Print
Hits: 2487

सकाळ
27 जून 2012

पुणे – दृष्टिहीनांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास साह्य करणाऱ्या दि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या टेक्‍निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (टीटीआय) व्होडाफोन सेल्यूलरच्या सहकार्याने कॉलसेंटर सुरू केले आहे. त्याद्वारे 17 दृष्टिहीन तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दृष्टिहीनांमार्फत चालविले जाणारे देशातील हे पहिलेच कॉलसेंटर ठरले आहे.

व्होडाफोनचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इश्‍मित सिंग यांच्या हस्ते या कॉलसेंटरचे नुकतेच उद्‌घाटन झाले. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन पंड्या व टीटीआयचे अध्यक्ष सुधीर साबळे या वेळी उपस्थित होते.

टीटीआयच्या वतीने 17 ते 35 वयोगटातील दृष्टिहीन तरुणांना मोफत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची मान्यता असलेले बेसिक संगणक प्रशिक्षणही त्यांना देण्यात येते. त्याखेरीज होम सायन्स, आहार, विमा विपणन, सेल्समनशिप आदींचे प्रशिक्षणही देण्यात येते.

प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या होतकरू तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठीही संस्था मदत करते. या वेळी तर संस्थेने त्यांच्यासाठी कॉलसेंटरच्या उभारणीची कल्पनाच प्रत्यक्षात आणली. त्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. होमियार मोबेदजी, व्होडाफोन सेल्यूलरचे उपव्यवस्थापक सचिन रामपुरे आणि विशाल शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.