Print
Hits: 5698

एकोणीस वर्षाचा राजेश म्हणतो, “मी एका अतिश्रीमंत कुटुंबात राहतो. एका स्वप्नाळू तरूणाला हवीशी वाटणारी सर्व भौतिक सुखे आईवडिलांनी मला दिलेली आहेत. परंतु पैशाने विकत न घेता येणारी एक गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम! होय...”

“मी एक कमनशिबी तरूण आहे. मी प्रेमाचा भुकेला आहे. पण माझ्या पालकांकडून माझी ही भूक पुरी होऊ शकत नाही.”

सरिताच्या वैवाहिक जीवनाला सात वर्षे पुर्ण झाली आहेत. ती म्हणते, “आईवडिलांच्या इच्छेविरूध्द मी प्रेमविवाह केला. लग्नानंतरची पहिली दोन वर्षे आनंदात गेली. पण आता मात्र मी केवळ जगायचे म्हणून जगते आहे, माझ्या वैवाहिक आयुष्यात कोणतेही आकर्षण राहिले नाही. माझे पती सकाळी आठ वाजता घर सोडतात आणि रात्री दहा वाजेपर्यंत घरी परतात अधिकाधिक पैसे मिळविणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. माझ्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलायलाही त्यांना वेळ नसतो, इतकी मी दुर्लक्षित आहे व त्यामुळे मी आत्मविश्वास गमावून बसले आहे.”

सदुसष्ठ वर्षाची एक वृध्दा सांगते, “माझ्यात व सुनेत दररोज होणाऱ्या वादावादीमुळे मला वृध्दाश्रमाची वाट धरावी लागली. वृध्दाश्रम ही वस्तुस्थिती मी, स्वीकारलेली आहे. माझ्या मुलांनी अधुनमधून येऊन मला भेटून जावे असे मात्र मला वाटते. माझ्या कुटूंबासाठी मी माझे सारे आयुष्य वेचले. पण उभ्या आयुष्यात त्यांच्यापैकी कोणीही माझ्यावर प्रेम केले नाही, ही खंत मरतेवेळी तरी नसावी अशी माझी इच्छा आहे.”

प्रौढावस्थेतील आपणा सर्वांना हे माहीत आहे की ‘आपल्यावर इतरांनी प्रेम करावे’ ही प्रत्येक व्यक्तीची अतिशय महत्वाची गरज आहे. मनुष्यप्राणी म्हणून आपण सर्वजण इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करतो. पण दुसऱ्यावर प्रेम करण्याची पाळी जेव्हा आपणावर येते तेव्हा आपण बनतो.

 1. प्रेम करणे व प्रेम स्वीकारणे हि अतिशय महत्वाची व वैशीष्ट्यपूर्ण मानवी भावना आहे.
  जेव्हा इतर तुमच्यावर प्रेम करतात, तेव्हा तुम्ही त्यांना हवे आहात हि भावना तुमच्यात निर्माण होते आणि तुम्ही जसे आहात तसाच त्यांनी तुमचा स्वीकार केलेला आहे हेही तुम्हाला जाणवते.
 2. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तुम्ही सबल, सक्षम बनता. तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारून आपल्या ध्येयाकडे पोहचू शकता.
 3. समस्याग्रस्त अशा या जगात तुमच्यात सुरक्षितपणाची भावना निर्माण होते.
 4. स्वत:चि प्रतिम उंचावते. आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढतो.
 5. दुसरे आपल्यावर प्रेम करतात ही भावनाच तुम्हाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास उद्युक्त करते.
 6. दुसरे त्यामुळे एकमेकाला सांभाळून सर्वच सुखी होऊ हा विचार निर्माण होतो. हा विचार इतरांशी सुसंवाद ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे तुमचे सामाजिक जीवन सकारात्मक व निरोगी राहते.

