Print
Hits: 5103

घटस्फोट घेण्याने पतीपत्‍नीला आपली समस्या सुटल्यासारखे वाटले, तरी त्याचे कुटुंबावर फार खोलवर परिणाम होतात. मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपल्या देशात कुटुंबव्यवस्थेला फार महत्वाचे स्थान आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था मजबूतही आहे.

घटस्फोटाने या व्यवस्थेला धक्‍का तर बसतोच, पण त्याहीपेक्षा कुटुंबातील व्यक्तिंना ही घटना उध्वस्त करते.

एखाद्या व्यक्तीचे जीवन तिच्या जवळच्या मणसांच्या मृत्युने उध्वस्त होऊ शकते. तिच्या शरीरावर, मनावर त्याचा फार खोल परिणाम होतो. त्या मृत्युने निर्माण झालेल्या कौटुंबिक समस्या हाताळताना तिला कठीण जाते. कुटुंबात आईचे किंवा वडिलांचे नसणे लहान मुलावर परिणाम करणारे ठरते.

घटस्फोटानंतर कुटुंबावर असेच आघात होतात. घटस्फोटित व्यक्ति आणि तिची मुले या दोघानांही हे आघात सहन करावे लागतात, अशा आघातांना धैर्याने तोंड दिले तर त्याही परिस्थितीत हे यशस्वी कुटुंब म्हणून उभे राहू शकते. नाहीतर कुटुंबातील व्यक्तिंना अनेक मानसिक ताणतणावांना तोंड द्यावे लागते.

सर्वसाधारणपणे, एकमेकाबरोबरच्या वैवाहिक जीवनाला किती वर्षे झाली, यावर घटस्फोटाचा तिच्यावर/त्याच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. त्याचबरोबर घटस्फोटाचा निर्णय अचानक घेतला की योजनापूर्वक, या जोडप्याला मुले आहेत किंवा नाहीत, जोडप्याची व्यक्तीमत्वे यावरही घटस्फोटाचा परिणाम, अवलंबून असतो. तरीही घटस्फोट घेतलेली जोडपी भावनिकदृष्ट्या कमजोर होतातच. घटस्फोट घेण्याने खालील समस्या उभ्या राहतात. मानसिक ताण आणि त्रास घटस्फोटित महिलेला अनेक तडजोडी कराव्या लागतात. तिला स्वत:लाही नोकरीधंदा बघावा लागतोच. त्याचबरोबर राहण्यासाठी जागाही शोधावी लागते आणि तेच कठीण असते. घटस्फोटित महीलेला राहण्यासाठी जागा देण्यास सहजासहजी कुणी तयार होत नाही. अनेकदा ती कुचेष्टेचाच विषय होते.

घटस्फोटित पुरूषही नव्या नोकरीच्या शोधात असतो. कारण घटस्फोटामुळे त्याचा संपूर्ण व्यक्तिमत्वावर आणि मनावर परिणाम झालेला असतो. कामाच्या ठिकाणी कामात लक्ष न लागणे, हाताखालच्या कर्मचाऱ्यावर विनाकारण संतापणे, त्यांचा अपमान करणे, अशा गोष्टी त्यांच्या हातून घडतात, घटस्फोटीताला मुले असतील तर आई, वडिलांची भूमिका एकाचवेळी पार पाडावी लागते. यामुळे त्याच्या तिच्या मनावरील दडपण आणखी वाढते. अशावेळी समजा, मुले त्याच्या/तिच्या माजी जोडीदाराकडे गेली तर त्याला/तिला त्या जोडीदाराचा मत्सर वाटू लागतो.
एकाकीपणा
एकाकीपणाच्या जाणिवेने अनेकदा मनाचे संतुलन ढळते. घटस्फोटित व्यक्तीला एकटेपणाची जाणीव खायला उठते, अशी व्यक्ती निराश, अलिप्त आणि आपल्या आशा-आकांक्षा हरवून बसलेली असते.

