Print
Hits: 11569

स्पर्धेच्या या युगात मुलांवर अपेक्षांचं ओझं लादलं जातं, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते. कोवळी मुलं हा ताण सहन करू शकत नाहीत. गरज आहे मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची, त्यांना समजून घेण्याची. त्यांच्या भल्यासाठी जरूर रागवा; पण तेवढंच प्रेमही करा...

आम्हाला समजून घ्या प्लीज

सिंहगड रस्त्यावर राहत असलेल्या एका चिमुकलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी नुकतीच वाचली. का बरं या चिमुकलीनं स्वतःला असं संपवावं? जन्मदात्या मुलांना रागवण्याचा अधिकार पण आई-वडलांना नाही का? मला आठवतं, लहानपणी कधी माझी आई लाटणं घेऊन मागे लागायची. म्हणायची, ""मेल्या तू मेला तर बरं होईल!'' हा शब्दप्रयोग करणाऱ्या आईच्या "मेल्या' या शब्दातही ओतप्रोत प्रेम भरलेलं असायचं. तो शब्द उच्चारण्याचा अधिकार निसर्गानं तिलाचा बहाल केलेला आहे. "आई' या शब्दावर अनेक कविता-लेख-कथामाला गाजताहेत. आई-बाबांना मुलांशी काही प्रसंगी कठोर वागावच लागतं. परंतु विवेकबुद्धी वापरून मध्यमार्गाचं अनुसरण हे पालकांच्या लक्षातच येत नाही.

त्यामुळे मुलांच्या भवितव्याच्या खोट्या कल्पनांना चिकटून, थोडीफार मुलं चुकली तर काही वेळेस पालक, शिक्षक वर्गातच मुलांना बेदम मारहाण करतात. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्याला शिक्षिकेने डस्टर फेकून मारल्यानंतर घाबरून वर्गातच त्या विद्यार्थ्याला झटके येऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होत्या. शेवटी अशा अनेक घटनांमुळे सरकारने विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या दोषी व्यक्तीला प्रथम एक वर्षाचा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा मारहाण केल्यास 25 हजार रुपये दंड व तीन वर्षांचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात केली. या कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावरच त्याची अंमलबजावणी होईल. परंतु खऱ्या अर्थाने यामुळे पालकांच्या, शिक्षकांच्या - विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल का?

आधुनिक स्पर्धेच्या युगात लहान मुलांवर योग्य वेळी सुसंस्कार झाले तर उद्याचा भारत महासत्ता होण्याचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. महात्मा गांधींनी म्हटले होते, शिक्षणाला नैतिक मूल्यांची जोड नसेल तर ते अधःपतनास कारणीभूत ठरते. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे मुले ही देवाघरची फुले, या फुलांना नेहमी सकारात्मक विचारसरणी व आदर्श दिला पाहिजे. आजची मुले ही उद्याची फुले, उद्याच्या उज्ज्वल भारताचे आधारस्तंभ, सबल व सशक्त होण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक राहायला पाहिजे.

जगाला पुरेल एवढं मनुष्यबळ आज आपल्या भारतात आहे. मध्यंतरी एका अभ्यासामध्ये हे स्पष्ट झाले, की सर्वांत तरुण देश भारत आहे. या अर्थाने, की जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या युवा आहे. जगावर राज्य करण्याची खरी ताकद आज आपल्याकडे आहे. कारण युवक व युवतींनी भरलेला देश आपला आहे. काहीही करण्याची ताकद आज आपल्याकडे आहे. प्रश्‍न आहे तो समजावून घेण्याचा व देण्याचा. युवकांना योग्य दिशा व अचूक मार्गदर्शन यांच्या बळावर ब्रिटिशांप्रमाणे आपणही खऱ्या अर्थाने जगज्जेते होऊ शकतो.

व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ शिव खेरा सांगतात,'You can win'या धर्तीवर युवकांनो, 'Yes, I can' असे आत्मविश्‍वासाने म्हणत पाऊल पुढे टाकले पाहिजे. "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा मंत्र "मीच घडवणार माझे जीवन' असे म्हणत आत्मसात केला पाहिजे. हाच मंत्र मनात घेऊन प्रत्येक युवकाने जिज्ञासा वाढवून खऱ्या अर्थाने जागे झाले पाहिजे. माणसे घडत नसतात; घडवावी लागतात. आत्मविश्‍वास निर्माण करावा लागतो. माझ्यातला "मी' जागा करत जग बदलण्यासाठी आधी "मी' बदलायला हवा. आताची युवा पिढी बिघडली आहे असे म्हणणाऱ्या वर्गाला दाखवायला हवे, की आम्ही उद्याचा भारत घडवणार आहोत. यासाठी युवक-युवतींनी प्रथम स्वतःला घडवायला हवे. त्यासाठी त्यांनी शरीर व मनाच्या सबलतेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ""माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा, खेळ खेळा, वासरासारखे हुंदडा, व्यायाम करा, जेव्हा तुम्ही सबल व सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कळू शकेल. म्हणून आपलं शरीर कमावण्यासाठी रोज व्यायाम करणं आवश्‍यक आहे.'' किशोरवयीन मुले निद्रानाश, रक्तदाब, मानसिक व्याधींनी ग्रस्त झालेली दिसत आहेत. वाढती स्पर्धा, चंगळवाद, नीतिमूल्यांचा ऱ्हास, घरातील वाद, भय, चंचलता, निकृष्ट आहार, स्पर्धात्मक वातावरण, परीक्षेत कमी गुण, अनिच्छेने लादलेला अभ्यासक्रम यामुळे मुले नैराश्‍यकडे जाऊ लागली आहेत.

