Print
Hits: 7176

मानसोपचारतज्ज्ञ संगीता ठाकूर पुढील लेखात आत्महत्येमागील कारणे व आपल्या आवडत्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्याचे मार्ग सांगत आहेत.

एकोणीस वर्षाचा आकाश सांगतो: मी माझ्या करिअरबद्दल गोंधळून गेलेलो आहे. मला डॉक्टर व्हायचं होतं पण चिकाटीनं अभ्यास करूनसुध्दा मला वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळू शकला नाही. मी स्वयंपाक घरातल्या चाकूने आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला, पण अपुऱ्या धाडसामुळे माझा तो प्रयत्‍न फसला"

सौ. रवीकुमार सांगत होत्या, "स्वत:वर गोळी झाडून माझ्या मुलीनं आत्महत्या केली. तिची मला सतत आठवण येत असते. शिवाय सारखं वाटत राहतं की ती जीवंत असती तर जीवन आणखी आनंददायी बनलं असतं. माझे पती स्वत:लाच, मला, तिच्या आत्महत्येबद्दल दोषी समजतात. मला वाटतं की आम्हा दोघांना मरेपर्यंत तिच्या मृत्यूबद्दल अपराधीपणाची भावना छळत राहील".

बत्तीस वर्षे वयाच्या सौ. पथेजा म्हणतात, वर्षापूर्वी मी जीवनाला अगदी कंटाळून गेले होते. नित्याची भांडणं, ताणतणाव, आरोप - प्रत्यारोप यामुळं अक्षरश: थकून गेले होते. विष घेतलेही, पण माझ्या कुटुंबियांनी मला वेळीच वाचवले. आता मी माझे प्रश्न स्वत: सोडवायला व जीवनाला हसतमुखानं सामोरे जायला शिकले त्यावेळी मी मृत्यूमुखी पडले नाही याचा मला आता आनंद वाटतो.

जसजसे दिवस जात आहेत, तसतसा समाजाच्या व्यक्तींकडूनच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. अधिकाधिक माणसं स्पर्धात्मक जीवनाला सामोरी जात आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशासाठी, जास्त मार्क मिळविण्यासाठी शिकस्त करावी लागत आहे. पालकांना कुटूंबाच्या वाढत्या गरजा पुरविण्यासाठी जास्त पैसे मिळविने अपरिहार्य ठरत आहे. साहजिकच जीवनात आनंदी होण्यासाठी फार मोठी झुंज द्यावी लागत आहे.

जेव्हा निराश, हतबल व्यक्तीला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही मार्ग पुढे दिसत नाही तेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात, आत्महत्येचे विचार खुप जणांच्या मनात येत असतात. पण त्यातले फारच थोडे ते विचार प्रत्यक्षात आणतात व एखदाच यशस्वी होतो.

"आत्महत्येचा विचार माझ्या जवळच्या मित्राच्या मनात आला होता पण तसा विचार त्याच्या मनात का यावा, हे मात्र मला कळलेले नाही".

जी व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असते ती, घरी, कामावर, शाळेत, कॉलेजमध्ये कोणत्या ना कोणत्या समस्येला तोंड देत असते, ती व्यक्ती स्वत:ची समस्या, स्वत:चे प्रश्न समजू शकते व आपल्या कुवतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्‍नही करते. पण दुर्दैवानं त्या प्रयत्‍नात ती यशस्वी होत नाही. मग ती समस्या, त्या व्यक्तीला निराश बनवते, निराशा, वैफल्य, दु:ख, अपयश अशा संमिश्र भावनामुळे पुन्हा ती व्यक्ती स्वत:ची समस्या दुसऱ्या मार्गानं सोडविण्याचा प्रयत्‍न करते. पुन्हा त्यात अयशस्वी होते. एका बाजूनं अनुत्तरित प्रश्न अशा मानसिक द्वंद्वात ती व्यक्ती हताश, निराश बनते. जसजसा काळ जातो तसतशी ती व्यक्ती असह्य मानसिक तणावात सतत रहाते. हा तणाव कोंडमारा यातून आपली सुटका करून घेण्यास पुर्णपणे असमर्थ बनते. त्यामुळं आयुष्य संपवणं हा एकच पर्याय तिच्यासमोर उरतो. पण इतर कोणत्याही सर्वसाधारणपणे माणसाप्रमाणे मृत्यूची तिला भीती वाटत असते. त्यामुळे आत्महत्या करून जीवनातून सुटका करून घ्यावी, की दु:खी जीवन कंठावे याबद्दल द्विधा मनस्थिती होते.

