Print
Hits: 2913

सकाळ .
१० जुलै २०१२

पुणे – क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांवर वेळीच प्रभावी उपचार करण्यासाठी देशातील प्रत्येक रुग्णाला आता "युनिक आयडेंटिफिकेशन नंबर' (यूआयडी) मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला यापूर्वी कोणते उपचार दिले आहेत आणि कोणती औषधे दिली पाहिजेत याची अचूक माहिती कोणत्याही खासगी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टरांना संगणकाच्या एका "क्‍लिक'वर उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 15 जुलैपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

क्षयरोगाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, हे आरोग्य खात्यापुढील मोठे आव्हान ठरले आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये फक्त सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवली जात होती, पण आता खासगी रुग्णालयांमध्ये क्षयरोगाचे औषध घेणाऱ्यांचीही इत्यंभूत माहिती आरोग्य खात्यातील स्थानिक अधिकाऱ्यांना कळविण्याचे बंधन डॉक्‍टरांवर घालण्यात आले आहे. क्षयरोगावर उपचार न करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्या आशयाचे पत्र सरकारी यंत्रणेला देणे सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हे आदेश दिले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक मेजर डॉ. प्रदीप गायकवाड यांनी "सकाळ'ला दिली.

डॉ. गायकवाड म्हणाले, 'लवकर निदान आणि प्रभावी उपचारांमुळे यामुळे क्षयरोग नियंत्रणात आणता येतो. आपल्याकडे फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. सध्याच्या व्यवस्थेत एकाच रुग्णाची वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचा धोका आहे. इतर कोणत्याही रोगांपेक्षा क्षयरोगामध्ये वेळच्या वेळी नियमित औषधे घेतल्यासच त्याचा उपयोग होतो. औषधांचा डोस चुकला तर त्यांचा गंभीर परिणाम रुग्णांवर होतो. काही वेळा अधिक मात्रा असलेली आणि दुष्परिणाम होणारी औषधे घेण्याची वेळ येते. त्यामुळेच रुग्णाचा पूर्ण इतिहास डॉक्‍टरांना समजल्यास त्यापुढे कोणती औषधे द्यायची, ते डॉक्‍टर ठरवू शकतात. त्यामुळे क्षयरुग्णांसाठी ही योजना संजीवनीच ठरणार आहे. तसेच, यापूर्वी दिलेल्या उपचारांची कोणतीही माहिती येथे उपलब्ध नाही. त्यामुळे सुरवातीपासून रुग्णाच्या परत चाचण्या कराव्या लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाला "यूआयडी' क्रमांक मिळतो. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तींच्याही आरोग्याची माहिती यातून मिळते. देशातील कोणत्याही खासगी किंवा सरकारी डॉक्‍टरांकडे क्षयरुग्णांना उपचार मिळतील, अशी व्यवस्था यातून निर्माण करण्यात आली आहे."

'राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यासाठी "डेटा एंट्री ऑपरेटर'च्या जागा भरण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे प्रशिक्षण येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच याची सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल," असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात राज्यातील क्षयरोग
– राज्यातील दरवर्षी नव्याने सापडणारे क्षयरुग्ण – 1 लाख 35 हजार
– विविध औषधांचा परिणाम न होणारे जंतू असणारे क्षयरुग्ण (एमडीआर) – 3 हजार
– नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण – एक लाख लोकसंख्येमागे 123
– नवीन रुग्णांचे अपेक्षित प्रमाण – एक लाख लोकसंख्येमागे 152
– क्षयरोगाच्या रुग्णांचे मृत्यूदर – 3 ते 4 टक्के
– "एमडीआर' रुग्णांचा मृत्यूदर – 15 ते 20 टक्के

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.