सकाळ
18 June 2012
आजच्या नीतिमत्ता ढासळत चाललेल्या समाजाचा एक घटक असलेली आरोग्यसेवा आणि आरोग्य हे सडलेल्या स्थितीत आहे, हे "निदान' वादापलीकडचं आहे. हा सडका, काळा, दुर्गंधीनं भरलेला भाग डॉक्टरांपासून आणि रुग्णांपासूनही लपून राहिलेला नाही. आता हा भाग डॉक्टर-मंडळींकडून सोईस्कररीत्या दुर्लक्षिला जातो, हा भाग वेगळा; पण या भागाकडं दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांशिवायही डॉक्टरांचा दुसरा एक गट हा अत्यंत चांगल्या व सेवाभावी डॉक्टरांचा आहे. हा गटातील डॉक्टर ह्या सडक्या भागाचा रोज स्वत: अनुभव घेतात; त्यामुळं ते स्वत: असुरक्षित असतात, खूप बचावात्मक पवित्रा घेत स्वत:चं संरक्षण करतात; पण त्याच वेळी त्यांच्याकडं येणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचारही करतात. अक्षरश: रात्र रात्र जागतात, स्वत:च्या कुटुंबाकडं दुर्लक्ष करतात. हे केवळ पैशासाठी नव्हे; तर रुग्णसेवेतून त्यांना आनंद मिळतो म्हणून ते असं करत असतात.. मात्र डॉक्टरांचा हा वर्ग सडक्या भागाकडं पाहायलाही घाबरतो. कारण हा सडका भाग म्हणजे एकूणच व्यवस्थेचा परिणाम आहे व याविरुद्ध लढणं म्हणजे कपाळमोक्ष करून घेण्यासारखं आहे, या वास्तवाची त्यांना यथायोग्य जाणीव असते; पण आज समाजापुढं भीषण वास्तव असं उभं राहिलं आहे, की काही वर्षांतच हे चांगले डॉक्टर "भूतकाळाचा भाग' होणार आहेत. जो काही "प्राणवायू' आहे तोही संपून जाणार आहे! पण ही वरवरची लक्षणं आहेत. शरीरात आजार वेगळाच आहे. या सडत जाणाऱ्या आरोग्याचं व आरोग्यसेवांचं प्रमुख कारण आहे ते गेल्या शंभर वर्षांतला जगातच एकूण बदलत गेलेला समाजाचा दृष्टिकोन.
आणि तो दृष्टिकोन आहे – "आरोग्य आणि आरोग्य सेवा "साबण/दारू'सारखी एक विक्रीयोग्य वस्तू आहे!' आम्हा सर्वांच्या मानसिकतेत ही जाणीव कळत–नकळत खूप खोलवर रुजलेली आहे, एखाद्या एचआयव्ही विषाणूसारखी. ती दिसत नाही; तिची लक्षणं केवळ दिसतात. या जाणिवेनं सगळ्यांना ग्रासलं आहे अन् हे चांगले डॉक्टरसुद्धा या सर्वदूर संसर्गात त्यांची माणुसकी टिकवून धरत, तगत आहेत.