३६ वर्षांची एक घटस्फोटिता सांगते. ‘जेव्हा मी घरी असते तेव्हा कुणीतरी मला फोन करावा आणि मी त्या व्यक्तींशी तासनतास बोलत राहावे असे मला वाटते.
अपराधीपणाची भावना
घटस्फोटित जोडप्याला जर मुले असतील तर अपराधीपणाची भावना दोघांनाही सतत जाणवत राह्ते. घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतल्याबद्दल दोघेही स्वत:ला दोष देत राहतात. पण त्याच बरोबर आपल्या माजी जोडीदारालाही ते त्याबद्दल सतत जबाबदार धरतात. ही अपराधीपणाची भावना तीव्र असेल तर घटस्फोटित व्यक्ती आत्महत्या करायलाही प्रवृत्त होते. श्री. सिंग आपला अनुभव सांगताना म्हणतात. घटस्फोटाचा निर्णय घेताना मला तोच एक मार्ग आहे. असे वाटले होते. मी घटस्फोट घेतला पण आता मुलांकडे बघून आपण हा निर्णय का घेतला असे वाटते. माझ्या मुलांच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. हे मला कळून चुकले आहे.

घटस्फोटित व्यक्तीला अनेकदा आपण अमुक तमुक पध्दतीने वागलो असतो, थोडी तडजोड केली असती तर ही वेळ आली नसती, असे वाटत राहते, ‘जर मी तिला समजून घेतले असते, माझे वागणे थोडे सौम्य केले असते तर ही वेळ आली नसती’ असे सिंगनाही वाटते.
द्वेषाची भावना
घटस्फोटित व्यक्तीला जे काही झाले त्याबाबत प्रचंड चीड असते. ती तो आपल्या जोडीदाराचा द्वेष करू लागतात. दोघेही आक्रमक रीतीने वागतात, आपल्या जोडीदाराने आपल्याला फसवले, अशी भावना त्याच्या/तिच्या मनात घर करून असते. या व्यक्ती अत्यंत भावनाशील असतील तर मानसिकदृट्या त्या आजारी होतात.
मुलांचा ताबा
घटस्फोटित जोडप्यांना मुलांचा ताबा मिळविण्यासाठी वारंवार कोर्टात हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे हे जोडपे मानसिकदृष्ट्या अतिशय हवालदिल झालेले असते. एकापेक्षा अधिक मुले असतील तर हा तणाव आणखी वाढतो, कारण कोणते मूल कुणाकडे जाणार हे न्यायालय ठरवते आणि आपली मुलं दोघांनाही प्रिय असल्यामुळे मुलांची विभागणी दोघांनाही असह्य होत असते. या सगळ्यामुळे राग, द्वेष, मत्सर, निराशा आदि विचार त्यांच्या मनात दाटून आलेले असतात.

एक ३३ वर्षाचा घटस्फोटित म्हणतो, तिने माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावलं. पण मी तिला असा सोडणार नाही. मी सुप्रिम कोर्टापर्यंत जाईन आणि तिथंही मला न्याय मिळाला नाही तर मी सरळ त्याला पळवून आणेन. ज्या घटस्फोटित व्यक्तीकडे मुलांचा ताबा असतो, तिला आपला माजी जोडीदार मुलांना पळवून नेईल अशी सतत भीती वाटत असते.

