Print
Hits: 20204

डॉ. श्री बालाजी तांबे

आधुनिक जीवनशैलीने कुटुंबातल्या प्रत्येकच सदस्यासमोर आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या उभ्या करून ठेवल्या आहेत. अशा आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी कुटुंबातील सगळ्याच सदस्यांच्या सहकार्याची आवश्‍यकता असते. परस्परांच्या आरोग्याची जाणीव ठेवत आपापल्या आवडीनिवडी निश्‍चित केल्यास हे चटकन कसे साध्य करता येऊ शकते याची माहिती....

आरोग्य टिकविणे, आरोग्य मिळविणे ही प्रत्येकाची वैयक्‍तिक जबाबदारी असली, स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागत असला तरी आरोग्याशी किंवा अनारोग्याशी अनेक गोष्टी निगडित असतात. कुटुंब हे त्यात अग्रणी म्हणावे लागेल. आरोग्य नियमांचे पालन करत असताना कुटुंबाचे सहकार्य खूप आवश्‍यक असते. शिवाय त्यामुळे सर्व कुटुंबाचे आरोग्यही व्यवस्थित राहायला मदत मिळते.

कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करताना सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती व सवयी. कुटुंब म्हटले की परस्परांसाठी थांबणे, परस्परांच्या आवडीनिवडीचा विचार करणे आले. कौटुंबिक प्रेमाखातर, कुटुंबाच्या मानसिक आरोग्याखातर हे करणे आवश्‍यक असले तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही ना याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे.

उदा. एखाद्या दिवशी यजमानांना रात्री घरी यायला उशीर होणार असला आणि पत्नी जेवायची थांबली तर दोघांना बरे वाटेल, पण यजमानांना रोजच कामानिमित्त उशीर होणार असला तर पत्नीने रोज रात्री न जेवता उशिरापर्यंत जागत बसणे बरोबर नाही. शक्‍य असल्यास यजमानांनाही वेळेवारी डबा पाठवून तिने स्वतः घरी वेळच्या वेळी जेवून घ्यावे हेच चांगले. अन्यथा रोजच्या जागरणाने व रोज रोज भुकेले राहिल्याने दोघांचे पचन बिघडून बाकीच्या त्रासांना आमंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही.

कुटुंबातल्या सर्वांनी किती वेळ व केव्हा झोपायचे हे सुद्धा नुसती सोय किंवा सवय पाहून ठरविण्यापेक्षा प्रकृतीचा विचार करून ठरवायला हवे. लहान मुलांना अधिक झोपेची आवश्‍यकता असते. तसेच, बहुतेक वेळा शाळेनिमित्त लवकर उठावे लागणार असते. तेव्हा त्यांनी रात्री लवकर झोपणे अतिशय गरजेचे असते. मुलांची झोपण्यची वेळ झाली की घरातल्या इतरांनीही आपापली कामे कमी करून म्हणजे टीव्ही वगैरे बंद करून गप्पागोष्टी थांबवून मुलांना झोपी जाण्यास प्रवृत्त करावे. मुलांची झोपेची आवश्‍यकता प्रकृतीनुरूप कमी अधिक असू शकते. उदा. वात-पित्त प्रकृतीच्या मुलांना अधिक झोपेची गरज असते. पण, त्यांना जाग पटकन येते, तर कफप्रकृतीच्या मुलाला थोडे कमी झोपले तरी चालते, मात्र त्यांना झोपेतून उठायला वेळ लागतो. मुलांना झोपवताना, उठवताना अशा बाबींचाही विचार करायला हवा.

आहाराची योजना करतानाही घरातल्या सगळ्यांच्या प्रकृतीचा विचार करायला हवा. बहुतेक वेळेला आपण फक्‍त आवडी-निवडी सांभाळत राहतो. पण, आरोग्य सांभाळण्यासाठी प्रकृतीनुरूप आहारयोजना करणे अधिक गरजेचे असते, हे समजायला हवे. जसे इडली, डोसा, ढोकळा वगैरे आंबवून तयार केलेले पदार्थ कफप्रकृतीच्या व्यक्‍तीला सहज मानवतात. पण, पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तीचे पित्त वाढवू शकतात किंवा वातप्रकृतीला पचायला जड ठरू शकतात. अशा वेळेला वात-पित्त प्रकृतीसाठी इडली-सांबाराबरोबर भात-सांबार किंवा वरण- भातही बनवावा. दूध-लोण्यासारखे कफ वाढविणारे पदार्थ वात, पित्ताच्या प्रकृतीला थोडे अधिक दिले तरी चालते पण, कफप्रकृतीला मात्र मर्यादित प्रमाणात देणेच चांगले. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य नीट राहावे यासाठी तांदूळ भाजून घेणे, कणिक भाजून घेणे यासारख्या साध्या साध्या उपायांचाही अधिक उपयोग होतो.

कुटुंबाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी खेळ खेळण्याचा, सर्वांनी मिळून सहलीला जाण्याचा, काहीतरी वेगळे करण्याचा उपयोग होत असतो. यातही कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करायला हवा. उदा. वात-पित्तात्मक प्रकृतीला अधिक धावपळ, दगदग सहन होत नाही. तर, कफ प्रकृतीला शारीरिक हालचाली न करता एका ठिकाणी फार वेळ बसणे हितावह नसते. घरात दोन मुले असतील व दोघांची प्रकृती अशी भिन्न असेल तर खेळातही वैविध्य ठेवायला हवे. व्यायामाच्या बाबतीतही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे गोष्टी संतुलन साधणाऱ्या असल्याने घरातल्या सर्वांसाठी अनुकूल असतात, मात्र त्यांचे प्रमाण प्रत्येकाच्या प्रकृतीला सोसवेल असे असावे. दमछाक करणारे, घामाघूम करणारे व्यायाम कुटुंबातील सर्वानाच अनुकूल व उपयुक्‍त असतील असे नाही.

सहलीला जातानाही असे ठिकाण निवडावे की जेथे घरातल्या सगळ्यांनाच आनंद घेता येईल. कुटुंबात आजी-आजोबा असतील तर अशा ठिकाणी जावे, जिथे चढ-उतार करायची आवश्‍यकता भासणार नाही, दगदग होणार नाही. वाटलेच तर एखाद्या ठिकाणी मुक्काम करून बाकीच्या मंडळींना आसपासच्या ठिकाणी ट्रेकिंग करता येईल अशी जागा निवडावी.

कुटुंबाचे आरोग्य व सुख सांभाळण्यासाठी अशा अनेक गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. यालाच काही आरोग्य-नियमांचीही जोड देता येते.

कौटुंबिक आरोग्याचा विचार करताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्या दृष्टीने घरातल्या सगळ्यांनी रोज किमान एकदा, दुपारचे किंवा रात्री जेवण, एकत्र बसून करावे. जेवणाच्या अगोदर "ॐ सह ना ववतु' सारखी प्रार्थना अवश्‍य करावी, ज्यात कुटुंबाच्या आरोग्याची, कुटुंबात स्नेहभाव कायम ठेवण्याची कल्पना केलेली आहे. याचा कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.

कुटुंबातील सर्वांना एकमेकांविषयी आदर व प्रेम असणे आवश्‍यक असते. तसे पाहता, आदर व प्रेम यात फारसे अंतर नसते. आदर दाखविणे म्हणजेच प्रेम व्यक्‍त करणे. आपल्या जाण्या-येण्याच्या वेळा घरातल्यांना सांगणे; कुठे जातो आहोत, काय कामासाठी जात आहोत हे सांगणे; महत्त्वाच्या कामाला जाताना घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे यासारख्या कृतींमुळे घरात कौटुंबिक वातावरण तयार होते. शिवाय अशा वागण्यामुळे घरातल्या वयस्कर व्यक्‍तींना मिळणारे मानसिक समाधान त्यांच्या आरोग्याला कारणीभूत ठ रते.

कुटुंबातील सर्वांनी मिळून अधेमधे छोट्या-मोठ्या सहलीचे, वर्षातून एखाद्या मोठ्या सहलीचे आयोजन करावे. एखादी छान संगीत मैफिल, प्रवचन, नाटक, सिनेमा वगैरे एकत्र मिळून बघावा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे "कुटुंब' ही संकल्पना मर्यादित ठेवू नये. घरातील लोक हे जसे कुटुंबातले असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटुंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळी-अवेळी फटाके वाजविण्याचा या आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवावे. कौटुंबिक आरोग्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्र येणे जसे आवश्‍यक असते, तसेच कॉलनीतील सर्व मंडळीही अधूनमधून एकत्र येतील अशा योजना आखाव्यात. याने एकमेकांबद्दल प्रेम, आदर उत्पन्न होऊन मानसिक समाधान मिळायला मदत होते. अडीअडचणीच्या वेळेला, आजारपणात वगैरे एकमेकांना मदत करण्याची तयारी ठेवावी. यामुळे अडचणीत असलेल्याला किंवा आजारी व्यक्‍तीला मिळणाऱ्या मानसिक समाधानामुळे, आधारामुळे आरोग्य सुधारायला मदत मिळते.