हा मानसिक गुंता वाढत जाऊन मन सैरभैर होते व पुन्हा आत्महत्या करण्याच्या विचाराबद्दल मन दोलायमान राहते. पुढील प्रश्न सतत मनात येत रहातात. आत्महत्या कोणत्या मार्गानं करावी? केव्हा करावी? असे करत अखेर एकदाचा दिवस ठरविला जातो. त्या दिवशी आत्महत्येचा प्रयोग सफल वा असफल होतो. आयत्यावेळी तो दिवस पुढं ढकलला जातो. ‘खरं तर’ आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपविणारे फारच थोडे लोक असतत. त्यांना आपल्या मार्गाबद्दल वत्याच्या यशस्वीतेबद्दल पूर्ण खात्री असते.

‘आत्महत्या करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींबद्दल मी ऎकलं वाचलं आहे’ आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपविणारे फारच थोडे लोक असतात. त्यांना आपल्या मार्गाबद्दल वत्याच्या यशस्वीतेबद्दल मी ऎकलं व वाचलं आहे, पण कोणत्या कारणासाठी त्या व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त झाल्या ते मात्र मला समजू शकत नाही.

आत्महत्येला प्रवृत्त करणारी काही कारणे पुढे दिलेली आहेत
१. आर्थिक नुकसान, धंद्यातील अपयश.
२. महत्वाच्या परीक्षेतील अपयश
३. प्रेमभंग
४. कॅन्सर किंवा एड्सारख्या गंभीर आजाराची जाणीव.
५. घटस्फोट, पती/पत्नीचा मृत्यू
६. वैवाहिक समस्या
७. कौंटुंबिक समस्या
८. मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन
९. मानसिक आजार

माझी माझ्या मुलाशी खूपच जवळीक होती. त्यानं आत्महत्या केली. त्याऎवजी त्याच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी त्याला माझी मदत घ्यावीशी कां वाटली नाही? कोण जाणे!

आत्महत्या ही सर्वसाधरणपणे स्वत:कडे इतरांचे लक्ष वेधण्याची एक कृती आहे. आत्महत्येला प्रवृत्त होणारी व्यक्ती आपल्या निकटवर्तीयांना आपल्या कृतीतून ‘मला गंभीर समस्या असून’ तुम्ही माझ्याकडे लक्षदेण्याची गरज होती ते दिले नाहीत, असे दर्शवित असते. शिवाय जवळच्या माणसाचं प्रेम, आपुलकी याचीही अपेक्षा व्यक्त करत असते. ते व्यक्ती जाणूनबुजून हे सारे करत नसते तर लक्ष वेधून घेण्याची कृती तिच्याकडून अनाहूतपणे होते.

आत्महत्या करणारी व्यक्ती व्यथित, निराश बनलेली असली तरी आपल्या निकटवर्तियांना आपल्या मदतीसाठी विचारणं तिला संकोचाचं वाटतं. एखाद्या निकटवर्तियांची प्रत्यक्षपणे मदत घेणं तर नकोस वाटतं. अशावेळी पुढील विचार त्या व्यक्तीच्या मनात येतात.

 1. ते माझ्यावर संतापतील
 2. ते मला समजावून घेऊ शकणार नाहीत
 3. ते मला कमकुवत मनाचा समजतील,
 4. माझ्या समस्या समजल्यावर ते दुखावले जातील, निराश होतील
 5. मी जीवनात अपयशी झाल्याचं त्यांना समजेल.

या विचरांमुळे आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या व्यक्ती इतरांची मदत घेण्याचं टाळतात.

‘माझ्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचं मी कसं ऒळखावं आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या व्यक्तीच्या वागणुकीतून एतरांना काही इशारे मिळतात. काही व्यक्ती आत्महत्येचा विचार बोलूनही दाखवितात. पण कुटुंबीय, मित्र अशी गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत.

सर्वसाधारणपणे, आत्महत्येस प्रवृत्त झालेली माणसं आपल्या नातलगांजवळ व मित्र मैत्रिणीजवळ आपला उद्वेग, लहरी आपल्या बदलत्या वर्तणुकीतून दर्शवितात.