भूतकाळाचा अस्वीकार
घटस्फोटित व्यक्तींना अनेकवेळा प्राप्त परिस्थितीला तोंड देणे अवघड जाते. आपण घटस्फोट घेतला आहे, हे मान्य करायला ते तयार नसतात, घटस्फोट होऊन बरेच दिवस उलटले तरी या व्यक्ती सत्याचा स्वीकार करू शकत नाहीत. काही घटस्फोटित व्यक्ती आपला भूतकाळ विसरून दिवसा स्वप्नात गुरफटतात. काही मद्यपी, अमंली पदार्थांच्या आहारे जातात. काहीजण सरळ आत्महत्या करतात.
घटस्फोटित व्यक्तींच्या मुलांच्या समस्या
मुलांचा मानसिक गोंधळ

  1. आई - वडिलांच्या बेबनावात मुलांचा मानसिक गोंधळ उडतो. मूल जितके लहान असेल तितकी त्याची मानसिक स्थिती बिकट होते आणि आपण एकाच पालकाबरोबर का राहतो, हे ते समजू शकत नाही. मग हे माझ्या बाबतीतच का घडलं? माझी काही चूक झाली का? मला फक्त आई किंवा पप्पांबरोबरच रहावे लागेल? दोघांबरोबर नाही? वगैरे प्रश्न त्यांच्या मनात येतात.
  2. एक १२ वर्षाचा मुलगा सांगतो, ‘मला माझे आई-वडील दोघेही हवे आहेत. कधी कधी मला वाटते स्वत:चे दोन तुकडे करावेत, एक तुकडा ममीबरोबर आणि दुसरा तुकडा पपाबरोबर रहावा.
  3. त्या मुलाला नेहमी आपण नाकारले जाते आहोत. असे वाटते ते हळुहळू सगळ्या जगाचाच द्वेष करू लागते. काहीवेळा ते आपल्या पालकाचाही द्वेष करू लागते, समजा एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना आईला मारहाण करताना पाहिले तर ते मूल संपूर्ण पुरूष जातीचा द्वेष करू लागते. नाकारले जाण्याची भावना अशा मुलांमध्ये तीव्र असते. अनेकवेळा ही मुले घरातून पळून जातात किंवा आत्महत्या तरी करतात.
  4. सुनीता नावाची १० वर्षांचे मुलगी सांगते, ‘जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती खूप रडते. मी कुणाला आवडत नाही. मला मरून जावेसे वाटते. स्वर्गात गेल्यावर मी देवाशी बोलणार नाही. त्याने माझे चांगले केले नाही.
  5. मुले नेहमी आक्रमक आणि हिंसक बनतात. अनेकदा खोडया करण्यात व दुसऱ्यांना त्रास देण्यात त्यांना समाधान वाटते. पौगंडावस्थेतील मुले अंमली पदार्थ वा मद्याच्या आहारी जातात किंवा गुन्हेगार होतात. ही मुले खोटेही बोलतात. काही मुले याच्या अगदी विरूध्द म्हणजे अगदी अलिप्त, लाजाळू एकलकोंडी बनतात.
  6. मित्र - मैत्रिणीपेक्षा पुस्तकांच्या सहवासात राहणं किंवा एकटे राहणे पसंत करतात. घटस्फोटित कुटुंबात वाढणारी मुले उध्दट बनतात. जिथे आई वडील सतत भांडत असतात व भांडतात मी तुला ठार मारेन, असे शब्द वापरतात, तेव्हा त्यांच्या मुलांना रात्री भयानक स्वप्ने पडतात.
  7. मुलांना एकाच पालकाबरोबर राहणे आवडत नाही. आजूबाजूची पूर्ण कुटुंबे पाहून ती निराश होतात. त्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत नाहीत. त्याचे मित्र - मैत्रिणी सतत बदलत राहतात. घटस्फोट घेण्याने पती - पत्‍नीला आपली समस्या सुटल्यासारखे वाटले, तरी त्याचे कुटुंबावर फार खोलवर परिणाम होतात.
  8. मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपल्या देशात कुटुंब व्यवस्थेला फार महत्वाचे स्थान आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था मजबूतही आहे. घटस्फोटाने या व्यवस्थेला धक्‍का तर बसतोच, पण त्याहीपेक्षा कुटुंबातील व्यक्तींना ही घटना उद्‌ध्वस्त करते.