 1. सर्वांनी रोज सकाळी पंचामृत, च्यवनप्राश किंवा चैतन्य वा शतानंत कल्प, भिजविलेले बदाम यासारखे रसायन सेवन करावे.
 2. रोजच्या आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा. विशेषतः लहान मुले, तरुणांनी शक्‍य तेव्हा घरचे ताजे लोणी अवश्‍य खावे.
 3. पंधरा दिवसातून एकदा पोट साफ होण्यासाठी दोन-तीन जुलाब होतील एवढ्या प्रमाणात गंधर्वहरीतकी, एरंडेल तेल किंवा योगसारक चूर्णासारखे औषध घ्यावे.
 4. लहान मुलांना शारीरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे, सातत्याने संगणक किंवा टीव्हीसमोर बसून राहण्याची सवय लागणार नाही याकडे लक्ष द्यावे.
 5. घरामध्ये वयाने मोठ्या व्यक्‍ती असतील तर त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. पचनाला सोसवतील तरीही ताकद देतील अशा विशेष गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश असावा.
 6. कुटुंबातल्या सर्वांनीच रात्री जड गोष्टी खाणे टाळावे, विशेषतः मांसाहार, तळलेले पदार्थ रात्री टाळावेत.
 7. बाहेरचे खाणे झाले किंवा घरातही नेहमीपेक्षा वेगळे किंवा जड जेवण झाले तर "अन्नयोग गोळ्यां'सारख्या पचनशक्‍ती वाढविणाऱ्या गोळ्या हाताशी असू द्याव्यात.
 8. प्रकृतीसंबंधातल्या साध्यासुध्या तक्रारींवर उदा. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अपचन, हात-पाय मुरगाळणे वगैरेंसाठी सितोपलादि, "सनकूल'सारख्या साध्या-सोप्या व प्रभावी औषधांचा एखादा संच उदा. "संतुलन होम रेमिडी किट'हाताशी असावा. यामुळे त्रास झाला की लगेच उपचार सुरू होतील व इतर कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जायला न लागता आरोग्य टिकविता येईल.
 9. ऋतुनुसार हवामानात होणाऱ्या बदलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या आहार-आचरणात योग्य ते बदल करावेत. उदा. पावसाळ्यात प्यायचे पाणी उकळून घेतलेले असावे, शक्‍यतो गरम असतानाच प्यायला द्यावे. उन्हाळ्यात पित्त वाढविणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. हिवाळ्यात धातुपोषक गोष्टींचे आवर्जून सेवन करावे.
 10. अंगाला तेल लावणे, पाठीला तेल लावणे, पादाभ्यंग करणे यासारख्या गोष्टी कुटुंबातील सर्वांसाठीच हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक-दुसऱ्यासाठी पाच-दहा मिनिटे वेळ काढला व एखाद्या दिवशी बहिणीने भावाला पादाभ्यंग करून दिले, एखाद्या दिवशी मुलाने वडिलांच्या पाठीला तेल लावून दिले तर आरोग्य तर टिकेलच पण स्नेहबंध टिकायलाही हातभार लागेल. सण-वार साजरे करावेत. दिवाळीच्या किंवा वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांच्या अंगाला, तेल व उटणे लावता येऊ शकेल.
 11. स्वयंपाक करताना नुसत्या चवीचा विचार न करता आयुर्वेदिक संस्कारांना महत्त्व दिले, केशर, डिंक, मसाल्याचे पदार्थ, सुकामेव्याच्या गोष्टी वगैरे पदार्थ उच्च प्रतीचे व खात्रीचे वापरले तर त्यामुळे स्वयंपाक चवदार बनेलच पण कुटुंबाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळेल. सुक्‍यामेव्यासारख्या गोष्टी बऱ्याचदा घरात आणून ठेवलेल्या असतात पण, घरातल्या मोठ्या व्यक्‍तीने त्या गोष्टी सगळे जण सेवन करत आहेत याकडे लक्ष ठेवावे म्हणजे घरातल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल.
Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘fair dealing’ or ‘fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.