मुलांचे आरोग्य लेख
आम्हाला समजून घ्या प्लीज
- Details
- Hits: 12036
स्पर्धेच्या या युगात मुलांवर अपेक्षांचं ओझं लादलं जातं, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते. कोवळी मुलं हा ताण सहन करू शकत नाहीत. गरज आहे मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची, त्यांना समजून घेण्याची. त्यांच्या भल्यासाठी जरूर रागवा; पण तेवढंच प्रेमही करा...

सिंहगड रस्त्यावर राहत असलेल्या एका चिमुकलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी नुकतीच वाचली. का बरं या चिमुकलीनं स्वतःला असं संपवावं? जन्मदात्या मुलांना रागवण्याचा अधिकार पण आई-वडलांना नाही का? मला आठवतं, लहानपणी कधी माझी आई लाटणं घेऊन मागे लागायची. म्हणायची, ""मेल्या तू मेला तर बरं होईल!'' हा शब्दप्रयोग करणाऱ्या आईच्या "मेल्या' या शब्दातही ओतप्रोत प्रेम भरलेलं असायचं. तो शब्द उच्चारण्याचा अधिकार निसर्गानं तिलाचा बहाल केलेला आहे. "आई' या शब्दावर अनेक कविता-लेख-कथामाला गाजताहेत. आई-बाबांना मुलांशी काही प्रसंगी कठोर वागावच लागतं. परंतु विवेकबुद्धी वापरून मध्यमार्गाचं अनुसरण हे पालकांच्या लक्षातच येत नाही.
त्यामुळे मुलांच्या भवितव्याच्या खोट्या कल्पनांना चिकटून, थोडीफार मुलं चुकली तर काही वेळेस पालक, शिक्षक वर्गातच मुलांना बेदम मारहाण करतात. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्याला शिक्षिकेने डस्टर फेकून मारल्यानंतर घाबरून वर्गातच त्या विद्यार्थ्याला झटके येऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होत्या. शेवटी अशा अनेक घटनांमुळे सरकारने विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या दोषी व्यक्तीला प्रथम एक वर्षाचा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा मारहाण केल्यास 25 हजार रुपये दंड व तीन वर्षांचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात केली. या कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावरच त्याची अंमलबजावणी होईल. परंतु खऱ्या अर्थाने यामुळे पालकांच्या, शिक्षकांच्या - विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल का?
आधुनिक स्पर्धेच्या युगात लहान मुलांवर योग्य वेळी सुसंस्कार झाले तर उद्याचा भारत महासत्ता होण्याचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. महात्मा गांधींनी म्हटले होते, शिक्षणाला नैतिक मूल्यांची जोड नसेल तर ते अधःपतनास कारणीभूत ठरते. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे मुले ही देवाघरची फुले, या फुलांना नेहमी सकारात्मक विचारसरणी व आदर्श दिला पाहिजे. आजची मुले ही उद्याची फुले, उद्याच्या उज्ज्वल भारताचे आधारस्तंभ, सबल व सशक्त होण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक राहायला पाहिजे.
जगाला पुरेल एवढं मनुष्यबळ आज आपल्या भारतात आहे. मध्यंतरी एका अभ्यासामध्ये हे स्पष्ट झाले, की सर्वांत तरुण देश भारत आहे. या अर्थाने, की जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या युवा आहे. जगावर राज्य करण्याची खरी ताकद आज आपल्याकडे आहे. कारण युवक व युवतींनी भरलेला देश आपला आहे. काहीही करण्याची ताकद आज आपल्याकडे आहे. प्रश्न आहे तो समजावून घेण्याचा व देण्याचा. युवकांना योग्य दिशा व अचूक मार्गदर्शन यांच्या बळावर ब्रिटिशांप्रमाणे आपणही खऱ्या अर्थाने जगज्जेते होऊ शकतो.