सकाळ .
१२ जुलै २०१२
पुणे – मेहतर समाजाची सर्वंकष माहिती या समाजाच्या तरुणांकडून संगणकाच्या मदतीने तयार करून त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थान करण्याचा निर्णय एसएमएसवन या संस्थेने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी घाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. अभिनेता आमीर खान याच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमालाही आमचा सक्रिय प्रतिसाद आहे, असेही ते म्हणाले.
मेहतर समाजाला आजही हाताने मैला वाहतुकीचे काम करावे लागते. ही बाब संपूर्ण मानव जातीसाठी लांच्छनास्पद असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले. त्यांना या कामासाठी "आरोग्य डॉट कॉम'चे तुषार संपत यांचे सहकार्य लाभणार आहे.
घाटे म्हणाले, की मेहतर समाजाची सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना प्रथम एसएमएससेवेच्या माध्यमातून एकत्र आणायचे आणि त्यांच्यामार्फत त्यांचे भाऊबंद व इतर नातेवाइकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. हा डाटा मिळाल्यानंतर आम्ही या सर्वांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या, शासकीय योजना, लघुउद्योग, कौशल्य विकासविषयक संधींची माहिती त्यांना उपलब्ध करून देऊ. त्यासाठी एसएमएसबरोबरच फेसबुक, व्हाइस कॉल, ई–मेल, यू–ट्यूब, नियतकालिक यांचाही उपयोग करण्यात येईल. 8484878786 या क्रमांकावर नाव, ठिकाण, जात, व्यवसाय आदी माहिती एसएमएसद्वारे कळविल्यास माहिती देण्यास सुरवात केली जाईल. गोळा झालेली माहिती "सत्यमेव जयते'लाही प्रदान करण्यात येईल, असेही घाटे आणि संपत यांनी सांगितले.