Print
Hits: 15507

घटस्फोट हाच पर्याय?
विवाहापूर्वी एकमेकांनी स्वत:ची ओळख पटवून देणे व घेणे हा घटस्फोट न होण्यावर तोडगा असल्याचे गेल्या अंकात लिहिले. पण या लेखात जिथे संयम, आनंद, प्रेम आणि विश्वास असतो असे विवाह नेहमीच आनंददायी ठरतात. असे सुचवायचे आहे. परस्परांना जाणणाऱ्या जोडप्यांमध्ये भांडणे होतच नाहीत असे नाही. पण परस्पर विश्वासाने त्यांच्यावर तोडगा काढला जातो आणि ही जोडपी पुन्हा आनंदी होतात.

शंतनूने आपले ३२ वर्षाचे आयुष्य एकत्र कुटुंबात घालवले होते. त्याच्यावर लहानपणापासूनच पारंपारिक, कर्मठ विचारांचा पगडा होता. म्हणूनच त्याला आपली पत्‍नी ‘सती सावित्री’ सारखी पतीव्रता असावी असे वाटे, पत्‍नीचे काम मुलांना जन्‍म देणे आणि त्यांचा संभाळ करणे, असे त्याचे ठाम मत होते. त्याला बायको मात्र मिळाली एकदम वेगळी स्वत:चे ठाम मत असणारी, स्वतंत्र विचारसरणीची. ती धीट होती आणि महत्वाचे म्हणजे स्पष्टवक्ती होती शंतनूची घोर निराशा झाली. स्वप्नभंगाचे त्याचे दु:ख एवढे प्रचंड होते की, त्याने शेवटी आपल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

काही वर्षापूर्वी ‘घटस्फोट’ हा शब्द उच्चारणेसुध्दा पाप मानले जायचे. पण अलिकडे घटस्फोट इतका सहजसाध्य आहे की अनेक तरूण जोडप्यांना संसारात येणाऱ्या समस्यांवर घटस्फोट हाच एक मार्ग आहे असे वाटते. आता विवाहबंधन पवित्र मानले जात नाही.

विवाह करण्यामागे अनेक कारणे असतात. आपल्या जीवनपध्दतीत बदल आणण्यासाठीही अनेकजण विवाह करतात. आपले जीवन अधिक नियमित व्हावे, आपले वेगळे व्यक्तीमत्व असावे, अशा अपेक्षेने अनेक मडंळी विवाह करतात. बऱ्याच वेळा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतात. एखादी व्यक्ती विवाहानंतर एकदम धीट झालेली किंवा लाजाळू व्यक्ती बोलकी, मनमोकळी झालेली आपण पाहतो.

काही जणांना विवाह म्हणजे आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांतून सुटका असे वाटते. विविध जबाबदाऱ्यातून मुक्त होण्यासाठी अनेकजण विवाह करतात. ज्यावेळी आपल्या अपेक्षा जोडीदाराकडून पूर्ण होत नाहीत, हे लक्षात येते, त्यावेळी ही जोडपी घटस्फोटाचा मार्ग अनुसरतात. याशिवायही घटस्फोटाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे.
शारीरिक छळ आणि व्यसन
आपल्या समाजात शारीरिक छळ आणि मद्यपानाचे व्यसन या अगदी नेहमी घडणाऱ्या गोष्टी आहेत. समाजाच्या कनिष्ठ स्तरातच नव्हे तर मध्यमवर्गात आणि उच्चभ्रु समाजातही या समस्या आढळतात. सर्वसामान्यपणे भारतीय स्त्रीकडून त्यागाची अपेक्षा केली जाते. तीने विवाहानंतर आपल्या इच्छा - आकांक्षा, छंद सर्व काही पतीच्या आणि सासरच्या लोकांच्या चरणी वाहाव्यात अशी अपेक्षा असते.

सुरूवातीच्या काळात या अपेक्षा पूर्ण करण्याचा स्त्रियाही कसोशीने प्रयत्‍न करतात. पण नंतर नंतर (विशेषत: पस्तिशी ओलांडल्यानंतर) त्या कंटाळतात असे त्यागाचे आयुष्य जगणे त्यांना असह्य होते. अनेकदा अत्यंत निराश होऊन त्या घटस्फोटाचा मार्ग स्विकारतात.

