सकाळ
12 June 2012
पुणे - कुटुंब कल्याण विभागातील "टोल फ्री' क्रमांकाच्या मदतीने गर्भलिंग निदान करणाऱ्या 22 सोनोग्राफी केंद्रांना टाळे ठोकण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. त्यात "आमची मुलगी' या संकेतस्थळाची मोलाची मदत झाली आहे.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांची माहिती थेट सरकारी यंत्रणेला समजावी यासाठी आरोग्य खात्यातर्फे www.amchimulgi.in हे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, 18002334475 या "टोल फ्री' क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली आहे. या वर्षी 1 जूनपासून "टोल फ्री' क्रमांकावर 29 तक्रारी दाखल झाल्या, तर संकेतस्थळावर 13 जणांनी गर्भलिंग निदान करत असलेल्या डॉक्टरांची माहिती दिली. ही सर्व माहिती सामान्य नागरिकांनी दिलेली आहे. दाखल झालेली तक्रार संबंधित विभागातील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठविली जाते. त्यावर काय कारवाई केली, याचा पाठपुरावाही या विभागातर्फे केला जातो, अशी माहिती कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी जुलैमध्ये कार्यान्वित झालेल्या या संकेतस्थळावर आणि "टोल फ्री' क्रमांकावर राज्यातील बीड, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 212 तक्रारी आल्या असून, त्यापैकी 130 तक्रारींची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, 31 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. संकेतस्थळावर दाखल झालेल्या 232 पैकी 97 तक्रारींची चौकशी पूर्ण झाली आहे; तर 108 तक्रारींचा तपास सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
25 औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी आतापर्यंत 25 औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही मोहीम गेल्या एक वर्षापासून पुण्यात सुरू आहे, अशी माहिती "अन्न व औषध द्रव्य प्रशासन'च्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त बी. आर. मासाळ यांनी दिली. ते म्हणाले, "गेल्या पाच दिवसांमध्ये पुणे विभागातील 147 औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 66 जणांना "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात पुण्यातील 38 दुकानांचा समावेश आहे."