Print
Hits: 11049

समाजाच्या मनात कॅन्सर या रोगाबद्दलची भीति खोलवर दडून बसली आहे. समाजमनाचा कानोसा घेतला तर आज एड्‌स या जीवघेण्या रोगाच्या खालोखाल लोकांच्या मनात भीति असते ती कॅन्सरची! कारण या दोन्ही रोगांचा अपरिहार्य अंत मृत्यू हाच असतो असा समज सर्वसाधारणपणे समाजात आढळतो. हा समज एड्‌स बाबतीत खरा असला तरी कॅन्सर हा रोगी नेहमी जीवघेणा असतोच असे नाही, असे विधान जर मी केले तर अनेकांच्या भुवया आर्श्‍याने उंचावतील.

खुद्द जागतिक आरोग्य संघटनेच्या १९६६ व ६९ च्या कॅन्सरविषयक टेक्निकल रिपोर्टमध्ये तसे नोंदवून ठेवलेय. आता तर वैद्यकीय शास्त्र तेव्हापेक्षा कितीतरी पटीने प्रगत झालेय. तेव्हा कॅन्सर वा कर्करोग या शब्दाची मनात बसलेली भीति दूर होऊन हा रोग होऊ नये. म्हणून काय करता येईल व झालाच तर त्याच्या बरोबर प्रभावीपणे सामना करून त्याला पळवून लावता येईल. यासंबंधी सामाजिक अनुषंगाने, प्रतिबंधात्मक उपयांची चर्चा करून प्रबोधन करणे ळा प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.

थोडा इतिहास - थोडी सद्य:स्थिती
तसा कॅन्सर म्हणजे कर्करोग हा वेदकाळापासून भारतीयांना माहित असलेला रोग आहे. सुश्रूतसंहितेत कर्करोगाचे अनेक उल्लेख आढळतात. इजिप्त मधल्या जगप्रसिध्द पिरॉमिडमध्ये जे ममीफाईड मृतदेह ठेवलेले आहेत. त्यांपैकी अनेकांमध्ये कॅन्सरच्या गाठी आढळल्यात. काश्मीरमधील कांग्री कॅन्सरने व भारतात इतरत्र आढळणार्‍या तोंडाच्या कॅन्सरने १९ व्या शतकाच्या शेवटी सार्‍या जगाचे लक्ष ठेवून घेतले. आज जगभरातल्या मृत्यूंपैकी ९ टक्के मृत्यू कॅन्सरमुळे होतात.

पाश्‍चात्य - पुढारलेल्या देशामध्ये जीव घेण्याच्या बाबतीत कॅन्सरचा क्रमांक हृदयविकाररांच्या खालोखाल दुसरा आहे, तर गरिबी, कुपोषण, साथीचे रोग व प्रचंड मोठा बालमृत्यूचा दर यामुळे विकसनशील व अविकसित देशांमध्ये कॅन्सर जीव घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. आजच्या घडीला तर माणसाच्या मृत्यूची जी प्रमुख दहा कारणे भारतात आढळतात त्या टॉप टेन मध्ये कॅन्सरने स्थान मिळविले आहे.

जगात प्रतिवर्षी होणार्‍या एकूण ५ कोटी मृत्यूंपैकी जवळजवळ ५० लाख मृत्यू केवळ कर्करोगामुळे होतात व या सकस्त्रकाच्या अखेरीस हा आकडा ८० लाखपर्यंत जाईल. यावरून कॅन्सरची भयानकता व व्याप्ती ध्यान्यात येते. भारताचा विचार केला तर प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे साधारणपणे ७० जण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कॅन्सरने पीडित असतात व यामध्ये तंबाखू व तंबाखूच्या पदार्थामुळे होणार्‍याकर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे. संख्याशास्त्रीय पहाणीनुसार पूर्वी भारतात दरवर्षी ५ लाख नवे कॅन्सरचे रूग्ण तयार व्हायचे व ३ लाख कॅन्सरग्रस्त मृत्यूला कवटाळायचे.

