Print
Hits: 4848

फ्राईड काहीही सांगत असला तरी वडिलांनी मुलाला जवळ घेणे आवश्यक असते. त्याला दुर ठेवल्याने किंवा त्याच्याशी कठोरपणाने वागल्याने त्या मुलाचे जीवन उद्‍ध्वस्त होऊ शकते, हे लक्षात ठेवा.

अनेकदा मुलांना प्रश्न पडतो आपले वडिल असे का वागतात? कठोर का वागतात? या प्रश्नाचे उत्तर फार पुर्वी सिग्मंड फ्राईने दिले आहे. त्याने ओडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सची संकल्पना मांडून मानवी स्वभावाच्या एका महत्वाच्या पैलूवर अचूक बोट ठेवले आहे. ओडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्या अंतर्मनात दडलेल्या इच्छा आकांक्षा, भावभावना यांचा समूह असतो. त्याच वेळी समलिंगी पालकाबद्दल थोडी तुटक भावना असते. ओडिपस कॉम्प्लेक्समुळे मुलीला वडिलांबद्दल अधिक प्रेम, जवळीक वाटते. फ्राईडने मांडलेल्या सिध्दान्तावर आजही उलटसुलट चर्चा होते. पण बहूतेक पुरूष आपल्या मुलांपेक्षा मुलीवर अधीक प्रेम करताना दिसतात. त्यावरून फ्राईडचा हा सिध्दान्त योग्य असावा असे म्हणण्यास हरकत नाही. वडिल मुलीचे अधिक लाड करतात आणि याचा परिणाम वडिल - मुलगा यांच्या नात्यावर होतो. तरीही, वडिलांनी जर जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले तर मुलांबरोबरचे नाते दृढ होऊ शकते.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे पालनपोषन काटेकोरपणे व्हावे असे वाटते. ते मुलांची काळजी घेतात. त्यांना वळण लावतात. पण कित्येकदा वळण लावताना, त्याच्यांवर संस्कार करताना, हातून चुका घडण्याची शक्यता असते. त्याचीही जाणीव आपण ठेवायला हवी.

हा लेख विशेषत: वडील लोकांसाठी लिहिलेला आहे. आपल्या मुलाचा बाप म्हणून तुम्हाला त्याची काळजी असते. पण तुमच्या मुलाला तुमची काळजी कळेलच असे नाही. माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या अनेक मुलांची एक तक्रार मी नेहमी ऐकते, ‘मला माझ्या वडिलांची भीती वाटते’. त्या मुलांकडून (वयाचा विचार न करता) आपल्या वडिलांविषयी मी ऐकलेल्या काही तक्रारी खाली दिल्या आहेत.

माझे वडील मला पट्‍ट्याने किंवा चप्पलने मारतात. म्हणून मला त्यांची भीती वाटते. मला माझ्या वडिलांशी गप्पा मारायच्या असतात. पण ते माझ्याशी बोलतच नाहीत. मी काय करू? मला तर घरात पेईंग गेस्ट असल्यासारखेच वाटते. कारण आम्ही एका घरात राहात असलो तरी वडिलांशी माझा काही संपर्कच नसतो. माझ्या वडिलांनी मला जवळ घेऊन कधी लाड केल्याचे मला आठवत नाही.

बापमंडळी असे का वागतात?
बऱ्याचदा वडिलांना असे वाटते की आपण कडक बाप होणे मुलांच्या हिताचे आहे. तुम्ही कडक असणे आवश्यक आहे, पण तुम्ही अतिकडक असाल तर तुमच्या विषयी तुमच्या मुलांच्या मनात भीती, दहशत निर्माण होते. हे लक्षात घ्या.

पुरूष आणि स्त्रिया यांच्यात केवळ शारीरिक भेद आहेत, असे नाहि तर त्यांची व्यक्तिमत्वेही परस्पर भिन्न असतात. पण काही प्रमाणात त्यांच्यात काही साम्येही आढळतात. स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही प्रेम, जवळीक, आनंद आणि दुसऱ्याची काळजी करायला हवे असते. पण ते आपल्या भावना स्त्रियांप्रमाणे मोकळेपणाने व्यक्त करीत नाहीत. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या तर आपल्या पुरूषी प्रतीमेला धक्‍का बसेल, असे त्यांना वाटते.