या मूळ रोगाचे परिणाम झाले आहेत, ते असे :
"आरोग्य ही रुग्णाची जबाबदारी राहिलेली नाही; तर ती खरेदी करण्याची वस्तू झाली आहे; "पैसा टाका व आरोग्यसेवा विकत घ्या' या वृत्तीत होत चाललेली वाढ, हा मुख्य परिणाम होय. याची काही मोजकी उदाहरणं अशी ः संततिनियमनाची साधनं न वापरणं आणि "गर्भ राहू देणं व सहज काही शेकड्यांच्या-हजारांच्या नोटा स्त्रीरोगतज्ज्ञावर फेकून "खरवडून टाक हा गर्भ,' अशी "एक पेप्सी द्या'सारखी मागणी करणं! पण असं केल्यामुळं आपल्या शरीरावर याचे काही दुष्परिणाम होतात, क्वचित अगदी मृत्यूही ओढवतो व हे सगळं जर आपण "आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे,' असं मानलं तर टळू शकतं ही जाणीवच नष्ट झाली आहे. हातात पैसे असणं एवढंच पुरेसं आहे! अशी शेकडो उदाहरण आरोग्याच्या अनेक वेगवेगळ्या शाखांमध्ये सापडतात. मग ती अँजिओप्लास्टी करून पुन्हा धूम्रपानाला सुरवात करणं असो वा वाढत जाणारं वजन! रुग्ण घासाघीस करायला शिकला आहे अन् डॉक्टर "पाकिटानुसार पॅकेज' द्यायला शिकला आहे. यामध्ये आवश्यक त्या दर्जाची सामग्री (शिवायचे धागे वगैरे) वापरली जाते का नाही, योग्य त्या चाचण्या केल्या जातात का नाही, हे भानच रुग्णाला नसतं. कारण डॉक्टर आहेत रुग्णाच्या दृष्टीनं केवळ "दुकान टाकलेले व्यापारी' अन् आरोग्य सेवा आहे ही "विकत मिळणारी वस्तू'!
काही मोजक्या तपासण्या करून गर्भपिशवी सहजपणे काढताना, हे सगळं रुग्णाच्या "बजेट'मध्ये बसवायचं म्हणून वाटेल त्या धाग्याची तडजोड करत शस्त्रक्रिया केल्या जातात, हे मी पाहिलं आहे. "रुग्णाला परवडेल', "तो दुसऱ्या "दुकाना'त जाणार नाही' यासाठी पैशात ही अशी "काटछाट' केली जाते. आजार व मृत्यू या बाबी मानवी जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहेत, आज विज्ञान-तंत्रज्ञान कितीही पुढं गेलं असलं तरी अन् कितीही पैसा ओतण्याची ताकद असली तरी शस्त्रक्रिया अपयशी ठरणं, उपचारांमुळं "साईड इफेक्ट' होणं, काही आजार तसेच राहणं वा प्रसंगी मृत्यू होणं हे सर्व अपरिहार्य आहे, या विषयीचं रुग्णांचं भान या मूळ रोगामुळं उडालं आहे. पैसे टाकून सेवा विकत घेणारा रुग्ण ही परिस्थिती मान्य करायला आज तयारच नाही. आज असं काहीही घडलं, की रुग्ण चवताळतात व हल्ले करतात.
याच आरोग्यसेवा खरेदी करण्याचा एक भयावह परिणाम म्हणजे स्त्री भ्रूणहत्या. डॉक्टर तर मूळ दोषी आहेतच; त्यांनी सगळ्यांनी ठरवलं तर हे घडणारच नाही; पण "सोनोग्राफी करा व लिंगनिदानात मुलगी आढळली तर भ्रूण नष्ट करून टाका,' अशी मागणी पुरुषकेंद्री अन् स्त्रीवर अन्याय करणाऱ्या भारतीय विचारसरणीत वाढलेला रुग्ण करतो. ही "सेवा' तो खरेदी करायला येतो. नंतर असं करणाऱ्या डॉक्टरांची संभावना"नराधम' अशी प्रसारमाध्यमांतून होते व ते योग्यही आहे; पण अशा "खरेदी'साठी येते ती स्त्री? तिचा नवरा? तिची सासू? या सगळ्यांचं काय? ही सगळी मंडळी खरेदी करायला आलेली असतात लिंगनिदान अन् स्त्री भ्रूणाचा खून! कारण "आरोग्य ही केवळ खरेदी करण्याची गोष्ट असते', असा समज करून घेऊनच हे लोक आलेले असतात. मग घाईघाईनं सोनोग्राफी मशिनच या सगळ्याचं कारण आहे, असा समज करून घेतला जातो. भराभर काही तरी केल्याचं समाधान मिळावं म्हणून पोर्टेबल सोनोग्राफीवर बंदी घातली जाते. एका लिव्हर एबसेसच्या पुरुषाचा मृत्यू यामुळं झाला असल्याचं मला माहीत आहे. जर आपण आरोग्य ही खरेदी करण्याची वस्तू मानत असू तर स्त्रीलिंगनिदान विकणाऱ्यावर दोषारोप ठेवू शकू निश्चितच; पण त्यानं प्रश्न अजिबात सुटणार नाही. खरेदीची किंमत फक्त वाढत जाईल अन् ज्यांना परवडतंय ती ते देत राहतील.
