ई-सकाळ
डॉ. श्री बालाजी तांबे

योग्य वेळी योग्य उपचार केले, त्याला योग्य आहाराची जोड दिली, मुलाला वारंवार सर्दी, खोकला होणार नाही याकडे लक्ष दिले आणि प्राणवहस्रोतसाची ताकद वाढवली तर बालदम्यासारखा त्रासदायक विकार आटोक्यात आणता येणे शक्य आहे...
श्वसनासंबंधी एक सामान्य रोग म्हणजे दमा. तो जेव्हा लहान मुलांमध्ये दिसतो त्याला "बालदमा' असे म्हणतात काश्यपसंहितेत लहान मुलांच्या रोगांसंबंधी वर्णन करताना वेदनाध्याय सांगितला आहे. यात बोलू न शकणाऱ्या लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरून वैद्याने रोगाचे निदान कसे करावे हे समजावलेले आहे. अगदी लहान मुले बोलू शकत नाहीत, तसेच बऱ्याच मुलांना आपल्याला नेमके काय होते आहे, हे सांगता येत नाही. अशा वेळी मुलांच्या हावभावांवरून, लक्षणांवरून वैद्यांना रोगाचे निदान करता यावे यासाठी या अध्यायात अनेक रोगांची माहिती दिलेली आहे. त्यात दम्याचाही अंतर्भाव केलेला आहे.
निष्टनत्युरसा।त्य़ुष्णं श्वासस्तस्योपजायते।
... काश्यपसंहिता सूत्रस्थान
बालकाच्या छातीतून गरम श्वास निघतो, त्याला श्वास घ्यायला व सोडायला त्रास होतो, असे बालदम्याचे लक्षण काश्यपसंहितेत सांगितलेले आहे. आयुर्वेदीय विचारसरणीनुसार दमा होतो म्हणजे नेमके काय होते हे खालील सूत्रावरून समजू शकेल,
कफोपरुद्धगमनः पवनो विष्वगास्थितः।
प्राणोदकान्नवाहीनिदुष्टः स्रोतांसि दूषयन् ।।
... अष्टांगसंग्रह शारीरस्थान
प्राण-उदानाची जोडी श्वासोच्छ्वासाचे काम करत असते. उरलेल्या तीन वायूंचा म्हणजे समान, व्यान व अपान यांचाही प्रभाव श्वासोच्छ्वासावर होत असतोच. वाताची गती जोवर व्यवस्थित आहे तोवर श्वसन व्यवस्थित चालू असते पण ती गती कफदोषामुळे अवरुद्ध झाली तर अडलेला वात प्राणवह, उदकवह तसेच अन्नवह स्रोतसांना बिघडवतो व दम्याची उत्पत्ती करतो. थोडक्यात दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात. लहान वयात कफाचे आधिक्य स्वाभाविक असते, त्याला वाताची जोड मिळाली तर त्यातून "बालदमा' होऊ शकतो.
बालदम्याची लक्षणे
बऱ्याच मुलांमध्ये सर्दी-खोकल्याने दम्याची सुरुवात होते, छातीत कफ दाटतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वसनाची गती वाढते. पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने मूल कासावीस होते. अनेक वेळा मुलांमध्ये आपणहून उलटी होऊन कफ पडून गेला तर वाताचा अवरोध नाहीसा झाल्याने बरे वाटते. बालदम्यावर करावयाच्या उपचारांचे वर्गीकरण दोन प्रकारात करता येते
बालदम्याची कारणे
- गर्भधारणा होण्यापूर्वी आई-वडिलांपैकी एकाला वा दोघांना खोकला वा दम्याचा त्रास असणे किंवा त्यांच्यात कफ-वातदोषाचे असंतुलन असणे.
- गर्भवती स्त्रीने गर्भारपणात कफ-वात वाढेल असा आहार-आचरण करणे.
- लहान मुले अतिशय संवेदनशील असतात. डोक्या-कानाला वारा लागू नये यासाठी मुलांना टोपडे घालण्याची पद्धत असते. अंघोळीनंतर डोके तसेच अंग ओलसर राहू नये यासाठी धुरी द्यायची प्रथा असते. या प्रकारची काळजी वेळेवर घेतली नाही तर त्यामुळेही वात - कफदोषामध्ये बिघाड होऊन बालदम्याची सुरुवात होऊ शकते.
- सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहणे, पंखा, कूलर वगैरेंचा थंड हवेचा झोत सरळ अंगावर घेणे.
- लहान वयात कफ वाढण्याची प्रवृत्ती असतेच. त्यात केळे, सिताफळ, फणस, श्रीखंड, दही, बर्फी चॉकलेट, चीज, पनीर, क्रीम वगैरेंच्या अतिसेवनाची भर पडल्यामुळे कफ अधीकच वाढतो आणि बालदम्याचे बीज रोवले जाऊ शकते.
