सकाळ
०३ मे २०१२
जगभर लोकांमध्ये संवाद आणि चर्चेचे माध्यम म्हणून काम करणारी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुक आता अवयवदानाची मोहीम हाती घेणार आहे. या संदर्भात फेसबुकने अनेक देशांसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे फेसबुकवर लोक आता स्वतःच्या अवयवदानाचे रजिस्ट्रेशन करू शकतील. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) विभागाने फेसबुकशी अवयवदानासंदर्भात भागीदारी केली आहे. अवयवदान पुरेशा प्रमाणात होत नसल्याने, ब्रिटनमध्ये दररोज तीन लोकांचा मृत्यू होतो, असे एनएचएसचे म्हणणे आहे.
अवयवदानाची गरज
एकट्या ब्रिटनमध्ये 10 हजार लोकांना कुठल्या ना कुठल्या अवयवांची गरज आहे, तर अमेरिकेमध्ये अवयवांची गरज असणाऱ्या लोकांची संख्या 1 लाख 12 हजारांपेक्षा जास्त आहे आणि जगभरात त्यापेक्षाही जास्त. या मोहिमेमुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग खूपच उत्साहात आहेत.
अमेरिकेमध्ये नुकतेच मिसुरीमध्ये वादळ आले होते. वादळात हरवलेले आपले सामान लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून शोधले आणि एकमेकांपर्यंत पोचवले. जपानमध्येसुद्धा फेसबुकच्या मदतीने लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शोधत आहेत. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या अवयवदानासारख्या आणखी काही समस्या सोडवू शकतो का, याचा मी विचार केला. – मार्क झुकेरबर्ग आता फेसबुकच्या टाइमलाइनवर अवयवदानाची माहिती देता येईल. प्रोफाइलमध्ये याची माहिती असेल.
स्टीव्ह जॉब्जची प्रेरणा
एनएचएसच्या सॅली जॉनसन अवयवदानाच्या मोहिमेतल्या फेसबुकच्या भागीदारीला महत्त्वाचे मानतात. सुरवातीला ब्रिटनसोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅंड्स या देशांसोबत काम सुरू होईल. त्यानंतर या मोहिमेत इतर देशांनाही सामील केले जाईल.
अवयवदानाच्या विचाराची प्रेरणा झुकेरबर्गला ऍपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जच्या मैत्रीतून मिळाली. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने पीडित असलेल्या जॉब्जचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याआधी त्याच्या शरीरात यकृताचे प्रत्यारोपण केले होते.