“अनंताच्या पलीकडे जाऊनही
अस्तित्व आपलं सदैव उरावं.
आपल्या नंतर सुद्धा आपल्या डोळ्यांनी,
आपल्या लाडक्यांना कुणीतरी पहावं.”
जगातील सर्वात सुंदर अशी गोष्ट म्हणजे सृष्टी, जी विविधतेने नटलेली आहे, ज्यात आपण सर्वजन सामावलेलो आहोत. या सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव अवयव म्हणजे ‘नेत्र’. विचार करा, जर दृष्टीच नसेल तर.… आपण हे जग पाहू शकू?
मित्रांनो, आपल्या मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी कोणीतरी ही सृष्टी पाहू शकेल, म्हणूनच या संकल्पासाठी आपण बहुमोल मदत करा. एक सर्वोत्तम पुण्य आपल्या पदरात पडून घेण्याची संधी आपल्याला लाभली आहे.
नेत्रदान : एक सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म

जगात नेत्रदान हे एकमेव असे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे जे आपल्या मृत्यूनंतर पूर्ण होते. आपल्यासारख्या पुण्यात्म्यांच्या निर्जीव देहातील डोळ्यांमुळे अंध व्यक्तींचे जीवन खऱ्या अर्थाने आपण प्रकाशमय करू शकता. मृत्यूनंतर निष्क्रिय व निर्जीव शरीरातील ‘नेत्र’ या अवयवच सत्कारणी उपयोग करूयात.
नेत्रदानाविषयी थोडेसे…
आपण आपल्या मृत्युपूर्वी नेत्रदानाची इच्छा ‘नेत्रपेढी’ मार्फत पूर्ण करू शकता. यासाठी आपण नेत्रदानाचा फॉर्म भरलेला नसेल तरीही आपण तशी इच्छा नातेवाईकांजवळ व्यक्त केल्यास ते तुमच्या मृत्यूनंतर तुमचे ‘नेत्रदान’ करू शकतात. नेत्रदानासाठी आपल्या नातेवाईकांनी आम्हाला कळविल्यानंतर काही वेळातच तज्ञ डॉक्टर अथवा नेत्रतज्ञ येऊन आपल्या मृतदेहाच्या नेत्रातील ‘पारदर्शक पटल’ (cornea) अथवा संपूर्ण डोळा काढून घेतात. या सर्व प्रक्रियेसाठी फक्त २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. नेत्र निर्हरण केल्यानंतर मृतदेहास विद्रुपता येणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात येते. नेत्रदान मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आताच करावे लागते.
नेत्रदानाविषयीचे गैरसमज-तथ्य
नेत्रदानाविषयी बरेचसे गैरसमज आजही लोकांमध्ये आढळतात. परंतु नेत्रदानाविषयीची खालील काही तथ्य जाणून घेणे गरजेचे आहे -
- नेत्ररोपण केल्यानंतर मृत्यूपूर्वी नेत्र दात्याने पाहिलेली कुठलीही गोष्ट नेत्र प्राप्त झालेल्या व्यक्तीस दिसत नाही.
- नेत्ररोपाणामध्ये डोळ्यातील फक्त सर्वात वरील आवरण (कॉर्निया) म्हणजेच पारदर्शक पटलाचा उपयोग केला जातो. मृत व्यक्तीचा संपूर्ण डोळा कधीही बसवला जात नाही.
- मृत्यूपश्चात नेत्रदान करणाऱ्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- ज्या व्यक्तींच्या डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक पटल (कॉर्निया), खराब झाले आहे; अपघाताने फाटले आहे अथवा (फूल पडल्याने) पांढरे झाले आहे, अश्याच व्यक्तींचे नेत्र रोपण करता येते.
- नेत्रदानाच्या या पुण्यकार्यामुळे कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. सर्व धर्मांमध्ये नेत्रदानाचा उल्लेख पुण्यकर्म म्हणूनच आढळतो.
- नेत्रदान हे ऐच्छिक असते. त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते.
- नेत्र दात्याचा गंभीर रोगांच्या जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास, अशा नेत्रांचे रोपण केले जात नाही. अशा नेत्रांचा उपयोग संशोधनासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे हे नेत्र वाया जातात असे नाही.
- नेत्रदानास वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचेही बंधन नाही.
- मोतीबिंदू, काचबिंदू, चष्म्याचा मोठा नंबर असल्यास किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते.
नेत्रदानासाठी काय करावे?
- मृत्यूपश्चात नेत्रदानाची इच्छा असल्यास आत्ताच नेत्रदानाचा फॉर्म भरून द्या. फॉर्म भरला नसला तरीही नातेवाईकांकडे आपली नेत्रदानाची इच्छा व्यक्त करा. आपल्या मृत्युनंतर ते आपली इच्छा पूर्ण करू शकतात.
- नेत्रदानासाठी इच्छित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्वरित नेत्रपेढीस कळवा.
- नेत्रदानासाठी फोन केल्यावर आपला संपूर्ण पत्ता, फोन नंबर, मृत्यूची वेळ इ. कळवावे.
- मृत व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, घरातील पंखे व एअर कंडिशनर बंद ठेवावते.
- मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
- डॉक्टरांकडून घेतलेल्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची एक झेरॉक्स प्रत व नेत्रदानाचे संमतीपत्र नातेवाईकांनी भरून देणे आवश्यक आहे.
भारतातील १० लाख अंध लोक ही सृष्टी पाहण्यासाठी व्याकूळ आहेत, उत्सुक आहेत. आपण त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊयात. ‘नेत्रदान’ ही आपल्या समाजाची एक श्रेष्ठ परंपरा निर्माण करूयात.
तर मग या पुण्याकर्मासाठी उशीर का? आजच नेत्रदानासंबंधी पूर्ण माहिती करून घ्या आणि नेत्रदानाचा संकल्प करा. आपला मित्रपरिवार व नातेवाईक यांनासुद्धा या कार्यात सामावून घ्या. त्यांनाही नेत्रदानाची महती पटवून द्या. नेत्रदानाच्या इच्छेसाठी फॉर्म सर्व नेत्रपेढ्यांमध्ये सदैव उपलब्ध असतात.
आजच इच्छापत्र भरा व या पुण्यकार्यास हातभार लावा.
डॉ. मिलिंद भोई हे स्व. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठान, पुणे या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेली १५ वर्ष नेत्रदान प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच हजारांहून अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला असून, या मोहिमेचा अधिक जोमाने प्रसार व्हावा यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांनी स्वतः नेत्रदानाचा संकल्प करून या उपक्रमास कृतीशील पाठींबा दर्शविला आहे.