महाराष्ट्र टाइम्स
21 मे 2012
पित्त, डायबेटिससाठी 'अहीर भैरव', तर हृदयरोगासाठी 'शिवरंजन'
म. टा. प्रतिनिधी पुणे
बदलत्या जीवनशैलीमुळे होणा–या चुकांचे मानवी शरिरावर दूरगामी परिणाम होऊ नयेत, या साठी संगीतातील विविध रागांच्या आधारे एकेक आजार दूर करणे शक्य असल्याची प्रचिती आली, 'आरोग्य संगीत' या कार्यक्रमातून...
हार्ट अॅटॅक, डायबेटिस, पित्त, वात, कफ, पचन प्रक्रिया यासारख्या विविध आजारांवर विविध राग ऐकल्याने चांगला परिणाम होतो. मानवाच्या आरोग्यावर परिणाम साधणाऱ्या संगीताचा अनोखा कार्यक्रम कोल्हापूरच्या 'फायटो आर्ट सर्कल' आणि संस्कार जीवनगाने यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांची शनिवारची संध्याकाळ आरोग्य संगीतमय झाली. कार्यक्रमाची मूळ संकल्पना दिनेश गुणे यांची होती. भारतीय संगीतातील विविध रागांचा मानवी शरिराशी संबंध कसा आहे, तसेच मेंदूवर त्यांचा चांगला परिणाम कसा होतो याचे सादरीकरण म्हणजे 'आरोग्य संगीत'. मंगेश वाघमारे, डॉ. केतकी कौजलगी यांनी निवेदनातून संगीतातील आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले. या वेळी गाण्यांसह बासरी व व्हायोलिन या वाद्यांवरील काही गाणी, धून, फ्युजन आणि जुगलबंदीने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात 'भैरवी'ने झाली. मानवाला गंभीर करणारा हा राग. प्रल्हाद जाधव आणि वृंदा कुबेर यांच्या सुरेल गायनाने रागांचा आजारांवर चांगला परिणाम कसा होतो याचा प्रत्यय आला. सकाळच्या प्रसन्न वेळी ऐकला जाणाऱ्या 'अहिर भैरवी'ने पित्त, डायबेटिस, पचन, वातासारख्या आजारांनर नियंत्रण मिळविता येऊ शकते. 'अलबेला साजन आयो रे' हे गाणे सादर करण्यात आले. 'शिवरंजन' रागाने हृदयरोग, रक्तदाबाच्या आजारांवर चांगला परिणाम होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्वचेसह संधीवाताच्या आजारांवर 'मधुवंती' हा राग उपयुक्त ठरतो. सदीर्, खोकला, डोकेदुखीवर उपाय ठरणारा 'बिभास' राग आणि वाताच्या विकारांसह पक्षाघातावर परिणाम साधणारा 'पहाडी' रागही या वेळी सादर करण्यात आला.
सचिन जगताप आणि केदार गुळवणी यांनी अनुक्रमे बासरी आणि व्हायोलिनवर सादर केलेली गाण्यांची धून मनात घर करून गेली.