Print
Hits: 5495

लहान मुलांना नेहमी लवकरात लवकर मोठे व्हायचे असते. त्यांना वाटते मोठे झाले म्हणजे मुक्त, स्वतंत्र, आपल्याला हवे तसे वागता येते. पण जसजशी मुले मोठी होत जातात. वयात येतात तसतशी त्यांना जाणीव होऊ लागते. की मोठे होणे ही वाटते तितकी रोमँटीक कल्पना नाही एक १६ वर्षाचा मुलगा म्हणतो,

‘लहान होतो तेव्हा मला कधी एकदा मोठा होतो याची घाई झाली होती. कॉलेजमध्ये मजा करायला कधी मिळते याची मी वाट पाहत होतो. पण आता एवढ्या मोठ्या जगात माझा निभाव कसा लागणार या काळजेने माझी झोप उडाली आहे,’ मोठे होण्यात जशी गंमत आहे, मोठी आव्हाने आहेत, त्याचबरोबर हे काय आपल्याला परिपर्णतेकडे नेते हेही लक्षात ठेवायला हवे. कुमार वय हे प्रौढत्व आणि लहानपण यांच्यामधली अवस्था आहे. या वयात अनेक शारीरिक बदल आणि मानसिक बदल होत असतात. उंची वाढणे, वजन वाढणे, आवाजात, शरीरात, त्वचेत तसेच लैंगिक अवयवात बदल होणे वगैरे शारीरिक बदल यावेळी ठळकपणे ध्यानात येतात. मानसिक बदल खालीलप्रमाणे असतात.

 1. आपल्या विकासाची शंका कुमार वयात, मुलांना नेहमी आपली वाढ योग्य तऱ्हेने होत आहे की नाही याबद्दल शंका असते. आपली उंची, वजन, लैंगिक अवयव वगैरे सामान्य आहेत की नाहीत याविषयी त्यांना कुतूहल असते. आपल्या शंका निरसन करण्यासाठी मग ते वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतात. आपल्या मित्र - मैत्रीणींबरोबर आपली तुलना करतात. आपल्यात होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी अत्यंत संतर्क राहतात. वारंवार उंची, वजन मोजण्याचा त्यांना जणू छंदच असतो. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत अशी किंचितशी शंकाही त्यांना आली तरी अस्वस्थ होतात. प्रदीपच्या चेहऱ्यावर त्याच्या मित्रांच्या तुलनेत थोडी अधिक मुरूमे होती. प्रदीप त्यामुळे इतका अस्वस्थ होता. मुरूमे नाहीशी करण्यासाठी वेगवेगळी औषधे, क्रीम्स चेहऱ्याला लावण्याचा सपाटाच त्याने सुरू केला होता.
 2. आपल्या दिसण्याची काळजी या वयात आपण कसे दिसतो ही एक शंका मुलांना छळत असते. अधिक आकर्षक दिसावे यासाठी तऱ्हेतऱ्हेचे पोशाख ती करतात. तासन्‌ तास आरशासमोर लावतात. कोणते कपडे, पोशाख करावा याचा निर्णय घेणे त्यांना कठीण जाते. अशावेळी पालकांशी त्यांचे वाद होतात. मुलांना आधुनिक फॅशनचे कपडे आवडतात आणि तेच पोशाख त्यांच्या आई वडिलांनी घ्यावे वाटतात. एक १४ वर्षाची मुलगी म्हणते, "मी कुठलेही कपडे घातले तरी माझी आई त्यावर काहीतरी वेडंवाकडें बोलतेच, मग मला खूप राग येतो, आणि त्या भरात काहीतरी फुटते".

