महरास्ट्रा टाईम्स
03 Sept 2012
राज्यातील टीबीचे हॉस्पिटल , त्यातील वॉर्डातील पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टर , परिचारिका ( नर्सेस ) आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी एन – ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे . यामुळे वर्षभर पुरेल एवढा दोन लाख मास्कचा साठा उपलब्ध होणार आहे .
' टीबी ' चे सहसंचालक डॉ . प्रदीप गायकवाड यांनी ही माहिती दिली . ' राज्याच्या आरोग्य खात्याने टीबीवर उपचार करणाऱ्या टीबी वॉर्डासह हॉस्पिटलमधील डॉक्टर , नर्सेस , कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी एन - ९५ प्रकारचे मास्क खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे . दोन लाख मास्कच्या खरेदीचे ऑर्डरही देण्यात आले आहेत . त्यामुळे येत्या काही महिन्यात हे मास्क सर्वांना उपलब्ध होतील ', अशी माहिती डॉ . गायकवाड यांनी दिली .
राज्यात टीबीच्या पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना टीबीची विषाणूच्या संसर्गामुळे लागण होत होती . त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत . त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मास्कचा वापर करण्यात येऊ लागला आहे . मास्क संपल्यानंतर उपचार करण्यात अडचणी येऊ नयेत याची खबरदारी म्हणून आगाऊ दोन लाख मास्कची खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . सरकारी हॉस्पिटल , सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित हॉस्पिटल , डॉट प्लस सेंटरमधील डॉक्टर , कर्मचारी , नर्सेस यांना या मास्कचा उपयोग होणार आहे . मास्कच्या वापरामुळे पेशंट ते डॉक्टरांपर्यंत विषाणूंचा होणारा संसर्ग रोखण्यास आता मदत होणार आहे .