खरेदीचा एक महत्त्वाचा पैलू असतो तो म्हणजे इन्स्टंट लाभ! सारं काही झटपट! यात खूप अतर्क्य व डॉक्टरांना हताश करणाऱ्या मागण्या असतात. उदाहरणार्थ ः सलाईन, टॉनिकचा आग्रह. सर्व चांगल्या डॉक्टरांना मग थकून प्रवाहात उतरून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा मार्ग पत्करावा लागतो. "तुम्हाला सलाईन लावता येत नाही का?' असा थेट प्रश्न माझ्या एका डॉक्टर–मित्राला एका "गिऱ्हाईका'नं विचारला होता. "दुकानात माल नाही का?' असा त्या प्रश्नाचा थाट होता!
गेल्या 50 वर्षांत झालेल्या तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळं व जागतिकीकरणामुळं नि उदारीकरणामुळं एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे; पण याबरोबरच "खरेदी'ला अजून एक वाकडं वळण मिळालं आहे. म्हणजे जो डॉक्टर हातानं स्पिन तपासतो त्या डॉक्टरपेक्षा सोनोग्राफीनं जो निदान करतो, तो श्रेष्ठ ठरत आहे रुग्णाच्या दृष्टीनं! आता डोळ्याचा नंबर तपासणं हे साधी वेगवेगळी भिंगं वापरून सहजशक्य असतं; पण ग्रामीण भागातसुद्धा माझ्या एका ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट मित्राला न परवडणारा कॉम्प्युटर "लोकाग्रहास्तव' आणावा लागला आहे!
गरज नसलेल्या शस्त्रक्रियेचा आग्रहही रुग्णांकडून अनेकदा धरला जातो; हाही या आधुनिक तंत्रज्ञानाचाच परिणाम! माझे अनेक ऑर्थोपेडिक मित्र अक्षरश: हताशपणे हे बघत आहेत. साधं फ्रॅक्चर असलं व खूप कमी खर्चात साधं हाड जुळवून ते बरं होणार असलं तरी "तुम्ही प्लेट का नाही बसवत?' असा प्रश्न करत अशा "सेवा' मागणीबरहुकूम देणाऱ्या दुसऱ्या "दुकाना'त खरेदी करण्यासाठी रुग्ण निघून जातो; तेव्हा या माझ्या मित्रांसमोर "मागणी तसा पुरवठा' करून चार पैसे जास्त मिळवण्याचाच पर्याय उरतो! पण काहींनी तो मोह, मागणी असूनही, टाळला आहे. अशी उदाहरणं इतर सर्वच शाखांमध्ये आढळतील. "अँजिओप्लास्टीची गरज नाही; तुमच्या हृदयाचा जो आजार आहे, तो साध्या औषधांनी बरा होईल,' असं सांगणाऱ्या डॉक्टरांवर आता रुग्णाचा विश्वास नसतो!
"खरेदी'चा अजून एक चंगळवादानं घडवलेला पैलू म्हणजे, जे फुकट व जे कमी किमतीचं व जे कमी झकपक आहे, ते सर्व हीन दर्जाचं! वस्तू कशी महाग, चकचककीत हवी; तरच ती उत्तम! सरकारी आरोग्यसेवांमध्ये आजही अनेक डॉक्टर व नर्स अत्यंत उत्तम काम करत आहेत; पण त्यांची "वस्तू' फुकट आहे; मग ती हीन दर्जाचीच असणार, हा समज!
