Print
Hits: 4614

वृध्दांनी, मृत्यूबद्दलचा विचार करणे सोडून द्यावे. त्यामुळे मृत्यूबद्दल वाटणारे भय कमी होईल. कोणत्या पध्दतीने, केव्हा आणि कसा मृत्यू येईल याबद्दलची काळजी प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेपर्यंत पुढे ढकलावी व आनंदाने जीवनाला सामोरे जावे.

तात्पर्य, जीवनात हसतमुख राहा म्हणजे जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी सुध्दा तुम्ही त्याच मजेने जीवन व्यतित करू शकाल.

जीवनाच्या साठीत तुम्ही येउन पोहचला आहात, त्यामुळे कित्येक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल. त्या समस्यामुळे तुम्ही घायाळ होणार का जीवनाच्या अखेरपर्यंत व्यवस्थितपणे मार्गक्रमण करणार?

“म्हातारपण म्हणजे दुख:च!” असे समीकरण तुम्ही मांडत नसाल तर पुढील लेख तुमच्यासाठीच आहे. वृध्दापकाळ सुखमय होण्यासाठी माणसोपचारतज्ञ संगिता ठाकुर तुमच्याशी चर्चा करीत आहेत.

वृध्दांच्या विचार विश्वातला बराचसा भाग मृत्यू या विषयाने व्यापलेला असतो. कधीकाळी खूप दूरवर असणारा मृत्यू जवळपास येऊन ठेपल्याची भावना होते. मृतूच्या कल्पनेला सामोरे जाणेसुध्दा वृध्दाना कष्टदायक वाटते. त्या वयात सर्वसाधारणपणे पुढील प्रश्न मनात येतात.
मी नेमका कधी मरेन?
स्वत:चा मृत्यू नेमका कधी येणार हे कळणे अशक्य आहे हे वृध्दांना माहीत असतं, तरीही आपली जीवनरेषा किती लांब आहे याचा थोडाफार अंदाज ते बांधतातच त्याचप्रमाणे मग ते उर्वरित भविष्यासंबधी योजना आखतात. पण तरीही ते आजारी पडतात, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या मनात विचार येतोच की आपली वेळ आताच तर भरली नाही ना!

माझा मृत्यू कोणत्या कारणामुळे (आजारामुळे) ओढवेल?
६५ वर्षाचे एक वृध्द गृहस्थ म्हणतात की माझ्या अतिरक्तदाबामुळे मला पक्षघाताचा झटका येऊ शकतो हे जाणवल्यावर मी योग्य ती काळजी घेईन. माझी अपूर्णावस्थेतील कामे पुर्ण करेन. कधी ना कधी मला मृत्यू येणार आहे याची मला जाण असली तरी तो वेदनारहित असावा असे मला वाटते.

पुढील आयुष्य असह्य वाटत असेल तर माझे हे आयुष्य मी इथेच संपवू शकतो का? मला असाध्य आजार झालेला असल्यास मी आत्महत्या करू शकतो का?
मला वेदनामय मृत्यू येईल कां?
मुत्यूचा विचार वृध्दांना नेहमीच मानसिक तणावात ठेवतो. त्यांच्या अनेक दु:खापैकी हे सर्वात गंभीर दु:ख होय.
स्मृतीभ्रंश
जीवशास्त्रीय बदलांनुळे आणि पेशींच्या हासामुळे वृध्दापकाली स्मृती कमी होत जाते. जसजसे वय वाढत जाते तसतशी स्मृतीभ्रंशाचीस तीव्रता वाढत जाते.

काही दिवसांपूर्वी सांगितलेले ते सर्व विसरून जातात. जुन्या घटना बऱ्याच अंशी लक्षात राहतात पण ताज्या घटना मात्र विसरल्या जातात. नजीकच्या भूतकाळातील गोष्टी विसरण्याचे काहीस कारणे पुढीलप्रमाणे.
अ) ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते (कष्ट) प्रवृत्त होत नाहीत.
ब) इतरांचे संभाषण ऎकू येणे कठीण होत जाते.
निद्रानाश
वृध्दापकालात झोपेचे प्रमान कमी कमी होत जाते. ६० ते ७० व्यावर्षी रात्रीची झोप सर्वसाधारणपण एक दोन तासांनी कमी होत जाते. प्रदीर्घ झोप जवळजवळ नाहीशीच होते.
सेवानिवृत्ती - समस्या
नोकरी, धंद्यातून निवृत्ती मिळावी याची प्रथम वाट बघितली जाते, पण ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात येऊन ठेपते तेव्हा मात्र ती नकोशी वाटते. निवृत्तीचा काल असा घालवायचया ही मोठीच विवंचना होऊन बसते.