खालील प्रकारचे बदल त्यांच्या वर्तवणुकीत घडून येतात

 1. तो एकलकोंडा, घुमा बनतो. कुटुंबियाबरोबर बाहेर जाणं टाळतो व घरात एकटं राहणं पसंत करतो.
 2. नित्याच्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करू शकत नाही. उदा. दूरदर्शन बघणं, मासिकं व अवांतर वाचन, जेवण - खाण वगैरे. वैयक्तिक स्वच्छताही दुर्लक्षित राहते.
 3. सततच्या विचारचक्रामुळे निद्रानाश उद्‍भवतो. उशीरा झोपून, सकाळी उशिरा उठणं किंवा लचकर झोपून लवकर उठणं असे बदल दिसतात. झोप पुरी न झाल्यानं डोळे पेंगळुलेले दिसतात.
 4. शाळा, कॉलेज, व्यवसाय, धंद्याच्या ठिकाणी अनियमितपणा दिसू लागतो. कॉलेजमध्ये गेला तरी तिथं तो अभ्यास मन लावून करत नाही. त्याचे शिक्षणातले नैपुण्य कमी होत जाते. गृहिणी स्वयंपाकाकडे मुलांकडे नीट लक्ष देईनाशा होतात. काही स्त्रियांना, आपले मुलांकडे दुर्लक्ष होत आहे, ही भावना त्रस्त करून सोडते. त्यामुळे मग अशा स्त्रिया मुलांचे आवडीचे खाद्यपदार्थ तयार करून त्यातून समाधान शोधू पाहतात.
 5. अशी व्यक्ती सदैव गोंधळलेली व सतत स्वत:च्याच नादात हरवलेली असते. साध्या साध्या गोष्टीवरून ही व्यक्ती संतापते, चिडचिड करते, वैतागते.
 6. ही व्य्क्ती सतत खिन्न, उदास किंवा वैतागलेली दिसते. भावनाप्रधान, निरिच्छ अशी बनतेजाते.

अशावेळी हे लक्षात ठेवावयास हवं, की वरील बदल हे त्या व्यक्तीच्या निराश, उदास मनोवृतीमुळेच घडून येतात. सर्वच उदास, हताश लोक आत्महत्या करत नाहीत. पण आत्महत्या करणारे जवळजवळ संगळेच निराश असतात. या प्रकारचा वागणुकीतील बदलकुटुंबियांच्या (किमान ६५ टक्के वेळा) लक्षात येतो. अशा प्रकारच्या निराश व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होण्याची शक्यता असते हे त्या व्यक्तीच्या निकटवर्तियांनी ध्यानांत ठेवावयास हवं व त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करावयास हवं.

जर माझ्या मित्राचा आत्महत्येचा प्रयत्न फसला तर अशा प्रसंगी मी त्याला कशाप्रकारची मदत करू शकतो?
तुमच्या लक्षात आले की आपल्या मित्रानं किंवा कुटुंबियांपैकी एकानं आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे, अशावेळी ताबतडतोब डॉक्टरना बोलवावं (विशेषत: विषप्राशन केलेलं असल्यास) त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलंतर त्याच्याशी संवाद साधताना आत्महत्येचा विषय कृपया काढू नये. जेव्हा तो आपण अजूनही जिवंत आहोत’ या धक्क्यातून सावरेल तेव्हाच या संदर्भात त्याच्याशी बोला जर तुम्हाला त्यानं त्याच्या आत्महत्येच्या कृतीविषयी अगोदरच कल्पना दिलेली असेल तर आता तो विषय काढून त्याची निर्भत्सना करू नका.

आत्महत्येला प्रवृत्त झालेली व्यक्ती आत्महत्येच्या विचारामुहे व नंतरच्या अयशस्वी प्रयत्नामुळे अगोदरच कानकोंडी झालेली असते अशावेळी तिला फैलावर घेऊ नका.

अशा व्यक्तीस दीर्घश्र्वसन करण्यास सांगून स्वस्थचित्त होऊ द्या. एकदा का ती व्यक्ती स्थिरावली की मग मित्रत्वाच्या नात्याने तिला बोलती करा. स्वत:चे प्रश्न, समस्या मोकळेपणाने सांगण्यास प्रवृत्त करा. शानुभुतीपूर्वक, शांततेनं तिची समस्या ऎकून घ्या. त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून समस्यांचा विचार करा.

त्या व्यक्तीच्या सर्व समस्या सामोपचारानं ऎकून घेतल्यावर तिला समजावून सांगा की ’हताश मनोवृत्तीमुळे ती व्यक्ती सारासार विवेकबुध्दी हरवूवन बसलेली आहे.

जर त्या व्यक्तीची समस्या बिकट वाटत असेल तर मानसोपचारतज्ज्ञ, (Psychiatrist) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) यांची मदत घ्या. लक्षात असू द्या. आयुष्य ही एक मूल्यवान भेट असून ती एकदाच मिळू शकते. त्यामुळे आनंदानं जगा व इतरांना आनंदी बनण्यास मदत करा.

(टीप: वरील लेखातील विशेषनामे मूळची नसून गोपनीयतेसाठी बदललेली आहेत)