"सरकारी दवाखान्यात मिळणाऱ्या आयर्न व कॅल्शियमच्या गोळ्या घ्या; त्यांत व बाजारात मिळणाऱ्या गोळ्यांत काहीही फरक नाही,' असं सांगितलं तरी कुणीही ऐकत नाही,' असा खेडेगावात प्रॅक्टिस करणाऱ्या अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांचा अनुभव आहे. खासगी डॉक्टरांकडं सॅम्पल येतात. अनेक डॉक्टर ती रुग्णांना सद्भावनेनं मोफत देतात; पण कालांतरानं असं लक्षात येतं, की फुकट मिळालीत म्हणून रुग्ण ती फेकून देतात. मग सद्भावनेनं वागणाऱ्या या डॉक्टरांपुढं दोनच पर्याय उरतात. एक ः ती सॅम्पल' विकायची; दोन ः सॅम्पल घेणंच बंद करायचं. जेनेरिक औषधांबद्दलही हीच प्रतिक्रिया येते. असाच प्रकार रुग्णालयांच्या बाबतीतही आहे. आज अनेक डॉक्टरांची स्वतःची रुग्णालयं आहेत, पण ती आता "जुनी' झाली आहेत. नवं एखादं चकचकीत रुग्णालय निघालं थाटमाट करून, की "खरेदीदारां'चा ओघ तिकडं वळलाच! नवे डॉक्टर खरंच उदात्त भावनेनं व्यवसाय सुरू करतात; पण असं लक्षात येतं, की नैतिकदृष्ट्या व्यवसाय केला तर काही खरं नाही! कुणी फिरकणारच नाही इकडं; मग बघता बघता आपोआप ते धंदेवाईक होतात बाजारात टिकण्यासाठी. सलाईन, टॉनिक, गरज नसलेल्या शस्त्रक्रिया, नवनव्या चाचण्या, "आरोग्य नीट आहे ना,' हे ठरवणाऱ्या भारंभार चाचण्यांचं पॅकेज. अशा नानाविध तऱ्हा!
"मागणीप्रमाणं पुरवठा' हे तत्त्व एकदा स्वीकारलं की पुढची पायरी येते ती मागणी तयार करण्याची. त्यातही अनेक पद्धती. मुख्य पद्धत म्हणजे सरकारी आरोग्यसेवांविरुद्ध प्रचार. रुग्ण खासगी क्षेत्रातच येणं ही या बाजाराची प्रमुख अट. सरकारी यंत्रणा आता कोसळत चालल्या आहेत, याचा भक्कम आधार या अटीला मिळतोच!
"सत्यमेव जयते' या आमीर खानच्या मालिकेमध्ये खासगी "सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये गरिबाची शस्त्रक्रिया कशी केली जाते, याचं प्रभावी उदाहरण देण्यात आलं खरं आणि ते स्वागतार्हच आहे; पण त्यामागचं एक भीषण सत्य मात्र या मालिकेनं पुढं आणलं नाही. पात्रता असूनही या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांमध्ये नगण्य प्रमाणात होतात! आरोग्य आणि आरोग्यसेवा ही साबण/दारूसारखी खरेदी–विक्रीयोग्य वस्तू होणं हा मूळ रोग आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टरांना नावं ठेवून, त्यांच्यावर हल्ले करून हा प्रश्न सुटणार नाही. डॉक्टरांनी सत्यानं व नैतिकतेनं वागणं हा एक उपाय आहे; पण ही सगळी व्यवस्था सुधारण्यासाठी काही व्यवस्थात्मक उपाय आहे की नाही, हाही विचार रुग्णांनी, सरकारनं, राजकीय नेत्यांनी, डॉक्टरांनी व त्यांच्या संघटनांनी करायला हवा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. इतर अनेक देशांत राबवली जात असलेली "सर्वांसाठी आरोग्यसेवा" (युनिव्हर्सल हेल्थ केअर) ह्या व्यवस्थेचा विचार भारतासाठी कसा करता येऊ शकेल, हेही पाहायला हवं. या अशा पर्यायाचं शिवधनुष्य समाज म्हणून आपण पेलू शकलो, तरच आजच्या सडलेल्या स्थितीवर यशस्वी उपाययोजना करता येऊ शकेल. अन्यथा लक्षणं बळावत जात राहतील आणि त्यांच्यावर वरवरच्या मलमपट्ट्या केल्या जात राहतील!