सकाळ
8 June 2012
पुणे – स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच जिल्ह्यातील सर्व गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 पथके स्थापन करण्यात आली आहेत. तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून, आता त्या संदर्भात तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. याबाबत गणेश पाटील म्हणाले, "जिल्ह्यात 338 गर्भपात केंद्रे आणि 240 सोनोग्राफी केंद्रे आहेत. जूनअखेरपर्यंत त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत सर्व केंद्रांचे कामकाज, कागदपत्रे, यंत्रणा कायद्याच्या कसोटीवर तपासून घेतली जाणार आहे."
"कोणत्याही केंद्रामध्ये बेकायदा कृत्य केले जात असल्यास वा तशी माहिती पुढे आल्यास संबंधित केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. या केंद्रांमधील कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्यास त्याबाबत केंद्रचालकांना त्वरित खुलासा सादर करावा लागणार आहे. राज्य सरकारने स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून, जिल्ह्यातील कारवाईचा अहवाल सरकारला पाठविण्यात येणार आहे," असे पाटील यांनी सांगितले.
बेकायदा केंद्रांवर कारवाई
पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भपात केंद्रे चालविली जात असल्याची, तसेच स्त्रीभ्रूण हत्या करण्यासाठी नागरिकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याची तक्रार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या तपासणी मोहिमेत या केंद्रांचा शोध घेतला जाणार आहे. अशी केंद्रे आढळल्यास संबंधित डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांवर लगेचच गुन्हा दाखल केला जाणार आहे.