ई सकाळ
०८ एप्रिल २०१२
लंडन, इग्लंड
सर्व प्रकारच्या कर्करोगावरील लस तयार विकसित केली असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. या लसीमुळे ट्यूमरच्या पेशी नष्ट करणाची क्षमता व्यक्तीच्या शरीरात निर्माण होणार आहे.
सर्व प्रकारचे कर्करोग 90 टक्के दूर करण्याच्या दृष्टीने ही लस तयार करण्यात आली आहे. स्तनाचा किंवा अन्य किरकोळ कर्करोगांशी लढण्यासाठी ही लस तयार असल्याचे टेल अव्हिह विद्यापीठ आणि औषध निर्माण कंपनी वॅक्सिल बायोथेरपुटिक्सच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने ही माहिती दिली.
ही लस रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वेग वाढवते, आणि रोगाची तीव्रता कमी करत असल्याचे या लसीच्या वैद्यकीय चाचणीत आढळून आले आहे. संडे टेलिग्राफ या नियतकालिकात त्याबाबचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
या लसीची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी आता शास्त्रज्ञांमार्फत मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात येणार आहेत. किंबहुना, प्राथमिक टप्प्यातील कर्करोगावर या लसीचा प्रभावीरीत्या उपयोग होऊ शकतो किंवा हा रोग पुन्हा होऊ नये, यासाठीदेखील तिचा वापर करता येऊ शकतो, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्यपणे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती बाहेरून आलेल्या बॅंक्टेरियासारख्या पेशींवर हल्ला करत असते. मात्र, कर्करोगात कर्करोगाच्या पेशीच रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील पेशींचे ट्यूमरमध्ये रुपांतर होते.
ही लस कर्करोगाच्या पेशी ओळखून त्या नष्ट करण्याचे काम करेल, असे हे शास्त्रज्ञ म्हणाले.