मग अशा वेळी या वृध्द माणसांना एकाकी, अशा वेळी या वृध्द माणसांना एकाकी, निरूपयोगी, उदासीन वाटू लागते. मग असे पुरूष त्यांच्या पत्नींशी विचित्रपणे वागू लागतात. पत्‍नींच्या सतत चुका काढणे, तिच्यावर वैतागणे अशा घटना घडू लागतात. बऱ्याच वेळा वृध्दांना आर्थिक अडचणींशी सामना करावा लागतो. मग अशा वेळी मुलांवर अवलंबून राहणे ही कल्पना स्वीकारायला त्यांना अवघड वाटते. मुलांवर अवलंबून रहात असतानाच आपली वर्चस्व गाजविण्याची वृत्ती जर वृध्दांना सोडता आली नाही तर परिस्थिती आणखीच बिकट होत जाते.

६४ वर्षाची एक वृध्द स्त्री म्हणते, माझा नवरा कामानिमित्त बाहेर असे तेव्हा बरे होते. आता सतत घरी असल्यामुळे तो अगदी चिडचिडा होतो व सतत माझे डोके खाते. ६५ वर्षाचे एक आजोबा म्हणतात की प्रत्येक दिवशी सकाली उठल्यावर पहिल्यांदा माझ्या डोक्यात हा विचार येतो की आता हा आजचा दिवस आपण घालवायचा तरी कसा? कोणाच्या घरी जायचं? कोणत्या बागेत जाऊन बसायचं आणि आज जेवायच्या वेळी कोणते पदार्थ असणार आहेत?

आवडीनिवडीत बदल
माणसे जसजशी वृध्दत्वाकडे झुकू लागतात तसतशी ती स्वत:चा विचार जास्त करू लागतात. इतरांशी बोलताना स्वत:च्या भूतकाळासंदर्भात सतत बोलत राहतात. आपल्या आजाराबद्दलचा, दिसण्याबद्दलचा, कपड्यांबद्दलचा उत्साह क्मी होत जातो. काही जणांची धार्मिक वृत्ती वाढत जाते. निरनिराळ्या तीर्थस्थळांना भेटी देणे, आध्यात्मिक पुस्तके वाचणे, हे प्रकार वाढू लागतात. तर काही वृध्द मंडळीचे, गप्पाष्टकात भाग घेणे, वाचन करणे, पत्ते खेळणे अशा गोष्टीत मन अधिक रमू लागते.
वृध्दत्वाबद्दल असणाऱ्या गैरसमजुती
१. वृध्दत्व म्हणजे आजारपण
हे विधान नेहामीच बरोबर ठरत नाही. ज्याप्रमाणे तरूण माणसे काही वेळा आजारी पडतात त्याचप्रमाणे वृध्दही आजारी पडतात. काही वेळा काही तरूण मंडळी निकोप, निरोगी असतात, त्याचप्रमाणे काही वृध्द माणसे ठणठणीत असतात. खरं तर ८० वर्षाच्या वृध्दाचा शारीरिक, मानसिक अधूपणा, हा ६० वर्षाच्या माणसापेक्षा नक्कीच जास्त असतो.

काही म्हातारीस माणसे मात्र सदैव टवटवीत, कार्यप्रवन असतात. उदा. (नेल्सन मंडेला) कारण त्यांच्या मते वृध्दत्व आणि आजारपणाचा काहीही अन्योन्य संबंध नसतो. त्यांना वृध्दपकाल हाही जीवनातील इतर कोणत्याही कालांप्रमाणेच एक वाटतो.

थकवा जाणवणे, विस्मरण होणे, अशक्तपणा वाटणे, इत्यादी वृध्दापकालाशी निगडीत गोष्टी अशा वृध्दांना अवास्तव वाटतात. ते वृध्दपकालीन आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जगताना आढळतात. त्यांच्या आयुष्यात स्मृतीभ्रंश, विस्मरण, होणे वगैरे घटना घडत असतात. पण ते त्याचा बाऊ करत नाहीत. अतिशय सहजपणे या बाबी ते स्वीकारतात. ही वृत्ती त्यांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ठणठणीत ठेवण्यास व दीर्घायुष्यी होण्यास मदत करते.
जीवनातील सर्वात खडतर काल
हे विधान नेहमीच खरे नसते. वस्तुस्थिती अशी असते की तारूण्यात काय किंवा वार्धक्यात काय वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या असतातच मृत्यू, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, आर्थिक समस्या वगैते तारूण्यात काय किंवा म्हातारपणी काय दोन्ही वेळा येऊ शकतात. आपण त्या घटना कशा स्वीकारतो आणि त्यांच्यावर कशा रीतीने मात करतो हे महत्वाचे!

