या प्रकृतीची एक हळुवार काळजी म्हणजे "झोप'. याच झोपेबरोबर संबंधित असलेली आणखी एक अद्भुत अशी गोष्ट म्हणजे "स्वप्ने'.
स्वप्ने हीसुद्धा एक अनाकलनीय व गूढ अशीच अनुभूती आहे, की ज्यावर अजूनही संशोधन कार्य चालू असूनही त्याबद्दल विज्ञानालाही फार काय समजू शकलेले नाही. असे असले तरी "स्वप्ने' ही गोष्टच खूप चित्तवेधक आणि मनोरंजक आहे यात शंका नाही. स्वप्ने पडणे हा मानवी मनाचा खेळ आहे, असेही समजले जाते. आपल्या मनातील सुप्त इच्छा, आपले विचार स्वप्नरूपाने आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि कधी कधी प्रत्यक्षात जे जे करणे अशक्य वाटते ते ते आपण स्वप्नांच्या दुनियेमध्ये मुक्तपणे अनुभवत असतो.
काहींना फक्त स्वप्ने पडतात एवढेच आठवते, तर काहींना वारंवार तीच तीच स्वप्ने पडत असतात. काही स्वप्ने आनंददायी असतात, काही भविष्यकाळाची सूचना देणारी असतात; तर काही चमत्कारिक, काल्पनिक किंवा गूढ अशीसुद्धा असतात. पुष्कळ वेळा या स्वप्नांचा वास्तवाशी संबंध लागू शकतो किंवा पुष्कळदा ही स्वप्ने अनाकलनीय अशी असतात.
पण आपल्या प्रकृतीचा आणि या स्वप्नांचा निश्चित असा एक संबंध आहे, की ही गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल. आश्चर्याची गोष्ट अशी, की साधारणतः २५० वर्षांपूर्वी होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमान या महान शास्त्रज्ञाने या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे सखोल असा अभ्यास केला असून मानवाच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीमध्ये या स्वप्नांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सिद्ध केलेले आहे व या गोष्टींचा उपयोग औषधोपचारामध्ये केला गेलेला आहे.
होमिओपॅथीमध्ये रोगापेक्षा रोगी हा महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा एखाद्या रुग्णाची चिकित्सा करावयाची असते त्या वेळी त्या रुग्णाच्या प्रकृतीचा सर्व बाजूंनी विचार केला जात असतो. सर्व बाजूंनी म्हणजेच रुग्णाचा पूर्वेतिहास, त्याची शारीरिक व मानसिक जडणघडण, त्याच्यावर झालेले मानसिक आघात, त्याला आधी झालेले इतर काही आजार व त्यावर करण्यात आलेले उपचार किंवा काही आनुवंशिक असे आजार या सर्व लक्षणांचा एकत्रितपणे ANALYSIS AND EVALUATION केले जाते. असे औषध शोधून काढत असताना एकापेक्षा अधिक औषधे जर समोर येत असतील तर अंतिम औषधासाठी त्याच्या मानसिक व वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना महत्त्व दिले जाते. त्यामध्ये स्वप्नांना अग्रक्रम दिला गेलेला आहे. यावरून या स्वप्नांना उपचारांमध्ये किती महत्त्व दिले गेलेले आहे हे आपल्या लक्षात येईल.
बऱ्याच जणांना पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या स्वप्नांमुळे मानसिक आणि शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. कधी कधी हा त्रास स्वप्नामुळेच होतोय हेही समजायला अवघड जाते. पण होमिओपॅथी ही एकच अशी औषधोपचार पद्धत आहे, ज्यात रुग्णाला औषधोपचार करताना त्याच्या मानसिक लक्षणांचा, त्याच्या मनःस्थितीचा विचार केला जातो. त्यामुळेच रुग्णाने औषधोपचार घेताना आपल्या डॉक्टरांना स्वप्नांविषयी अर्थात (त्याला आठवत असतील तरच) माहिती दिली, तर ती त्याला योग्य प्रकारे औषधोपचार करणारी संजीवनी ठरेल.
काही वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने व त्यासाठी वापरण्यात येणारी होमिओपॅथिक औषधे
स्वप्नात प्रवास घडणे - काली नायट्रीकम
स्वप्नात प्रेत दिसणे - ऍनाकारडियम
स्वप्नात सुखकारक दृश्य दिसणे - पल्सेटिला, नेट्र कार्ब
स्वप्नात लॉटरी लागणे - मॅग कार्ब, नॅट सल्फ
स्वप्नात सापळा दिसणे - ओपीयम
स्वप्नात स्वतः बुडताना पाहणे - व्हेराट्रम व्हीर
साधारणतः १५०० प्रकारच्या स्वप्नांचा होमिओपॅथीच्या चिकित्सा पद्धतीमध्ये विचार केला गेला आहे व अजूनही नव्या नव्या स्वप्नांचा अभ्यास चालू आहे.