सकाळ
०६ जुलै २०१२
पुणे – एखाद्या आलिशान खासगी रुग्णालयाच्या दर्जाला साजेसा हृदयशस्त्रक्रिया विभाग ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात उभारून सर्वसामान्यांना परवडेल अशी सेवा देण्यासाठी झटणाऱ्या डॉ. अविनाश इनामदार यांच्या कराराची मुदत वाढविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर झाला असून गेल्या दोन महिन्यांत ससूनमध्ये एकही मोठी हृदयशस्त्रक्रिया झालेली नाही. ससूनमधील या राजकारणाचा फटका रुग्णांना बसत आहे.
डॉ. अविनाश आणि डॉ. संजीवनी इनामदार या दांपत्याने गेल्या बारा वर्षांत ससून रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया विभाग विकसित केला. त्यासाठी त्यांनी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे या विभागात आणली. पण तांत्रिक कारणांआधारे त्यांना या विभागाच्या बाहेर ठेवण्याचे राजकारण शिजत असल्याची माहिती समोर आली आहे.
ससून रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सा विभागात बायपास, हृदयाच्या झडपा बदलण्यापासून ते नवजात बालकांवर शस्त्रक्रिया केली जाते. एक ते दीड लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया होते. याच शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण हृदयशस्त्रक्रियेसाठी ससून रुग्णालयात येतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टरांअभावी शस्त्रक्रिया होत नसल्याने या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे, अशी माहिती येथील काही डॉक्टरांनी दिली.
2001 मध्ये हृदयशस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख पदावर डॉ. इनामदार यांची करारतत्त्वावर ससून रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली होती. हा करार जानेवारी 2012 मध्ये संपला. पण दुसऱ्या एका करारानुसार त्यांची अभ्यागत प्राध्यापक म्हणून नियुक्त यापूर्वीच करण्यात आली होती. दर वर्षी या कराराचे नूतनीकरण करण्यात येत होते. त्या आधारावर त्यांनी पुढील पाच महिने या विभागात रुग्णसेवा केली. अभ्यागत कराराची मुदतही 20 मे 2012 रोजी संपली. मात्र, या दोन्हीपैकी एकाही कराराचे नूतनीकरण झालेले नाही. या कराराचे नूतनीकरण आज किंवा उद्या होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया नाहीत
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागात कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झाली नाही. येथे काही सामान्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या."