उदा. एखाद्या व्यक्तीला नोकरी व्यवसायात अपेक्षित बढती मिळाली नाही तर त्याला हे जीवन व्यर्थ आहे असे वाटू लागते. तर दुसरी व्यक्ती ‘आज नही तो कल!’ असा अशावादी विचार बाळगून शांत राहते. जवळच्या व्यक्तींचा मृत्यू, गंभीर आजार अशा गोष्टी आयुष्यातील दाहक सत्य म्हणून स्वीकाराव्यात समाधानाने जगत राहावे.

आपल्या संपर्कात संबंधित व्यक्तींशी जुळवून घेऊन त्यांना समजावून घेण्याचा वृध्दांनी प्रयत्न करावा (इच्छा असल्यास ते तसे वागू शकतात) जुन्या नव्या पिढीतील अंतर, जाणत्या मुलांनी त्यांचेस त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी स्वीकारलेली जीवनपध्दती अशा गोष्टी त्यांनी समजावून घ्यावयास हव्यात. नव्या पिढीस विचार-आचार स्वातंत्र्य जरूर द्यावयास हवे. तसेच या नव्या पिढीने त्यांच्या मुलांना वाढविण्याची (संगोपन, पालकत्व) जी पध्दत नियोजित केली असेल तिला संमत्ती द्यावयास हवी.

आपल्या मुलांच्या आयुष्यात शक्यतो कमी ढवळाढवळ करणे श्रेयस्कर! कारण आपली जाणती मुले सर्व बाजूंनी पूर्णपणे विकसित झालेली असतात. त्यांचं स्वत:चं म्हणून एक वेगळं, विशिष्ट व्यक्तिमत्व निर्माण झालेले असते. त्यामुळे सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हावे असे त्यांना वाटणे ऒघानेच येते. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की आपली मुले समाजाच्या दृष्टिकोनातून गैरमार्गाने वागत असली तर त्यांना दटावायचेनाही. या वयातही वृध्दांना, त्यांच्या मुलांना सल्ला देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहेच. पण त्या अधिकाराचा वापर योग्य पध्दतीने व्हावयास हवा.

जीवनातील अपरिहार्य कंटाळा व एकाकीपणा दूर घालविण्यासाठी नवीन छंद या वयातही जोपासायला हवेत. नवीन सहकरी (मित्रमैत्रिणी) जोडायला हव्यात. बागकाम, सहली, प्रवास, लहान मुलांना शिकविणे, बालवाडी काढणे, समाजोपयोगी कामे करणे(अंधशाळा, बहिया मुक्यांच्या शाळा किंवा अनाथाश्रमात जाऊन काम करणे) वाद्य वाजविणे, अशा प्रकारचा विरंगुळा शोधून त्यात मग्न राहिले तर वृध्दत्व बोचत नाही किंबहुना वृध्दात्वाचा विचार फार कमे वेळा त्यांच्या मनात येतो.

मित्र जोडणे हा खरोखरीच चांगला छंद आहे. म्हाताऱ्या माणसांना त्यांच्या तारूण्यात नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, यामुळै सग्या- सोयऱ्याकडे जाणेयेणे, जमले नसेल तर आताच्या रीकामपणात त्यांनी ऒळखी वाढविणे, मैत्री करणे, स्नेह संपादन करणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात. शक्य असेल तर वृध्द माणसांनी नियमितपणे चालत फिरायला जावे. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता, आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारेल. वृध्दांनी मृत्यूबद्दलचा विचार करणे सोडून द्यावे. त्यामुळे मृत्यूबद्दल वाटणारे भय कमी होईल कोणत्या पध्दतीने, केव्हा आणि कसा मृत्यू येईल याबद्दलची काळजी प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेपर्यंत पुढे ढकलावी व आनंदाने जीवनाला सामोरे जावे.

मध्यमवयीन स्त्री पुरूषांनी भविष्यात साकारायच्या वृध्दत्वाच्या भूमिकांची जाणीव, ऒळख करून घेण्यास सुरूवात करावी. त्यामुळे कार्यालयात व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबात, सार्वजनिक जागी नवीन भूमिका स्वीकारणे सोपे जाईल.

वृध्दत्वातील शारीरिक व मानसिक बदल कदे आणि केव्हा येणार याचे नेमके ठोकताळे नसतात. व्यक्तीगणिक त्यात खूपच विविधता असू शकते. तात्पर्य, जीवनात हसतमुख रहा म्हणजे जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी सुध्दा तुम्ही त्याच मजेने जीवन व्यतित करू शकाल.