Print
Hits: 2244

सकाळ
12 June 2012

पाटणा – बिहारमध्ये अज्ञात आजाराने दगावलेल्या बालकांची संख्या 111 झाली आहे. या आजाराचे थैमान रोखण्यात सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय तज्ज्ञांचे पथक राजधानीत दाखल झाले असून, त्यांनी रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याच्या चाचण्यांचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

मुजफ्फरपूरमध्ये 60 हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला आहे, तर पाटण्यात 35 आणि गया येथे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. कटिहार आणि मोतिहारीमध्येही काही मुले दगावल्याचे वृत्त आहे. या भागातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत अद्यापही अनेक मुले भरती होत असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मुलांचे जीव वाचविण्यासाठी सरकारने सर्व ताकद पणाला लावल्याचा दावा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. हा आजार जपानी मेंदूज्वर असल्याचा अंदाज सुरवातीला व्यक्त केला जात होता; पण अनेक चाचण्यांनंतरही त्याची पुष्टी न झाल्याने वाढत्या उष्णतेचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे होते; परंतु या दाव्यालाही अद्याप वैज्ञानिक आधार मिळू शकलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी अज्ञात आजाराने 80 बालकांचा बळी घेतला होता.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.