आपण कोणाला तरी हवेसे वाटतो ही जाणीव फार महत्वाची आहे. असे असूनही आपल्या भावना आपण आपल्या निकटवर्तीयांसमोर कधी मोकळेपणाने व्यक्त करतो का?

सोळा वर्षाचा एक तरूण म्हणतो की मी आणि माझी आई आमच्यात दररोज वाद होतात, पण तरी मला माहीत आहे के आई माझ्यावर प्रेम करते. जर तिने तिचे प्रेम व्यक्त केले तर मला आणखी सुरक्षित वाटेल.

प्रेम ही संकल्पनाच ‘देणे - घेणे’ अशी आहे जर तुम्ही इतरांवर प्रेम कराल तर ते तुमच्यावर प्रेम करतील. ज्यांच्याबद्दल तुम्हाला आपुलकी आहे त्यांना तुम्ही तुमच्या भावना प्रकट करून दाखविल्या तर तुम्ही एकमेकांच्या आणखी जवळ याल व त्याला एक अर्थपूर्ण नाते निर्माण होईल.
कित्येकजण आपल्या सुहृदाकडे आपली प्रेमभावना व्यक्त करू शकत नाहीत. प्रेम व्यक्त करणे अवघड का वाटत असावे याची काही कारणे अशी.

 1. सर्वसाधरणपणे पालकांना त्यांच्या आईवडिलांनी जसे वाढवलेले असते. त्याच पध्दतीने बहुतांश पालक आपल्या मुलांना वाढवितात. पालकांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांनी प्रेमभावना व्यक्त केल्या नसतील, तर ते हे पालक आपल्या मुलांच्याबाबतीत तसेच धोरण स्वीकारतात.
 2. रवीला वाटते की, माझी पत्नी ’मी तुमच्यावर प्रेम करते’ असे वारंवार म्हणत नाही. मग मी तरी माझ्या तिच्याविषयी प्रेमाचा उल्लेख का करावा किंवा तिला प्रेमाने जवळ का घ्यावे? अशा व्यक्तींच्या बाबतीत हा अहंचा (इगो) प्रश्न बनतो. मीच का प्रथम भावना व्यक्त कराव्यात? तिने कां नाहीत? असे म्हणते आपण दुसऱ्यांच्या प्रगटीकरणाची अपेक्षा करत राहतो व हे असेच चालू राहते. आणखी काल जाईल तसा हा गुंता आणखी बिकट होत जातो. परस्परसंबंध बिघडतात व शेवटी तर दोघेही दुखावली जातात.
 3. आपली प्रेमभावना जवळच्या माण्साकडे व्यक्त करणे हे बहुतेक वळा महत्वाचे वाटत नाही. शब्दाने किंवा कृतीने प्रेम व्यक्त करण्याला केवढे मोल आहे याचा विचार केला जात नाही.
  अकरा वर्षाचा सतीश म्हणूनच म्हणतो की, माझ्या आईवडिलांनी मला हे कधीच उघडपणे सांगितले नाही की आमचे तुमच्यावर प्रेम आहे. त्यंने मला कधीही कुशीत घेतले नाही किंवा कधीही माझा पापा घेतला नाही. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे किंवा नाही याची मला शंका येते.
 4. काहीजण तर हे गृहितच धरतात की अमूक अमूक माझा नातेवाईक असल्याने की त्याच्यावर प्रेम करतो, त्याची काळजी घेतो हे त्याने स्वत: समजून घेतले पाहिजे.

पस्तीस वर्षाच्या सौ. कुलकर्णी म्हणतात की, "तो दिवस मला स्पष्टपणे आठवतो - त्या दिवशी मी माझ्या पतीला सुनावले की तुमचे माझ्यावर प्रेमच नाही" ते ऎकून त्याला धक्काच बसला. तो ताडकन म्हणाला की, दिवसरात्र मी तुझ्याचसाठी पैसे मिळवतो आणि तरीही तुला असे कसे वाटते?"

