Print
Hits: 8611

एकूण दोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. सर्व प्रकार घातक ठरतात असे नाही. कर्करोग सुरूवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग सावकाश पसरतात. त्यामुळे रूग्ण दीर्घकाळापर्यंत निरोगी जीवन जगू शकतो. पुर:स्थ ग्रंथींच्या आजारातही वेळीच उपचार झाले तर वर्षानुवर्षे आजार काबूत ठेवता येतो.

कधी कधी आजारापेक्षा भीतीमुळेच माणूस अर्धमेला होतो.यावर उपाय म्हणजे आजाराविषयी माहिती मिळविणे, ज्ञान हे प्रकाशासारखे असल्यामुळे मनातील भीतीचा अंधार दूर होतो, आत्मविश्वास वाढतो, जीवन सुसह्य होते.

आपल्या शरीरातील इंद्रिये ऊतींची बनलेली असतात. ऊती ही पेशींची बनलेली असते. कर्करोग हा पेशींचा विकार असतो. सामान्यपणे पेशींचे विभाजन शिस्तबध्द पध्दतीने होत असते. पण काही कारणामुळे पेशींचे विभाजन बेशिस्तपण व भरमसाठ होऊ लागले की, गाठ निर्माण होते. अशा पेशींच्या गाठी कधी निरूपद्रवी असतात, तर कधी उपद्रवी असतात. आवाळू येणे ही निरूपद्रवी गाठ, तर कर्करोगाची गाठ ही उपद्रवी गाठ असते. निरूपद्रवी गाठ एकाच जागी वाढते व पसरत नाही.

कर्करोगासारखी उपद्रवी गाठ लवकर वाढते व पसरत जाते. कर्करोगांवर उपचार न केल्यास शेजारच्या ऊतींवर हल्ला करून नाश करतात. कर्करोगाच्या पेशी मूळ जागेवासून सुटून रक्ताच्या प्रवाहाद्वारे किंवा लसिका संस्थेद्वारे(लिफॅटिक सिस्टीम) इतर इंद्रियात पोचतात व तेथे उपद्रव निर्माण करतात.

सर्व कर्करोगांवर एकच उपचार नसतो. रोगाचे निदान करणे, उपचारांची दिशा ठरविणे हे फक्त तज्ञं डॉक्टर करू शकतात.

पुर:स्थ ग्रंथी
पुर:स्थ ग्रंथी ही सुपारीच्या आकाराची असून ती फक्त पुरूषात असते. ही ग्रंथी ओटीपोटात मूत्राशयाखाली असते. या ग्रंथीतून मूत्र मार्ग जातो. पुर:स्थ ग्रंथीतून दुधी स्त्राव बाहेर पडतो.हा स्त्राव वीर्यात मिसळतो. त्यामुळे वीर्यातील शुक्राणू सचेतन बनतात आणि ते सूर मारून मार्गक्रमण करू शकतात.

पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाची कारणे
या रोगाची नक्की कारणे कोणती, यासंबंधी सांगणे आजवर शक्य झालेले नाही. तरीही हा रोग पन्नशीपूर्वी पुरूषात आढळत नाही. कुटुंबात हा रोग आधी कुणात झालेला असणे, किरणोत्सर्ग, वयोवृध्द, पुरूष ही अशी काही कारणे सापडतात.

पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाची लक्षणे
काही वयोवृध्द पुरूषात पुर:स्थ ग्रंथीची वाढ होते. पण ही वाढ निरूपद्रवी असते, म्हणजे वाढलेल्या पेशी कर्करोगाचे पसरत नाहीत. सुभ्रमात टाकणारी बाब म्हणजे पुर:स्थ ग्रंथीचे निरूपद्रवी वाढ व (कर्करोग) या देहोत उद्‌भवणारी लक्षणे जवळजवळ समान असतात. ही लक्षणे अशी

 1. लघवी करताना त्रास होणे, वेदना होणे.
 2. नेहमीपेक्षा अधिकवेळा लघवी होणे.
 3. लघवी करायला बराच वेळ लागणे.
 4. लघवीत रक्त जाणे

