सकाळ
03 जुलै 2012
मुंबई – दिवसरात्र होणाऱ्या विविध प्रकारच्या कर्कश्श आवाजाच्या माऱ्यामुळे केवळ कानांनाच इजा होते असे नव्हे; तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. "पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स'तर्फे प्रकाशित झालेल्या ध्वनिप्रदूषणासंदर्भातील शोधनिबंधातील निष्कर्ष असे धक्कादायक आहेत.
बदलती जीवनशैली, आहाराच्या बदलत्या व्याख्या, व्यसनाधीनता यामुळे जगण्याचे "तीन तेरा' झाले असतानाच ध्वनिप्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे या शोधनिबंधात म्हटले आहे. मुंबईतील हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ध्वनिप्रदूषणात सातत्याने होणारी वाढ हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे नानावटी रुग्णालयाच्या "कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी' विभागाचे प्रमुख डॉ. पवनकुमार म्हणतात.
ध्वनिप्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर गेले आहे. वाढत्या गोंगाटामुळे ऐकण्याच्या क्षमतेप्रमाणे संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. ध्वनिप्रदूषणामुळे ताण निर्माण करणारे "कॉर्टिसॉल' आणि "ऍड्रिनलिन' अशा अंतस्रावांत वाढ होते; त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात.
हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा विकार असलेल्या रुग्णांना ध्वनिप्रदूषणाची पातळी 80 डेसिबलवर गेल्यास गंभीर स्वरूपाचा झटका येण्याचा धोका वाढतो. काही रुग्णांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात आणि त्या काम करेनाशा होतात. वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसांना अशा स्वरूपाचे झटके येण्याची शक्यता हृदयविकारतज्ज्ञ व्यक्त करतात.