‘माझा नवरा जवळ जवळ रोज शिवीगाळ आणि मारहाण करतो आता मला याची सवय झाली आहे. पण तरीही लवकरच घटस्फोट घ्यायचामाझा विचार आहे’ पस्तीस वर्षाची एक महिला सांगते.

छत्तीस वर्षाच्या एका महिलेचा नवरा रोज दारू पितो. त्याच्या व्यसनामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे. याचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम होईल अशी तिला भीती वाटते. तिचा नवरा तिला बाकीच्या सुखसुविधा देत असला तरी ती आपल्या संसारात सुखी नाही.

आणखी एका बेचाळीस वर्षाच्या महीलेला वाटते, माझ्या पतीसाठी आणि मुलांसाठी मी माझ्या सुखाची, समाधानी पंधरा वर्षे खर्ची घातली. आता आणखी किती वर्षे मी यांच्यासाठी खस्ता खाऊ?
परस्पर भिन्न व्यक्तिमत्वे
अनेक जोडपी विवाह म्हणजे लहान मुलांचा खेळ समजतात. विवाहानंतरच्या तीन-चार महिन्यात त्यांच्या लक्षात येते की आपण दोघे परस्पर भिन्न स्वभावाचे आहोत. त्यामुळे एकमेकांना आयुष्यभराची साथ देणे त्यांना अशक्य वाटते आणि ते घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात.

एक बत्तीस वर्षाचा युवक सांगतो, ‘आंम्हा दोघांत नेहमी स्वच्छता, मुलांची जोपासना, पैसा आणि स्वयंपाकावरून भांडणे होतात. मी नोकरी करतो. संध्याकाळी घरी आल्याआल्या तिची कटकट सुरू होते. मला तिच्याबरोबर ससांर करणे शक्य नाही.’ तर एक सत्तावीस वर्षाची नुकतेच लग्न झालेली युवती सांगते, ‘लग्नानंतर चारच महीन्यात माझ्या लक्षात आले की आमची व्यक्तिमत्वे अगदी भिन्न आहेत जे मला आवडते. त्याचा त्याला तिटकारा आहे आणि त्याला नेहमी स्वत:चेच म्हणणे खरे करावेसे वाटते. त्यावर घटस्फोट हा एकच उपाय आहे.’

काही वेळा व्यक्तीचा अहंपणा विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतो. माझ्या पत्‍नीच्या वडिलांकडून मी का पैसे घेऊ? किंवा ती नेहमीच आपल्या माहेरचा टेंभा मिरवत असते आणि माझ्या कुटुंबापेक्षा आपले माहेर बडे आहे असे भासवते. ‘मला कमी लेखण्याचाच हा प्रकार आहे’ अशा संवादातून हा अहंपणा स्पष्ट होतो.
विवाहबाह्य संबंध
या गोष्टीवरून अनेकदा पती-पत्‍नीमध्ये गैरसमज वाढतात. आपल्या जोडीदाराचे बाहेर कुणाशी संबध नाहीत ना? असा त्याला/तिला संशय असतो. हा संशय नेहमीच खरा असतो असे नाही. ज्या जोडीदाराला स्वत:विषयी विश्वास नसतो आणि असुरक्षिततेची भावना मनात असते. त्याला आपल्या जोडीदाराविषयी अशा प्रकारचा तिने परपुरूषांकडे नुसते पाहिले तरी मला सहन होत नाही. मला तो माझा अपमान वाटतो’ असे त्याचे म्हणणे.
अवास्तव अपेक्षा
सर्वसाधारणपणे स्त्रियांना आपला भावी पती देखणा, रोमँटिक, काळजी घेणारा, समजूतदार, प्रेमळ, आपल्यावर वर्चस्व गाजवणारा, एक बलदंड असा मदनाचा पुतळा पती म्हणून हवा असतो. तर पुरूषांना सुंदर, नाजूक, लाजाळू, भावनाशील, समजूतदार, भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून असणारी, रतिक्रीडेत निपुण अशी पत्नी हवी असते, पती - पत्नींच्या एकमेकांविषयीच्या या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत. त्या वेळी ते एकमेकांना कंटाळतात, मग भांडणे, शाब्दिक अपमान, भावना दुखावणे वगैरे प्रकार सुरू होतात. शेवटी दोघेही एकमेकांना वैतागतात आणि घटस्फोट घेतात.