सध्याच्या आकडेवाडीनुसार प्रतिवर्षी ९ लाख कॅन्सरचे रूग्ण तयार होतात व ५ लाख जण मरण पावतात. कॅन्सरचे प्रमाण असेच वाढत राहिले तर आणखी थोड्या वर्षानी, पुढच्या सहस्त्रकातील पहिल्या दशकात एकूण कॅन्सरच्या रोग्यांची संख्या १ कोटीपर्यंत सहज जाईल. असाहे एक अनधिकृत पाहणीचा अंदाज आहे. एकदा कॅन्सरचे निदान झालेला रूग्ण सर्वसाधारणपणे ३ वर्षापर्यत जगतो, अस मानले तर एकावेळी जवळजवळ १५ लाख रूग्णांसाठी कॅन्सरचे निदान करण्याच्या सुविधा, उपचारांसाठी आधुनिक तंत्रज्ञान व वैद्यकीय सेवा औषधे वगैरेंची पुरेशी सोय उपलब्ध करणे आपल्या देशात आवश्यक ठरते.

उद्योग व व्यवसायजन्य कारणे: आपल्या रोजच्या व्यवसायामुळे पदार्थाचा संबंध शरीराशी येऊ शकतो. या रासायनिक पदार्थामध्ये बेन्झीन, अर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, विनिल क्लोराईड, ऍसबेसटॉस, पॉलीसायक्लिक हैड्रोकार्बनस्‌, निकेल यासह अनेक पॉलीसायक्लिक हैड्रोकार्बनस्‌, निकेल यासह अनेक असंख्य माहिती नसलेली रसायने येतात. यांच्यामुळे पुरेशी काळजी घेतली नाही तर त्वचेपासून ते शरीराला कुठलाही अवयव कॅन्सरला बळी पडू शकतो. अशा व्यवसायातील व्यक्ति जर धूम्रपान करणारी असेल तर कॅन्सर होण्याची शक्यता दुपटीने वाढते.

कारखान्याच्या धुराड्यातून निघणार्‍या धुराच्या काजळीमुळे, धुराडे साफ करणार्‍या कामगारांना वृषणांचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे (Chemney Cancer) प्रथम लंडनच्या सर परसीवल पॉट यांच्या लक्षात अठराव्या शतकातच आले होते. ग्लोव्हज, गमबुट, मास्क, चष्मे, पूर्ण अंग झाकणारे कपडे इत्यादी सुरक्षा पुरविणार्‍या सुविधा वापरून या प्रकारचे कॅन्सर टाळणे शक्य होते.
विषांऊजन्य घटक: काही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हा काही प्रकारच्या कॅन्सरच्या उद्‌भवास कारणीभूत होऊ शकतो, हे आता संशोधनातून सिध्द झाले आहे.‘ बी’ प्रकारच्या काविळीचा विषाणू यकृताचा कॅन्सरचे प्रमुख कारण बनू शकतो. EBV विषाणू (Epstein Barr Virus) नाक व घशाच्या कॅन्सरचेव बुरकीट्‌स लिम्फोमा नावाच्या कॅन्सरचे कारण आहे, तरCMV विषाणू (Cytomegalo Virus) मुळे कापोसीज्‌ सारकोमा नावाचा कॅन्सर होतो. हा एड्‌सच्या रोग्यामध्ये बर्‍य़ाचवेळा आढळतो. HPV विषाणू (Human Papilloma Virus) गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबरोबर अगदी निकटचा संबंधित आहे, हे देखिल आता सिध्द झाले आहे. याखेरीज हॉजकीन लिम्फोमा, टी सेल ल्यूकेमिया या कॅन्सरनासुध्दा काही अन्य विषाणूच कारणीभूत असावेत, असा निष्कर्ष संशोधन दाखवते.
परजीवी जंत: कृमी वगैरे: सिस्टोसोमीयासीस या आजारातून मुत्राशयाचा कॅन्सर निर्माण होऊ शकतो, असे लक्षात आले आहे.
इतर कारणे: सतत प्रखर सूर्यप्रकाशात राहणे, क्ष-किरण, हवा व पाण्याचे प्रदूषण, औषधाचा अनावश्यक वापर, घरगुती व शेतीसाठी वापरली जाणारी पेस्टीसाईड्‌स, इनसेक्टी साईड्‌स, ऑरनोफॉस्फोरस रसायने यांच्यामुळेही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणार्‍या व्यक्तींनी स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक ठरते.