वरील कोणतेही लक्षण आढळल्यास व्यक्तीने डॉक्टरकडून तपासून घ्यावे. बहुतांशी ही गाठ निरूपद्रवी असते व शस्त्रक्रिया करून घेतल्यास संपूर्ण बरे वाटते. वृध्दात पुर:स्थ ग्रंथींचा कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

कर्करोगाच्या पेशी हाडात पोचतात, तेथे रोग निर्माण करतात. तेव्हा कुठे पाठ, नितंबाची हाडे दुखू लागतात.

पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे निदान

 1. हातात रबरी मोजा घालून डॉक्टर तर्जनी रूग्णाच्या गुदद्वारात घालतात. पुर:स्थ ग्रंथी वाढलेली असल्यास डॉक्टरांना कळू शकते.
 2. रक्ताची तपासणी: प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटिजेन ही रक्ताची टेस्ट करतात. कर्करोगात या अँटीजेनचे प्रमाण वाढत जाते. उपचार केल्यावर हे प्रमाण कमी होते.
 3. अल्ट्रासाऊंड रेखाचित्रण: एक लहान प्रोब गुदद्वारात घालून तपासणी करतात. टीव्ही सारख्या पडद्यावर चित्र उमटते. या तपासणीद्वारे पुर:स्थ ग्रंथीचा नेमका आकार समजू शकतो.
 4. ऊती परीक्षा (बायॉप्सी): पुस:स्थ ग्रंथीचा एक तुकडा काढून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो. यात कर्करोगांच्या पेशींचे अस्तित्व असल्यास समजू शकते.
 5. हाडांची क्ष-किरण तपासणी: कर्करोगाचा प्रसार हाडात झालेला असल्यास क्ष-किरण तपासणीने समजते.
 6. सीटी स्कॅन: ही खास क्ष-किरण तपासणी असते. कर्करोग शरीरात इतरत्र पसरलेला असल्यास समजू शकते.
 7. एम.आर.आय. स्कॅन: ही सीटी स्कॅनप्रमाणे तपासणी असते. मात्र इथे क्ष-किरणांऐवजी चंबकीयत्वाचा वापर केला जातो. प्रत्येक रूग्णाला या सर्व तपासण्या कराव्या लागतात असे नाही.

उपचार
रूग्णाचे वय, प्रकृती, कर्करोगाचे अवस्था, उपचारांचे परिणाम- दुष्परिणाम या सर्वाचा विचार करून मगच उपचार ठरविले जातात.
अ. शस्त्रक्रिया: वाढलेल्या पुर:स्थ ग्रंथीमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होत असल्यास तो दूर करण्यासाठी मूत्रमार्गावर उच्छेदन (ट्रान्स युरेक्षल रिसेक्शन) ही शस्त्रक्रिया करतात. यासाठी एक नलिका दुर्बिण शिश्नाद्वारे मूत्रमार्गात सारतात व वाढलेल्या ग्रंथींचे तुकडे कापून मूत्रमार्ग मोकळा केला जातो.

पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगासाठी करण्यात येणारी दुसरी एक शस्त्रक्रिया म्हणजे पुर:स्थ ग्रंथी उच्छेदन (संपूर्ण पुर:स्थ ग्रंथी काढून टाकणे) कर्करोग पुर:स्थ ग्रंथीपुरताच मर्यादित स्वरूपात असेल तर संपूर्ण ग्रंथी काढून जाते.

कर्करोग पसरत असला तरी त्याची वाढ थांबविण्यासाठी वृषण उच्छेदन (वृषन काढून टाकणे) ही शस्त्रक्रिया करतात. वृषणात निर्माण होणार्‍या टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकावर कर्करोगाच्या पेशी पोसल्या जातात. म्हणून वृषण कापण्यात येतात.

