Print
Hits: 9662

कोणते करियर ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.

  1. जे क्षेत्र निवडायचे त्याबद्दलेचे प्रेम, त्या क्षेत्रात पडेल तितके काम करण्याची आवड आणि तयारी असणे आवश्यक आहे. उदा. आज एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरवर आठ तास काम करणे आवडत असेल तर त्याला पुढे कॉम्प्युटरचा अभ्यास करणे, त्याच क्षेत्रात नोकरी करणे सोपे जाईल. जे क्षेत्र निवडतात, त्यात यश मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:ला सिध्द करायला हवे.
  2. जन्मजात गुणवत्ता - उदा. प्रत्येक व्यक्तीला उत्तम गाता किंवा चित्र काढता येत नाही. व्यावसायिक कलाकार बनायचे असेल तर तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर गुणवत्तेला जोड देणारे उत्तम प्रशिक्षण मिळविणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रशिक्षणासाठी तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असायला हवी.
  3. ती कला किंवा काम आत्मसात कराण्यासाठी आवश्यक असणारी बुध्दिमत्ता तुमच्यात असायला हवी.
  4. ते काम करण्यासाठी आवश्यक असणारे व्यक्तिमत्व तुमच्याकडे हवे. उदा. तुम्हाला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व्हायचे असेल तर जनसंपर्क कसा साधायचा याचे मर्म तुम्हाला कळायला हवे.
  5. तो अभ्यासक्रम शिकण्यासाठी आवश्यक तो पैसा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

आवड आणि जन्मजात गुणवत्ता हे दोन सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर तुमची बुध्दीमत्ता आणि व्यक्तीमत्व हे दोन मुद्दे येतात. तुमच्या मनातील गोंधळ कमी करण्यासाठी खाली काही ‘टिप्स’ दिल्या आहेत. योग्य करियर निवडण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

  1. तुमच्या आईवडिलांना तुम्ही विशिष्ट क्षेत्रात (उदा. डॉक्टर, इंजिनियर) चमकावे असे वाटत असेल आणि तुम्हाला त्या क्षेत्राची आवड नसेल तर त्यांना योग्य मार्गाने ते समजावून सांगा. त्यांना सांगा, त्यांची इच्छा पूर्ण करणे तुम्हाला आवडेल, पण त्या क्षेत्रात चमकण्याची तुमची इच्छा किंवा आवड नाही. (तुमची कारणे स्पष्ट करून सांगा) त्यातूनही तुम्ही तुमच्या मनाविरूध्द तुम्ही तो अभ्यासक्रम स्वीकारलात तर त्यातून तुम्हाला समाधान मिळणार नाही आणि त्यावेळी तो व्यवसाय बदलणे कठीण जाईल.
  2. तुम्ही एकदा काम करायला आणि पैसे मिळवायला सुरूवात केली की आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे हे तुमचे ध्येय असते. पण त्या व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणे आवश्यक वाटते. आणि त्यावेळी तुम्हाला हे समाधान मिळाले नाही तर त्या वयात व्यवसाय बदलणे कठीण जाते.
  3. तुमच्या मित्रांनी एखादे क्षेत्र निवडले म्हणून ते क्षेत्र निवडण्याची चूक करू नका. तसेच तुमच्या कुटुंबाचा तो व्यवसाय आहे म्हणून किंवा एखादा व्यवसाय करणे प्रतिष्ठेचे असे काही समजून तुमचे क्षेत्र निवडू नका.
  4. कोणते क्षेत्र निवडायचे याबद्दल तुमाच्या मनात गोंधळ असेल तर नववीत असातानाच मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्या. अर्थात दहावी किंवा बारावीत गेल्यानंतरही असा सल्ला घेणे योग्य ठरेल.

करियरविषयी सल्ला देताना मानसशास्त्राज्ञ तुमची मुलाखत घेईल आणि तुमची आवड, जन्मजात गुणवत्ता याविषयी नीट समजावून घेईल. शाळेतील तुमची प्रगती अत्यंत मंद असेल तर बुध्दिमत्ता चाचणीही घेण्यात येते.

विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्वही लक्षात घेतले जाते. या सर्वांचा एकत्रितपणे विचार करून मानसशास्त्रज्ञ त्या विद्यार्थ्याला करियरविषयी योग्य तो सल्ला देऊ शकतो. अर्थात आवड आणि जन्मजात गुणवत्ता याला सर्वात जास्त महत्त्व आहे.