कर्करोग
कर्करोगाच्या मुळाशी!
- Details
- Hits: 5587
ई-सकाळ
अभिजित मुळ्ये
"काही "बिघडलेल्या' मूळ पेशी अनिर्बंध वाढत जातात; त्यालाच आपण कर्करोग म्हणतो', या गृहितकावर आधारित बरेच संशोधन प्रकल्प सध्या जगभर राबविले जात आहेत. हे गृहितक बरोबर ठरले तर, फक्त सध्या असाध्य गणल्या जाणाऱ्या अनेक रोगांवर रामबाण उपाय उपलब्ध होऊ शकतील. एकोणिसाव्या शतकात जीवाणूंचा शोध लागला. त्यामागोमाग प्रतिजैविके आली आणि तोवर असाध्य असणारे अनेक रोग चुटकीसरशी बरे होऊ लागले. असाच काहिसा चमत्कार या संशोधनामुळे घडून येऊ शकेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. .......
आपल्या शरीरातील काही पेशींमध्ये अन्य प्रकारच्या पेशींत विकसित होण्याची क्षमता असते. या पेशींचे विभाजन होते तेव्हा एक भाग "मूळ पेशी'च्या स्वरूपातच राहतो आणि दुसऱ्या भागापासून एखाद्या अवयवासाठी आवश्यक असलेल्या पेशी निर्माण होतात. कर्करोगाच्या दृष्टीने ही सारी प्रक्रिया महत्त्वाची ठरते. कारण, अनिर्बंध वाढ असलेल्या कर्करोगाच्या पेशी एकसारख्या दिसतात. आणि उपचारांमध्ये त्यातल्या अधिकाधिक पेशी नष्ट करण्याला प्राधान्य असते. अशावेळी सरसकट साऱ्या पेशी नष्ट करीत बसण्यापेक्षा फक्त बिघडलेल्या "मूळ पेशी' नष्ट केल्या की काम भागेल, असे हे गृहीतक आहे. या गृहितकावर अनेकांचे अनेक आक्षेप आहेत. पण, तरीही या कल्पनेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोच आहे. शिवाय, यातून अनेक औषधे निर्माण होण्याची शक्यता असल्याने औषध कंपन्यांनाही त्यात मोठा रस आहे.
विभाजनातून नव्या पेशी निर्माण होणे हे आपल्या जनुकांतच असते. मात्र, आपल्या शरीरात पुनरुत्पादनाचे हे काम काही विशिष्ट पेशींकडेच दिलेले असते. अन्य पेशींची ती क्षमता लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेने दाबून टाकलेली असते. मात्र, काही वेळा जनुकीय उत्परिवर्तनामुळे अशा पेशी वेगाने पुनरुत्पादित होऊ लागतात. ही कर्करोगाची उत्पत्ती सांगितली जाते. मूळ पेशींचे मात्र, तसे नसते. त्यांच्यात पुनरुत्पादनाची क्षमता असूनही त्या शरीरातल्या अन्य सर्वसामान्य पेशींप्रमाणे कार्य करीत असतात. त्यामुळे या पेशींमध्ये बिघाड होणे घातक मानले जाते. असा बिघाड होण्यामध्ये जनुकांची काय भूमिका असते, हेही शास्त्रज्ञ तपासून पाहात आहेत. कर्करोगाच्या पेशींमध्ये अशा बिघडलेल्या मूळ पेशी आढळतात आणि कर्करोगाचा फैलाव त्यांच्यामुळेच वेगाने होतो, असे रक्ताच्या, स्तनाच्या, प्रोस्टेटच्या कर्करोगावर संशोधन करणाऱ्या जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अलिकडेच एका परिषदेत सांगितले.