सकाळ
२७ जुलै २०१२
पुणे भारत
गर्भवतींची सोनोग्राफी करण्यास स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना केंद्रीय आरोग्य खात्याने हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, सोनोग्राफी केंद्राची नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. दरम्यान, केंद्राने घेतलेल्या या निर्णयाची लेखी सूचना अद्याप पोचली नसल्याने त्याची अंमलबजावणी राज्यात करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
"गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र' (पीसीपीएनडीटी) या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. य अंतर्गत कागदपत्रांची पूर्तता नसणे, "एफ फॉर्म' अपूर्ण भरणे, अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेकडो सोनोग्राफी यंत्रे "सील' करण्यात आली आहेत. तसेच, रेडिओलॉजिस्ट वगळता इतर वैद्यक शाखेतील डॉक्टरांनी सोनोग्राफी करू नये, असेही आरोग्य खात्याने बजाविले आहे.
नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांनी या धोरणाला विरोध केला. त्यामुळे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना गर्भवतींची सोनोग्राफी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना सोनोग्राफी करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने मोठ्या नर्सिंग होमच्या रुग्णसेवेवर परिणाम झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. संजय गुप्ते यांनी "सकाळ'ला माहिती दिली. ते म्हणाले, ""स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना गर्भवतींची सोनोग्राफी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंडळाच्या यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला; त्यावर नुकत्याच झालेल्या बैठकीतही चर्चा करण्यात आली."
मात्र, केंद्रीय सल्लागार मंडळाने घेतलेला निर्णय राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांपर्यंत अद्याप पोचलेला नाही. त्यामुळे हे अधिकारी त्याला मान्यता देत नाहीत. इतर निर्णयांप्रमाणेच याचेही राजपत्रात प्रकाशन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांपर्यंत ही माहिती पोचेल."
दरम्यान, केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समजली आहे. पण, त्याबाबत कोणताही आदेश मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या नियमांप्रमाणे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञांना सोनोग्राफी करण्यास मान्यता देता येणार नाही, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
"एफ फॉर्म'मध्ये सुधारणा सुरू
गर्भवतींच्या सविस्तर माहितीची नोंद ठेवणाऱ्या "एफ फॉर्म'मध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्याचे काम पुण्यातील कुटुंबकल्याण विभागात सुरू आहे. सध्याचा "एफ फॉर्म' किचकट असून, तो अधिक सुलभ करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत केंद्र सरकारला या नवीन "एफ फॉर्म'चा नमुना पाठविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.