महाराष्ट्र टाइम्स
२४ जानेवारी २०१२
पुणे भारत
– पाणीप्रदूषणाचे कारण विनाविलंब शोधणे शक्य
– बालकांमधील जलजन्य संसर्गांना आळा बसणार
आरोग्य प्रयोगशाळां मधून आतापर्यंत अणुजीवदृष्ट्या पाण्याच्या तपासण्या होत असताना आता पाण्याच्या रासायनिक तपासण्या, पृथ:करणासाठी राज्यभरात तालुक्यांसह ९९ प्रयोगशाळांचे जाळे उभारले जाणार आहे. यामुळे विविध गावातील कोणत्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध की अशुद्ध याचे निष्कर्ष विनाविलंब हाती येऊ शकणार आहेत. तसेच, दूषित पाण्यामुळे बालकांना होणारे संसर्गही टाळणे शक्य होणार आहे.
' राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमधून आतापर्यंत पाण्याची अणुजीवदृष्ट्या तपासणी करण्यात येत होती. रासायनिक तपासण्यांसाठी लागणारे केमिकल्स तसेच उपकरणांअभावी पृथ:करण क रणे अशक्य होते. पाणी पुरवठा विभागाने राज्यातील सर्व गावे, तालुक्यांसह जिल्ह्यांतील पाणी पुरवठ्याच्या स्त्रोतांचे नमुने घेऊन त्याची रासायनिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन याप्रमाणे राज्यात ९९ प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रयोगशाळा अद्ययावत करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात भौगोलिकदृष्टया पाण्याचे विविध नमुने संकलित करणे कोणत्या ठिकाणी शक्य होईल. त्यादृष्टीने प्रयोगशाळांचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामीण हॉस्पिटलमध्येच या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येणार आहेत,' अशी माहिती राज्य आरोग्य प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. आर. सी. वैद्य यांनी 'मटा'ला दिली.
राज्याच्या ग्रामीण भागात विशेषत: बुलढाण्यात खाऱ्या पाण्याचा साठा असल्याने त्यामुळे किडनी स्टोन (मूतखडा) तर चंदपूर जिल्ह्यातील पाण्यात 'फ्लोरेन'चा अंश असल्याने त्यापासून 'फ्लोरोसिस' हा आजार होतो. तर अन्य भागात किडनी, पोटांचे विकार दूषित पाण्यामुळे होत असल्याने याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने शुद्घ पाणी नागरिकांना मिळावे यासाठी पुढाकार घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. परिणामी अशुद्घ पाणी पुरवठा असलेल्या गावांमध्ये पर्यायी व्यवस्था कशी करता येईल यासाठी प्रयोगशाळा फायदेशीर ठरणार आहेत, असेही वैद्य म्हणाले.
इथे होतील पाणी पृथ:करण प्रयोगशाळा
पुणे जिल्हा – इंदापूर, भोर, दौंड, मंचर
सातारा– कराड, फलटण
सांगली – इस्लामपूर, कवठेमहांकाळ, विटा
कोल्हापूर – गडहिंग्लज, कोडोली, राधानगरी
सोलापूर – पंढरपूर, करमाळा, अकलूज
नाशिक – कळवण, मालेगाव, चांदवड, मुरगणा
अहमदनगर – कर्जत, पाथडीर्, श्रीरामपूर, संगमनेर.