ब. विकरण उपचार (रेडिओथेरेपी): कर्करोगाच्या पेशींचा नाश करण्यासाठी उच्च ऊर्जा किरणांचा वापर केला जातो. हे करताना सुदृढ पेशींना हानि पोचणार नाही, याची काळजी घेतली जाते. विकिरण उपचारामुळे कर्करोग आटोक्यात येतो व तसेच वेदनाही कमी होतात. मळमळणे, थकवा येणे असे उपद्रव विकिरण उपचारांमुळे उद्‌भवतात हे खरे, पणं ते कधी सौम्य असतात, तर कधी तीव्र असतात. पौष्टीक अन्न पदार्थ. भरपूर पेये व विश्रांती घेतल्यास आणी उपद्रवांसाठी दिलेली औषधे घेतल्यास आराम वाटतो.
क. संप्रेरक (हार्मान) उपचार: पेशींची वाढ व कार्य संप्रेरकांमुळे नियंत्रित होत असते. पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाची वाढ ही टेस्टोस्टोरॉन या पुरूषजन्य संप्रेरकावर अवलंबून असते. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी केले तर कर्करोगाचे पमाण कमी होऊन लक्षणे संपूर्णपणे नाहीशी होऊ शकतात.

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यासाठी दोन उपाय योजतात. एक तर वृषण कापले असता टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते किंवा टेस्टोस्टोरॉन कमी करणारी इंजेक्शने किंवा गोळ्या देतात. सायप्रोटेशन ऍसेटेट व फुटामाईड ही औषधे यासाठी वापरली जातात.
ड. रसायन उपचार: कर्करोगाच्या पेशींचा नाश करणारी काही रसायने आहेत. इतर कर्करोगात त्यांचा वापर होत असला तरी पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोगात या रसायनांचा वापर क्वचितच केला जातो.

समाधानाची बाब अशी की, पुर:स्थ ग्रंथींचा कर्करोग फार सावकाश वाढतो. अनेक वयोवृध्द व्यक्ती व्याधीग्रस्त असूनही स्वाभाविक जीवनमर्यादा गाठू शकतात. पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोग पूर्णपणे बरा होणे शक्य नसले तरी हा आजार वर्षानुवर्षे काबूत ठेवणे शक्य असते व रूग्णाला सर्वसामान्य माणसासारखे जगणे शक्य असते. कर्करोगाचे शक्य तितक्या लवकर निदान व उपचार व्हावेत यासाठी लक्षणे उद्‌भवली (उदा. लघवीवेळा त्रास, वेदना, वारंवार लघवी होणे, लघवीला अधिक वेळ लागणे, लघवीत रक्त जाणे) तर तात्काळ तज्ञाला भेटावे.

कर्करोग झालेल्या व्यक्तीची मानसिकतआ शब्दात व्यक्त करणे कठीण असते. कर्करोग झाला आहे, असे कळल्यावर जबर मानसिक धक्का बसतो. रूग्न प्रथम कर्करोगाचे निदान स्वीकारण्यास तयार होत नाही. तेच तेच प्रश्न तो वारंवार विचारतो. मरण, वेदना, उपचारांचे दुष्परिणाम यासंबंधीच विचार रूग्णाच्या मनात सातत्याने येत राहतात. निरवानिरवीची भाषा तो बोलू शकतो. मृत्यूपत्र करण्याची तयारी दाखवितो. अशावेळी रूग्णाला धीर देणे अगत्याचे असतेच. पण यासंबंधीची वास्तवताही समजून घेणे गरजेचे असतेच.

कर्करोगाच्या उपचारासाठी खर्चाची तरतूद करण्याची गरज पडते. अशावेळी आरोग्य विम्याची रक्कम मिळाली तर तो आधार ठरतो. इंडियन कॅन्सर सोसायटी या संस्थेने अशी सोय माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधवा
इंडियन कॅन्सर सोसायटी
लेडी रतन टाटा मेडिकल ऍन्ड रिसर्च सेंटर.
महर्षी कर्वी रोड, नेव्ही क्लबसमोर, कुपरेज
मुंबई ४००० ०२१.