Print
Hits: 2321

सकाळ
03 जुलै 2012

नवी दिल्ली – माता मृत्युदर कमी करण्याचे सहस्रक विकास उद्दिष्ट (एमडीजी) गाठण्यासाठीची भारताची वाटचाल कूर्मगतीने सुरू आहे. 2015 पर्यंत भारत हे लक्ष्य साध्य करू शकणार नसल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या "मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अहवाल 2012' या अहवालात मांडण्यात आले आहे. भारतात दर दहा मिनिटाला प्रसूतीदरम्यान एका महिलेला प्राण गमवावा लागतो, अशी आकडेवारी अहवालातून पुढे आली आहे.

प्राथमिक शिक्षण, दारिद्य्रनिर्मूलन, माता मृत्युदर, शिशू मृत्युदर आदी आठ "एमडीजी'बाबत जगभरातील देशांच्या कामगिरीचा आढावा या अहवालाद्वारे घेण्यात आला आहे. यात मागास, विकसनशील देशांत गरोदर महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाली असली, तरी प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान समोर आहे. भारतात माता मृत्युदर प्रतिलाख प्रसूतीमागे 212 एवढे आहे. प्रत्यक्षात 2015 पर्यंत हे प्रमाण प्रतिलाख 109 इतके कमी करण्याचे उद्दिष्ट "एमडीजी'अंतर्गत ठरविले आहे. परंतु, 2010 मध्ये तब्बल 57 हजार महिलांचा प्रसूतीदरम्यान प्राण गेला. हे प्रमाण दर दहा मिनिटाला एक मृत्यू असे होते. त्यामुळे माता मृत्युदर कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताला बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या निधी विभागाच्या प्रतिनिधी फ्रेड्रिका मेयर म्हणाल्या, की प्रसूतीच्या वेळी तज्ज्ञ दाई, परिचारिका संबंधित महिलेजवळ उपस्थित असाव्यात, यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रसूतीदरम्यान किंवा गर्भपातानंतरच्या 42 तासांत महिला दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. 2010ची आकडेवारी पाहता भारतात दरदिवशी दीडशे महिला दगावल्या आहेत. या क्षेत्रात भारताच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारतातदेखील या क्षेत्रात चांगले काम झाले असून, 1999 ते 2009 या दहा वर्षांत माता मृत्युदरात 38 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे मेयर यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.