लैंगिक सुखाची कमतरता
हेही घटस्पोटाचे एक कारण असते. अनेकांना एकमेकांविषयीचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शारीरिक जवळीक आवश्यक वाटते.ज्यावेळी जोडप्यांची ही अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यावळी घटस्फोट घेतला जातो. एक जोडीदार या कारणामुळे वैफल्यग्रस्त असेल तर त्याचा परिणाम त्याच्या व्यक्त्मित्वावर, कुटुंबावर, मनावर एवढेच नव्हे तर व्यवसायावरही होऊ शकतो.

घटस्फोट घ्यावा किंवा घेऊ नये. याचा सल्ला मला इथं द्यायचा नाही. पण एक गोष्ट आपण ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे प्रत्येक विवाहात अडचणी, कटकटी असतातच आणि पती - पत्‍नी या अडचणी दूर करण्यासाठी धडपडले तर त्याइतका दुसरा आनंद कुठलाच नसतो. विवाह, संसार टिकवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न थकले (यात मानसोपचार तज्ञांची मदत हाही एक उपाय आहे) म्हणजेच घटस्फोटाचा किंवा वेगळे राहण्याचा मार्ग अनुसरावा.
घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी खालील गोष्टींचा नीट विचार करा.
जशी हाताची पाच बोटे सारखी नसतात. तशीच दोन माणसे परस्पराहून निराळी असणार, वेगळी असणार, हे स्वाभाविक आहे. म्हणूनच पती - पत्‍नींनी आपली व्यक्तिमत्वे भिन्न असणार हे गृहीत धरायला हवे. ही भिन्नता दोघांनी केलेल्या तडजोडीने कमी करता येते.

परस्पर भिन्न व्यक्तिमत्वामुळे दोघांच्यात मतभेद होणे सहाजिक आहे. दोघांपैकी एकाने तरी आपल्या नात्यात आपला इगो येऊ देता कामा नये.

कुठलाच माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतात, आपल्या प्रत्येक दोषांवर मात करणे कुणालाच जमत नाही.

वरील गोष्टींमळे पती/पत्नी अनेक प्रकारच्या चुका करतात. (उदा. एकमेकांशी प्रतारणा, छळ करणे वगैरे) पण जेव्हा ती/तो आपल्या चुकीचा पश्‍चाताप व्यक्त करतो त्यावेळी तिने/त्याने अधिक न ताणता आपल्या जोडीदाराला क्षमा करायला हवी आणि आयुष्या नव्याने सुरू करायला हवे.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी ज्या प्रमाणे आपण रोजगार मिळवण्यासाठी धडपडतो, त्याप्रमाणेच आपण आनंदी, सुखी होण्यासाठी धडपडायला हवे.

प्रत्येक विवाहित व्यक्तीने परस्परात येणाऱ्या दुराव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहेजे त्याचबरोबर हा दुरावा नाहीसा करून वैवाहिक जीवन सफल करण्याचा प्रयत्न करायला हवा.

विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला परस्परांच्या स्वभावाची खरी ओळख असायला हवी. आपापल्या गुणदोषांची जाणीव असायला हवी म्हणजे आपल्यात योग्य तो बदल घडवून आणणे दोघांना शक्य होईल.

थोडक्यात, जिथे संयम, आनंद, प्रेम आणि विश्वास असतो, असे विवाह नेहमीच आनंददायी ठरतात. अशा जोडप्यांमध्ये भांडणे होतच नाहीत असे नाही. पण परस्पर विश्वासाने त्यांच्यावर तोडगा काढला जातो आणि ही जोडपी पुन्हा आनंदी, उत्साही होतात.