१९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकी या जपानी शहरांवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बमुळे त्यावेळी व नंतर किती तरी वर्षे किरणोत्सर्गामुळे अनेक प्रकारचे कॅन्सरचे असंख्य नवे रोगी तयार झाले. खुपणार्‍या टोकदार दातांमुळे क्वचित कॅन्सर उद्‌भवू शकतो. बाळंपणाच्यावेळी गर्भाशयाच्या मुखाला झालेली इजा, भाजलेल्या जखमेचा व्रण, लहान वयातील गरोदरपण, खूप बाळंतपणे ही कारणेसुध्दा कित्येकदा कॅन्सरशी संबंधित आढळून आली आहेत.

रूढी, परंपरा, सवयी, जीवनशैली व सामाजिक कारणे: या प्रकारातले सर्वोत्तम उदा. म्हणून पानतंबाखू चघळण्याच्या सवयीमुळे,धूम्रपानामुळे होणार्‍या तोडांच्या व फुफ्फुसाच्या कॅन्सरचेच देता येईल.कारण आपल्या देशात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खूप लहान वयात मुलीचे लग्न करण्याची पध्दत, अनेक पुरूषांबरोबर लैगिंक संबंध, जननेंद्रिये व गुप्तांगाची अस्वच्छता या गोष्टी स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाच्या (Cancer Cervix) कर्करोगाशी खूप जवळून संबंधित आहेत. याशिवाय पुरूष शिश्नवरील कातडे मागे ओढल्यावर जननेंद्रियावर जी खाच दिसते तीमध्ये साठून राहणारा एक विशिष्ट स्त्रावाने बनलेला स्मेग्मा नावाचा (Smegma) पदार्थ वेळोवेळी स्वच्छता करताना काढून न टाकल्यास पुरूष शिश्नाच्या व स्त्री जोडीदाराच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला कारणीभूत होतो हे निर्विवादपणे सिध्द झाले आहे.

ओरीसात मोठ्या प्रमाणात आढळणारा चुट्‌टा कॅन्सर, थंडी घालविण्यासाठी कांग्री या शेकोटीच्या खूप जवळ विशिष्ट रीतीने बसल्यामुळे काश्मीरमध्ये बर्‍याच रूग्णांमध्ये आढळणारा मांड्या व वृषणाचा कांग्री कॅन्सर, धोतर करकचून बांधल्यामुळे धोती कॅन्सर नावाचा कॅन्सर होतो. ही आहेत सामाजिक कारणे व परिस्थितीमुळे आढळणारी कॅन्सरची काही उदाहरणे.
यामध्ये कारणीभूत असणार्‍या गोष्टीबद्दल योग्य तर्‍हेने काळजी घेतली तर या प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण कितीतरी कमी करता येईल.
जनुकीय कारणांशी संबंधित घटक: कॅन्सर तयार होण्यामागे जनुकांचा (Genes) मोठा संबंध असावा अशी शंका फार वर्षापासून होतीच. उदा. रेटिनोब्लास्टोमा नावाचा कॅन्सर हा रोग झालेल्या पालकांच्या मुलांना होण्याची खूपच मोठी शक्यता असते. मंगोलटाईपच्या मुलांना ल्यूकेमिया नावाचा रक्ताचा कॅन्सर होण्याचे प्रमाण इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा बरेच आढळते.

सारांश - थोडक्यात कॅन्सरबरोबर प्रभावी लढा देण्यासाठी खालील गोष्टींना अग्रक्रम दिला पाहिजे.

  1. आरोग्य शिक्षण, लोकशिक्षण याद्वारे लोकांना माहिती पुरवून त्यांना कॅन्सरबाबर सर्व पातळ्यांवर सज्ञान करणे.
  2. धूम्रपान, तंबाखू सेवन, गुटखा, मद्यपान ही व्यसने हद्दपार करणे.
  3. वैयक्तीक स्वच्छतेबरोबर जननेंद्रियांचे व गुप्तांगाच्या स्वच्छतेबाबत जागृती करणे.
  4. संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे.
  5. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅन्सरसंबंधी चाललेल्या संशोधनाविषयी सदैव सतर्क राहणे. एवढे सगळे केल्यावर कॅन्सरच्या बागुलबोवाला पळून जाण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.