- थंड पदार्थामुळेही कफ वाढू शकतो. केक, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीमसारख्या थंड गोष्टी सातत्याने, कोणत्याही ऋतूत सेवन करण्याची सवयही दम्यास कारणीभूत ठरू शकते. अन्नवहस्रोतसातील बिघाडही बालदम्याचे कारण ठरू शकते. विशेषतः पोटात जंत असणे, मलावष्टंभाची प्रवृत्ती असणे या दोन कारणांमुळे हळूहळू दम्याची लक्षणे उद्भवू शकतात. प्राणवह स्रोतसाची ताकद कमी असल्यानेही दम्याला आमंत्रण मिळू शकते. वारंवार सर्दी-खोकला होणे, नाक बंद पडल्याने श्वास नीट न घेता येणे वगैरे लक्षणे श्वसनसंस्था कमकुवत असल्याची निदर्शक असतातच. त्यातून, यावर जर केवळ रोग दबविणारे उपचार केले गेले तर असंतुलन वाढून त्याचे पर्यवसान दम्यात होऊ शकते. दमट हवामानात, ओल आलेल्या घरात राहणेसुद्धा दम्याला पोषक ठरू शकते.
दम्याचा वेग आला असता करायचे उपचार
- दम्याचा वेग आला असताना छातीला व पाठीला वात-कफशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तीळ तेल लावून शेक करण्याचा उपयोग होतो. उदा. नारायण तेल किंवा "संतुलन अभ्यंग तेला'त थोडे सैंधव टाकून तेल थोडे गरम करावे आणि छातीवर तसेच पाठीवर जिरवावे. हे तेल थोडेसे रुईच्या पानांनाही लावावे व त्यांच्या साहाय्याने १०-१२ मिनिटे शेकावे.
- रुईची पाने उपलब्ध नसल्यास ओव्याच्या पुरचुंडीनेही शेकता येते.
- ज्या मुलांना वाफारा घेणे जमते, त्यांना गरम पाण्यात आले, तुळशीची पाने, ओवा, निलगिरीची पाने किंवा तेल वगैरे टाकून वाफारा द्यावा.
- वैद्यांच्या सल्ल्याने मधासह शृंगादी चूर्ण, मयूरपिच्छा मषी, श्वासकुठाररस, अभ्रक भस्म वगैरे औषधी योग देता येतात.
दम्याचा वेग नसताना करायचे उपचार
वेग नसताना एका बाजूने दम्याचा त्रास होऊ नये यासाठी उपचार करावे लागतात, दुसऱ्या बाजूने प्राणवहस्रोतसाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सितोपलादि चूर्ण, "श्वास सॅन चूर्ण', "प्राणसॅन योग' वगैरे औषधी योग उत्तम होत. च्यवनप्राश, "संतुलन शांती रोझ' सारखी रसायने घेण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. खोकला होतो आहे, असे वाटल्यास लगेचच औषधे सुरू करावीत. चार कप पाण्यात ज्येष्ठमधाची बोटभर लांबीची कांडी, एक बेहडा व अडुळशाचे एक पिकलेले पान घालून मंद आचेवर एक कप उरेपर्यंत उकळू द्यावे. तयार झालेला काढा गाळून घेऊन साखरेसह द्यावा. "श्वास सॅन चूर्ण' मध व आल्याच्या वा तुळशीच्या रसासह चाटवावे. अशा मुलांना प्यायचे पाणी शक्यतो गरम करूनच द्यावे.
बालदमा असणारे मूल घरात असले तर त्यांच्या खाण्या-पिण्यात विशेष काळजी घ्यायला हवी. उदा. स्वयंपाक करताना आंबट चवीसाठी दही, चिंच, कैरीऐवजी कोकम वापरता येते; स्वयंपाक करताना आल्याचा, मिरी, पिंपळीचा वापर करता येतो; दूध, दही, दुधापासून बनविलेल्या मिठाया रात्री खाणे टाळता येते; गरम पाणी पिण्याची सवय लावता येते; सातत्याने ए.सी.चा वापर टाळण्यानेही अपेक्षित उपयोग होतो. मूल मोठे झाले की त्रास आपोआप बरा होईल अशा कल्पनेमुळे बालदम्याचा त्रास बऱ्याच वेळा उपेक्षित राहतो. परंतु, असे करणे चुकीचे होय. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मुलाचे प्राणवहस्रोतस कमकुवत राहून जाते, त्याने भविष्यात त्रास होऊ शकतो. तसेच, लहान वयात अपेक्षित असणाऱ्या शारीरिक, बौद्धिक विकासासाठी प्राणवायूचा व प्राणशक्तीचा पुरेसा पुरवठा होणे अपरिहार्य असते. दम्यामुळे ही प्राणशक्ती कमी मिळाली तर ते मुलांच्या वाढीला, एकंदर विकासाला घातक ठरू शकते.
घरामध्ये दम्याचा इतिहास असला तर दमा पुढच्या पिढीत संक्रामित होऊ नये यासाठीही प्रयत्न करता येतात. यामध्ये गर्भसंस्कार करण्याचा, विशेषतः गर्भधारणेपूर्वी व गर्भावस्थेत विशिष्ट औषधोपचार घेण्याचा उपयोग होतो.