  कुमार वय मुलांच्या विकासाचे महत्वाचे वय आहे. या वयात जर त्यांच्या मनात आपण चांगले दिसत नाही ही भावना घर करून राहिली तर पुढील काळात त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो.
 3. स्वत्वाची जाणीव: मी कोण आहे, काय आहे? लोक मला ऒळखतात का? वगैरे प्रश्न या काळात मुलांच्या मनाता गर्दी करतात. बऱ्याचवेळी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही खोड्याही मुले करतात.
 4. प्रतिष्ठा: या वयात मुलांना आपल्याला काही प्रतिष्ठा असावी, असे वाटते. कार बाळगणे, दुचाकी बाहन बाळगणे, गर्ल फ्रेंड/बॉय फ्रेंड असणे वगैरे गोष्टी त्यांना Status Symbol वाटतात आणि त्यामुळे एक उच्चपणाची, प्रतिष्ठेची भावना त्यांच्यात असते. आजकाल गर्लफ्रेंड असणे हे एक फॅड बनले आहे. ज्याला/जिला अशी मैत्रीण/मित्र नसेल, त्याला/तिला आपण कमी दर्जाचे आहोत असे वाटते. बऱ्याचवेळा कुमारवयीन मुले प्रेमभंगाची शिकार होतात. आणि आत्महत्या करतात, त्यामागे ही कमालीची भावनाच असते.
 5. भावनिकता: जसजशी मुले मोठी होतात. तसतसशी पालकांच्या आणि अवतीभोवतेच्या माणसांच्या त्यांच्या विषयीच्या अपेक्षा वाढतात. त्यांनी चांगला अभ्यास करावा चांगले वागावे. लहान भावंडांची काळजी घ्यावी वगैरे अपेक्षा व्यक्त केल्या जातात. या वयातील मुलांचे सतत दोष काढत राहिले किंवा त्यंना सतत रागवत राहिले तर ही मुले अत्यंत संतप्त होतात. कुणाशीही बोलायचे टाळतात.
 6. तसेच या वयात समूहत्वाची जाणीव त्यांच्या मनात असते. म्हणूनच कुमारावयीन मुलांसाठी मित्र अत्यंत महत्वाचे असते. त्यांचा ग्रुप त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या दृष्टीकोनावर खूप परिणाम करतो.
 7. या वयात मुले मुलींकडे किंवा मुली मुलांकडे आकर्षित होतात, भिन्न लिंगाच्या व्यक्तींशी मैत्री करण्यात त्यांना स्वारस्य असते. अनेकवेळा ही मुले प्रेमातही पडतात. पण हे प्रेम म्हणजे निव्वळ आकर्षण असते.
 8. कुतूहल: या वयात मुलांना अनेक चांगल्या वाईट गोंष्टीचे कुतूहल असते. म्हणूनच या वयात मुले धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन वगैरे व्यसनात गुंतण्याचा धोका असतो.
 9. कल्पना रम्यता: अनेक मुले आपल्या रोमँटिक, कल्पनारम्य जगात हरवलेली असतात. अनेकांना तर हे जग आणि वास्तव जग एकच वाटते आणि त्यामुळे एक मानसिक समस्या उभी राहते.
 10. स्वतंत्र होण्याची प्रबळ इच्छा: या वयात मुलांना स्वतंत्र होण्याची प्रबळ इच्छा असते. आपल्याला हवे तसे वागू द्यावे. कुणी कसालाही अडथळा करू नये असे त्यांना वाटत असते.
 11. अनेकवेळा काही मुले/मुली लवकर वयात येतात. तर काही उशीरा. लवकर वयात येणारी मुले आपल्या ग्रुपमध्ये अनेकदा दादागिरी करताना दिसतात. ही मुले मुलींमध्ये प्रियही असतात. पण जी मुले उशीरा वयात येणारी मुले नुराश, बंडखोर आणि कमी आकर्षक असतात.

लवकत वयात येणाऱ्या मुली अधिक लाजाळू स्वत:विषयी कमालीच्या जागरूक असतात. ज्या उशीरा वयात येतात. त्यांना स्वत:च्या सामान्यत्वाची शंका येत असते. वरीलपैकी अनेक समस्या काळाबरोबर नाहीशा होतात.

कुमारवयात मुलांच्या व्यक्तीमत्वात कमालीचा बदल होत असतो याच वयात मुले आपली तत्वे, मूल्ये जीवनाविषयीचा दृष्टिकोन बाळगू लागतात. कुमारवयीन मुलांना या होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी काही सूचना खाली दिल्या आहेत.

 1. प्रत्येकाची शारीरिक ठेवण, वेगवेगळ्या वयात वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे काही कुमारवयीन मुलांच्या चेहऱ्यावर मुरूमे दिसतील, काही एकदम जाड झालेले दिसतील. म्हणूनच या वयात मुलांनी आपली कुणाबरोबरही तुलना करण्याचे टाळावे.
 2. आपल्या मित्रांच्या नादाने, धुम्रपान, मद्यपान, करण्याचे मुलांनी टालाने, आपल्य निर्णय मित्रांनीस घेण्यापेक्षा स्वत:च घ्यावेत. अनुचित मार्ग टाळण्याचा तो एक चांगला मार्ग आहे.
 3. भिन्न लिंगाच्या व्यक्तींशी मैत्री करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. पण ते प्रतिष्ठेचे लक्षण नव्हे. एखाद्याला/तीला गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नसेल तर त्यात कमीपनाचे किंवा अपराधी वाटण्यासारखे काही नाही.
 4. स्वतंत्र होण्याची इच्छाही स्वाभाविक आहे पण त्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांच्या, मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आप्ल्या पालकांबरोबर मित्रासारखे वागा म्हणजे पित्याच्या समस्याही तुम्हाला कळतील आणि कुटुंवापासून तुम्ही दूर जाणार नाही.
 5. दिवास्वप्नात फार रंगू नका. मानसिकदृष्ट्या ते योग्य नाही.
 6. एखाद्या बाबीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, सल्ला हवा असेल तर पालकांची किंवा त्या त्या क्षेत्रातील ब्यावसायिकांची न घाबरता, न लाजता मदत घ्या.