काही वडिलांना मुलाचे लाड केले तर तो बिघडेल अशी भीती वाटते तर काही वडीलांना मुलाची भावनिक गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या बायकोची आहे आणि मुलाच्या योग्य विकासासाठी पैसे मिळवून आणणे एवढीच आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटते. पण तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या भावना तुम्ही व्यक्त केल्या नाही तर भीतीने तो तुमच्याजवळ कधिच येणार नाही. तुम्हा दोघात एक कायमचे अंतर निर्माण होईल आणि ते योग्य नाही. अनेक पुरूषांना आपल्या नवजात बाळाला उचलून घेणे जमत नाही. आपण त्याला नीट धरू शकणार नाही, अशी भीती त्यांच्या मनात असते. मुलांबाबत त्यावेळी वाटणारी ही भीती नंतर वडील-मुलगा यांच्या नात्यात अडसर बनतो.

मुलगा आणि वडील यांच्यातील अंतर वाढण्याचे नेहमीचे कारण म्हणजे वडिलांच्या मुलांबाबत असलेल्या अवास्तव अपेक्षा. मुलांबाबत अपेक्षा बाळगणे योग्य आहे, पण त्याच्या मर्यादा, आवड, त्याची कुवत लक्षात घेऊन या अपेक्षा ठेवणे आवश्यक असते. वडील लोक त्याचा विचार न करता आपल्या मुलाने आपण सांगू त्या क्षेत्रात चमकून दाखवावे असा आग्रह धरतात. मुलाने ती अपेक्षा पूर्ण केली नाही की मग त्याला टोमणे मारणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू होतात. यामुळे मुलाला वडिलांची भीती वाटू लागते. पुढिल काळात वडिलांविषयी मुलगा द्वेषभावना बाळगू लागतो.

ज्या कुटूंबात वडिलांचा फारसा सहभाग नसतो किंवा मुलाला वडिलांविषयी भीती असते. तिथे मुलांमध्ये स्त्री-गुण आढळतात. लाजाळूपणा, अतिभावनाशीलपणा, मृदू बोलणे वगैरे स्त्रीयांमधील वैशिष्ठये मुलांच्यात येतात. मुलाला वडिलांविषयी भीती वाटण्याऐवजी आदर आणि प्रेम वाटायला हवे आणि त्यासाठी वडिलांनीच प्रयत्‍न करायला हवेत. तुमचा मुलगा वयाने लहान असल्याने तुमच्याकडून तो आधारची प्रेमाची अपेक्षा करणार हे ध्यानात ठेवा. त्याला ते प्रेम देऊ केलेत तर त्याच्यात एक विश्वास निर्माण होईल. आपल्या मुलाची कुवत लक्षात घेऊन त्याच्याकडून अपेक्षा बाळगा. त्याच्या आवडीप्रमाणे त्याला त्याचे क्षेत्र निवडू द्या. तो तुम्हांला निश्‍चितपणे आनंद देईल.

कुटुंबासाठी पैसा मिळवणे आवश्यक आहेच. पण निव्वळ आपल्या कामात गुंतून राहू नका. आपल्या कुटूंबासाठी विषेशत: मुलासाठी थोडा वेळ द्या. त्याच्या अभ्यासाची, त्याच्या इतर छंदांची आस्थेनं चौकशी करा. तुमच्याबद्‍दल त्याच्या मनात मित्रत्वाची भावना येईल, असं तुमचं वर्तन असायला हवं.

मुलांच्या भल्यासाठी त्यांना शिस्त लावणे आवश्यक असतेच. पण शिस्तीचा बाऊ करणे मुलाच्या हिताचे नाही. मुलाची चूक झाल्यानंतर त्याला रागावणे हे जसे तुम्ही तुमचे कर्तव्य समजता तसेच त्याने चांगले काम केले तर त्याचे त्याबद्‍दल कौतुक करण्याची तत्परता दाखवा. तुमच्या मुलाबद्‍दल तुम्हाला अभिमान असायला हवा आणि तशी जाणीव मुलाला असायला हवी, मुलाला आपल्या वडिलांचं आपल्याकडं लक्ष आहे हे जाणवलं की, तो आपोआप आत्मविश्वासाने अपली पावले टाकेल. आणि तुमच्या मनातील त्याच्याबद्‍दलच्या अपेक्षा पूर्ण करेल.

मुलाला वाढवणं हे काम फक्त आईचचं नाही. वडिलांचाही त्यात सहभाग हवा. कुटुंबाचा कर्ता म्हणून वडिलांविषयी मुलांच्या मनात आदर असतोच. तो आदर वाढवण्यासाठी मुलाच्या जवळ येणं आवश्यक असतं. त्याला दूर ठेवण्यानं किंवा त्याच्याशी कठोरपणे वागण्यानं त्या मुलाचे जीवन उद्‍ध्वस्त होते ही गोष्ट नीट ध्यानात घ्या आणि मुलीप्रमाणंच मुलालाही तुमची गरज आहे याची जाणीव ठेवून मुलाबरोबरचे आपलं नातं सुधारण्याच्या प्रयत्‍नाला आजपासुनच लागा.