ई-सकाळ
पुणे, भारत,
डॉ. अमर शिंदे

पौगंडावस्थेमधील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे तिसरे महत्त्वाचे कारण आहे. वाढते ताणतणाव, अपेक्षांचे ओझे, नात्यांतील संघर्ष ही सारी कारणे त्यामागे असतात; मात्र अशा मानसिकतेची चिन्हे लक्षात घेऊन त्यावर उपचार करता येऊ शकतात.........
अठरा वर्षांचा सचिन "आयसीयू'मध्ये ऍडमिट असल्याचे कळल्यामुळे त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी सारेच हवालदिल झालेले.... सचिन स्कॉलर मुलगा, दहावीला ८५% गुण मिळविलेला... बारावीनंतर इंजिनिअरिंगला जाण्यास उत्सुक असलेला... परंतु प्रवेश परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न!
आपल्या आजूबाजूला अशा अनेक घडताना आपण पाहत असतो, वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो. आपल्याला दिसणाऱ्या या केसेस हिमनगाचे टोक आहेत.
पौगंडावस्थेमधील आत्महत्यांचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. सन २००५ मध्ये "युथ रिस्क बिहेवियर सर्वे' या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे, की १७% विद्यार्थ्यांनी मागील एक वर्षामध्ये आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. पौगंडावस्थेमधील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे तिसरे महत्त्वाचे कारण आहे.
दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, त्यामुळे येणारी उदासीनता आणि आत्महत्येचा प्रयत्न, हे दुष्टचक्र निर्माण होते. मुलाचा स्वभाव, त्याच्या इच्छाआकांक्षा, आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे, घरामधील वातावरण, मुलांचा एकलकोंडेपणा, समाजामध्ये वाढत चाललेली जीवघेणी स्पर्धा हे सर्व घटक पौगंडावस्थेमधील आत्महत्यांना कारणीभूत आहेत. नोकरी किंवा व्यवसाय करून घर, गाडी, उत्तम जीवनशैली या साऱ्या स्वप्नांमागे धावताना ही पाखरं थकतात अन् कधीतरी निसटत्या क्षणी आपली जीवनयात्रा संपवतात.
आत्महत्या करणाऱ्या मुलांमध्ये अनेक वेळा उदासीनता, उन्माद, छिन्नमनस्कता, फीट्स येणे यांसारखे आजार असू शकतात. परंतु मानसिक आजारांबद्दल आपल्याकडे पुरेशी जागृती नसल्यामुळे यांकडे लक्ष दिले जात नाही. या मुलांचा बुद्ध्यंक (खट) नॉर्मल असल्याचे आढळून येते. तरीही ही मुले अभ्यासामध्ये पाठीमागे का पडतात, हा प्रश्न पालकांना भेडसावतो आहे. या आत्महत्या टाळता येऊ शकतात; परंतु त्यासाठी पालकांनी पुढील गोष्टी समजावून घ्यायला हव्यात.{mospagebreak} पौगंडावस्थेमधील मुलांमधील वर्तणुकीतील बदल पालकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतले पाहिजेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, अभ्यासावर लक्ष केंद्रित न करू शकणे, कशातच रस नसणे, उदास वाटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. आत्महत्येचा विचार बोलून दाखविणे किंवा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न यांकडे दुर्लक्ष करू नये, कारण "लांडगा आला रे आला' या गोष्टीप्रमाणे घटनाक्रम घडू शकतो. नंतर दु-ख करण्यात अर्थ नाही. म्हणून वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मानवी मनामधील आनंद-दु-ख, राग, भीती, संशय या सर्व भावना आणि विविध मानसिक आजार हे मेंदूमधील रासायनिक बदलांवर अवलंबून आहेत, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे झालेले बदल पूर्ववत करण्यासाठी औषधोपचार करणे गरजेचे आहे.
शारीरिक आजाराच्या जशा तपासण्या आहेत, उदा. हिमोग्लोबिन, युरीन, शुगर इ. तशाच तपासण्या मानसिक आजारांतदेखील आहेत. उदा.
- चाइल्ड बिहेविअर चेकलिस्ट: यामध्ये मुलाच्या वागण्यातील दोष लक्षात येतात.
- प्रोजेक्टिव्ह टेस्ट: चित्रावरून गोष्ट बनविणे. या तपासणीमधून आपल्याला मुलांच्या अंतरंगात काय चालू आहे याचा ठाव लागू शकतो.
- मिनेसोटा मल्टिफॅसिक पर्सनॅलिटी इन्व्हेन्ट्री (एमएमपीआय) स्वभाव तपासणी - या तपासणीमधून मुलांच्या स्वभावातील गुणदोष लवकर ओळखता येऊन त्यात योग्य ते बदल करण्याचा सल्ला देता येतो. या व अशा तपासण्यांमधून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारांसाठी योग्य ती दिशा मिळते. मानसिक आजारांमधील उपचारांचे पुढील दोन विभाग पडतात - १) औषधोपचार, २) समुपदेशन व सायकोथेरपी.
- औषधोपचार - मानसिक आजारांमध्ये औषधे घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हल्ली कमीत कमी साइड इफेक्टस् असलेली औषधे उपलब्ध आहेत आणि नवनवीन शोधप्रकल्प मार्गी लागले आहेत.
- समुपदेशन व सायकोथेरपी: मानसिक आजारांसाठी समुपदेशकांची मदत उपयोगी पडू शकते; परंतु सध्या या क्षेत्रामध्ये आवश्यक ती पदवी व अनुभव नसलेले लोक कौन्सेलिंग सेन्टर्स उघडत आहेत. तेव्हा रुग्णांनी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.
- कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी - वागणुकीमध्ये योग्य तो बदल करण्याची पद्धती, शिथिलीकरण उपचार, व्होकेशनल थेरपी अशा विविध उपचारपद्धतींचा अंतर्भाव सायकोथेरपीमध्ये होतो.
अशा उपचार पद्धतींचा चांगला परिणाम होऊन रुग्ण पूर्ण बरा होतो.