राणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. हे प्रकरण तीन वर्षे टिकले. या काळातील आयुष्य जणू तिच्यासाठी स्वर्गातील नंदनवन बनले होते. पण एक दिवशी तिचे त्याच्याबरोबर कडाक्याचे भांडण झाले आणि ‘आता मी तुझे तोंड देखील पाहणार नाही’ असे सांगून त्याने तोंड फिरविले ते कायमचे.
या घटनेलाही आता दोन वर्षे झाली, पण अजूनही तिला तो येईल अशी आशा वाटते. आज सहा वर्षे झाली तरीही श्रीमती सावंत आपल्या २३ वर्षे वयाच्या मुलीचा सिलिंग फॅनला अडकलेला मृतदेह विसरू शकत नाहीत. अजूनही रात्री त्या दचकून उठतात. झोपेत जोरजोरात रडतात. आपल्या इतर दोन मुलांची आणि पतीची देखभाल करण्यात त्यांना काही रस उरलेला नाही.
अधिकारी दांपत्याने आपला १५ वर्षाचा संसार अडीच वर्षापूर्वी संपवला. श्री अधिकारी एक प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पती म्हणून यशस्वी ठरले नाहीत. घटस्फोट घेतल्याबद्दल आणि संसारातील स्वत:च्या अपयशाबद्दल त्यांना अजूनही टोचणी लागून राहिली आहे.
यातनामय भूतकाळ
माणसाच्या जीवनात घडलेल्या काही भयंकर घटनांचे परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर कसे होतात आणि तो त्या घटनांमुळे आपले वर्तमान आयुष्यही कसे मातीमोल करून टाकतो. यांचीही काही उदाहरणे आहेत. जणू त्यांचा यातनामय भूतकाळ त्यांचा वर्तमानकाळ बनला आहे.
पण असे आयुष्य जगणे योग्य आहे काय? आपल्याच आयुष्याची जाणूनबुजून अशी विलापिका करणे कितपत बरोबर आहे? वरीलप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या लोकांनी खरेच अशा प्रकारचे प्रश्न स्वत:ला विचारणं आवश्यक आहे.
माणूस आपल्या आनंदी आयुष्याची अशी राखरांगोळी का करतो याची काही कारणे खालीलप्रमाणे संभवतात:
जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही भयंकर यातनामय अनुभव येतो, तेव्हा त्याच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण होते (राग, निराशा, अपराधीपण, दु:ख वगैरे) काही काल ही भावना त्याच्या मनात घर करून राहते हे खरे, पण जसजसा काळ पुढे सरकतो. तसतशी ती व्यक्ती त्या यातनामय अनुभवातून दीर्घकाळ सावरू शकली नाही तर तिचे आयुष्य अधिकच यातनामय होते.
- दैनंदिन आयुष्याकडे पाठ फिरवल्यामुळे वर्तमान आयुष्य अधिक कठिण, यातनामय होते.
- अशी व्यक्ती सतत, उदास निराश राहते आणि काही काळानंतर स्वत:चाच द्वेश करू लागते. अशावेळी थोडेजरी मनाविरूध्द घडले तरी ती चिडचीड करू लागते.
- अशा व्यक्ती बराच काळ नैराश्यग्रस्त राहील्या तर त्यांना ह्रुदयरोग, पोतविकार, दमा अल्सर यासारखे रोग उद्भवू शकतात.
- या व्यक्ती सामाजिक संपर्क टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात.
- स्वत:विषयी त्यांनी विश्वास गमावलेला असतो. त्यांच्या मनात्तून आत्मसन्मानही नाहीसा होतो. जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून त्या व्यक्ती पाहतात. आणि त्यामुळेच जीवनावरची आणि स्वत:वरची त्यांची श्रध्दा उडते.