सकाळ
7 June 2012
मुंबई – बीड येथील डॉ. सुदाम मुंडे यांच्या अटकेनंतर राज्य सरकारच्या "आपली मुलगी' या हेल्पलाईनवरील, तसेच संकेतस्थळावरील तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. या तक्रारी नांदेड, बीड, सातारा, नाशिक, जळगाव, तसेच मुंबई व ठाण्यातूनही येत आहेत.
गर्भलिंगनिदान कोठे केले जाते, याची माहिती सामान्य नागरिक दूरध्वनीवरून आणि इंटरनेटच्या माध्यमातून देत आहेत. ही हेल्पलाईन गेल्या वर्षी 11 जुलै रोजी सुरू झाली. आतापर्यंत या हेल्पलाईनवर 195 आणि संकेतस्थळावर 224 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात येतात, पाठपुरावा करण्यात येतो. या तक्रारींची दखल घेऊन, सात सोनोग्राफी यंत्रे सील करण्यात आली. बीड येथील डॉ. मुंडे यांच्याविरुद्ध सर्वांत प्रथम ऑगस्ट 2011 मध्ये हेल्पलाईनवर तक्रार नोंदविण्यात आली होती.
ग्रामीण भागातून येणाऱ्या तक्रारींसोबत आता मुंबई, पुणे व ठाण्यातून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही वाढते आहे. मुंबईत कुर्ला, परळ, विरार, गोरेगाव या ठिकाणांहून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. कोणत्याही सोनोग्राफी केंद्रांवर गर्भलिंगनिदान किंवा बेकायदा गर्भपात केला जात असल्यास 18002334475 या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारकर्त्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.