जानेवारी 2010 च्या पहिल्याच महिन्यात एकूण 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याचं प्रमुख कारण मुलांची "दुर्बल मने' हेच होय. म्हणून मुलांच्या मानसिक सबलता व निर्मलतेसाठी ध्यानधारणा ही आवश्‍यक गोष्ट आहे. "आनापानसती' हे त्यातील एक शास्रोक्त ध्यान. श्‍वासाच्या साहाय्याने मनाची एकाग्रता व निर्मलता, सबलता वाढते. भय कमी होते, चंचलता दूर होते. मुलांची आकलनक्षमता वाढून जीवनात नैतिकता येते. 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी या साधनेचा शोध लावला. पू. गुरुजी श्री सत्यनारायण गोएंकाजींनी 1969 मध्ये ही भारतातून लुप्त झालेली साधना परत भारतात आणली. संपूर्ण साधना श्‍वासाशी संबंधित असल्यामुळे कुठल्याही जातीचा, वर्णाचा, पंथाचा, देशाचा विद्यार्थी-विद्यार्थिनी ही साधना करून आपले मन सबल व निर्मल करून ताणतणावमुक्त जीवन जगू शकतो. माणसाचा मेंदू हा एका सेकंदात 800 हून अधिक गोष्टींची नोंद घेऊ शकतो. तो 70 ते 75 वर्षे न थकता सतत काम करू शकतो. त्यात फार मोठी ऊर्जा असते. ती जागविण्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे. थॉमस एडिसन चार वर्षांचा असताना त्याला शाळेतून परत पाठवले. त्याच्या खिशात शिक्षकाने चिठ्ठी टाकली होती, ""तुमचा टॉमी शिक्षणात फार मागे आहे. तो शिकू शकणार नाही.'' याच थॉमस एडिसनने आपली अंतरिक मनोऊर्जा जागवून विजेचा दिवा तयार करून जगाला प्रकाशमान केले. त्याआधी हजारावर अधिक त्याचे प्रयोग फसले; पण तो खचला नाही. सगळा हा मानसिक प्रवृत्तीचाच परिणाम. अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात मुलाला समाजात कसे वागायचे व विषम परिस्थितीत कसे जगावे, हे शिकवण्याची विनंती केली होती. याच सामाजिक शिक्षणाची आज आपल्या मुलांना गरज आहे.

आपण आपल्या मुलांवर नुसते अपेक्षांचे ओझे लादतो. बिचारी मुले पार थकून जातात. त्यातून ती चुकीचा मार्ग पत्करतात. चित्रपटांवर आत्महत्येचे खापर फोडून पालकवर्ग मोकळा होतो. तीन तासांत सिनेमा आपल्या मुलांच्या भावनांना हात घालतो, मग जन्मापासून आपल्या बरोबर असणाऱ्या स्वतःच्या मुलांच्या भावना आपण का ओळखू शकत नाही, हा प्रश्‍न पालकांनी स्वतःला विचारला पाहिजे.

विषम परिस्थितीत कसे जगावे, हे शिकण्यासाठी, मन सबल करण्यासाठी, खऱ्या अर्थाने तणावमुक्तीसाठी ध्यान म्हणजे एक सुवर्णसंधीच होय. म्हणून पालकांनो, मुलं चुकली-आपला अपेक्षाभंग झाला तर त्यांना जरूर रागवा, पण प्रेमाने (अंतर्मनात ओतप्रोत प्रेम भरलेले असू द्या), रागवल्यानंतर तेवढेच प्रेमाने त्याला जवळही घ्या. निश्‍चितच त्यांना तुमचा आदर वाटेल.

या जगात तीन सुंदर क्रियापदे आहेत - "प्रेम करणं, मदत करणं व सेवा करणं' या तीन ईश्‍वरी क्रियापदांना रोजच्या जीवनात स्थान देऊन आपलं कुटुंब आनंदी व सुखी बनवा. आपल्या मुलांना समजून घ्या व उन्नत समाज घडवा.

Source:www.esakal.com