महाराष्ट्र टाईम्स
०८ ऑक्टोबर २०१२
पुणे, भारत.
मधुमेहासह लठ्ठपणा , किडनी , डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे सारख्या विविध आजारांनी त्रासलेल्या पेशंटला आता नव्या संशोधनातून दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . मधुमेह झालेल्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी जठराची रचना बदलणारी ' गॅस्ट्रीक सर्जरी ' केल्यास मधुमेहासह अन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन केले जात आहे . परिणामी उपचारासाठी होणारा खर्च वाचून पेशंटच्या शारीरिक व्याधी कमी करणे शक्य होणार आहे .
रुबी हॉल क्लिनिकमधील बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ . जयश्री तोडकर , डॉ . शशांक शहा आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ . उदय फडके याबाबत संशोधन करीत आहेत . संशोधनाबाबत डॉ . तोडकर यांनी ' मटा ' ला माहिती दिली .' लठ्ठपणाबरोबर किडनीसारख्या अन्य आजार असणाऱ्या ' टाइप टू ' प्रकारच्या मधुमेहींवर संशोधन सुरू झाले आहे . अमेरिकासह अन्य देशांत मधुमेहींची उंची व वजनाच्या आधारे काढला जाणारा तौलनिक निर्देशांक ( बीएमआय ) ३२ ते ४० असणाऱ्या पेशंटवर सर्जरी केल्यानंतर त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले . मात्र , बीएमआय २५ ते ३२ असणाऱ्यांवर सर्जरी केल्यास मधुमेहासह अन्य आजार नियंत्रण राहतात का हा संशोधनाचा खरा हेतू आहे . त्यासाठी ' टाइप टू ' प्रकारच्या ८८ मधुमेहींवर संशोधन होणार आहे . संशोधनात आतापर्यंत ४६ पेशंटचा समावेश झाला आहे .
निम्म्या पेशंटला सर्वाधिक चांगल्या दर्जाचे मोफत औषधोपचार तर इतरांवर ' गॅस्ट्रीक सर्जरी ' करण्यात येणार आहे ,' असे डॉ . तोडकर यांनी सांगितले .
सर्व पेशंटवर दोन वर्ष सातत्याने लक्ष ठेवले जाईल . प्रकृतीत होणारा बदल , कोणत्या औषधाने किती फरक पडतो , सर्जरीचा नेमका परिणाम हे पाहिले जाईल . वजन घटते का , अन्य आजार कमी होतात का , शरिररातील ' हार्मोन्स ' बदलतात का याचेही निरीक्षण केले जाणार आहे . यासाठी मधुमेह झालेल्यांना संशोधनात सहभागी होण्याची इच्छा असल्यासे रुबी हॉस्पिटलमध्ये ०२० - ६६४५५३०६ यावर संपर्क साधावा , असे आवाहन डॉ . तोडकर यांनी केले .
सर्जरीनंतर पडला फरक
' सहा वर्षापासून मला मधुमेह आहे . यकृत व किडनीला सूज आली होती . डोळ्यांना दिसेनासे झाले होते . संशोधनात सहभागी झाले आणि तीन सप्टेंबरला माझ्यावर ' गॅस्ट्रीक सर्जरी ' झाली . त्यामुळे महिन्यात आठ किलो वजन घटले व सूजही नाहीशी झाली . साखरेचे कमी जास्त प्रमाण नियंत्रणात आल्याने मला आता बरे वाटते आहे ,' अशा शब्दांत बदलापूरच्या पेशंट गीता टेंबूलकर यांनी प्रतिक्रिया दिली .