प्रेम भावना शारीरिक जवळीक दाखवून आणि शब्दांनी व्यक्त करता येते. मिठी मारून, मुका घेऊन, हात हातात घेऊन प्रेम व्यक्त करता येते. तुमच्या प्रेमभावना तुम्ही पुढील शब्दात व्यक्त करू शकता.

 1. तू माझं आयुष्यचं बदलून टाकलंस.
 2. तुझं माझ्याशी नातं आहे हे मला अभिमानास्पद वाटतं.
 3. बाबा, माझं तुमच्यावर प्रेम आहे.
 4. सर्व जगामध्ये तुम्हीच सर्वश्रेष्ठ आई बाबा आहात.
 5. तुझ्यामध्ये अस्म एक विशेष काही आहे, ज्यामुळे हे जग मला आनंददायी वाटते.

पुढे काही सूचना दिलेल्या आहेत. तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला शब्दांतून तुमच्या भावना व्यक्त करताना या सूचनांचा उपयोग होईल.

 1. तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते किंवा त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करीत असाल तर तुम्ही ते शब्दांतून व्यक्त करा. ती व्यक्ती म्हणजे तुमचा जीवलग मित्रही असू शकेल. ज्याच्यामुळे तुम्हाला हे जग सुंदर वाटतय. न संकोचता या भावना त्याच्यासमोर व्यक्त करा.
 2. मी माझ्या प्रेमभावना प्रथम व्यक्त का कराव्यात अशा अहंभावनेचा बाऊ करू नका. तुम्हाला आवडणाऱ्या माणसावरचे प्रेम तुम्ही व्यक्त केले तर लक्षात ठेवा, की ती माणसे त्यांचीही प्रेमभावना व्यक्त करतील.
 3. सुरूवातीला तुमच्या प्रेमभावना व्यक्त करणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर एखादी छोटी भेटवस्तू तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता किंवा एखादा केक, पुष्पगुच्छ लहानशा चिठ्‍ठीसह पाठवून शकता.
  त्या चिठ्‌ठीतून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. बाजारात कितीतरी प्रकारची भेटकार्ड उपलब्ध आहेत. त्यांवा वापर करा. एकदा का तुम्ही तुमच्या भावना लेखी स्वरूपात व्यक्त करू शकलात की प्रत्यक्ष बोलणेही सोपे जाईल.
 4. तुमच्या सकारात्मक भावना व्यक्त करण्याच्या या मार्गाच्या यशस्वितेची खात्री तुम्हाला झाली की अशा पध्दतीने भावनांचे प्रगटीकरण करण्यास तुम्ही उद्युक्त व्हाल.
  तेव्हा तुम्हाला प्रिय असणाऱ्या व्यक्तीसमोर तुमच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी तुम्ही स्वत:हून पुढाकार घेण्याचा एकदा का होईना प्रयत्‍न करा. ज्या क्षणी तुम्ही हे प्रत्यक्ष कराल तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुखद भाव उमटलेले दिसतील. त्या व्यक्तीचा हा चेहरा तुम्हाला त्मच्या भावना इतरांजवळ व्यक्त करण्यास उद्युक्त करेल.
 5. तुम्ही तुमच्या भावना आवडत्या व्यक्तीजवळ उघड केल्या व त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर मनाची चलबिचल होऊ देऊ नका. सुरूवातीला ती व्यक्ती तुमच्या या मोकळ्या प्रतिसादामुळे स्तंभित झालेली असेल. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात तर ती व्यक्ती गंभीतपणे विचार करून, स्वत:च्याही भावना कधी ना कधी व्यक्त करेल.
  भावना व्यक्त करण्याचा मोकळेपना तुमच्या संबंधांना उजाला देईल. त्यामुळे तुमचे भावनिक बंध दीर्घकालपर्यंत अतूट राहती आणि त्यात ताणतणाव निर्माण होणार नाहीत.