पुणे - "कोड हा आजार नाही. यातून फक्त त्वचेचा रंग बदललेला असतो. कोड असलेल्या माणसाला घाबरावे, त्याच्यापासून दूर जावे, असे त्यात काहीही नसते," अशी माहिती अभिनेत्री लालन सारंग यांनी रविवारी येथे दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) पुणे शाखा, "श्वेता' हा स्व–मदत गट आणि त्वचारोगतज्ज्ञ संघटना यांच्यातर्फे जागतिक कोड दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "आयएमए'च्या पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे पाटील, उपाध्यक्षा आणि "श्वेता'च्या प्रमुख डॉ. माया तुळपुळे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विद्याधर सरदेसाई आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन या प्रसंगी उपस्थित होते.
सारंग म्हणाल्या, "कोड झालेली व्यक्ती मनातच त्याची भीती बाळगते. समाजातून या आजाराची भीती काढण्यासाठी सुरवातीला स्वतःच्या मनातून ती काढली पाहिजे."
डॉ. तुळपुळे म्हणाल्या, "इतर गंभीर आजार हे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहिल्यानंतरच समजतात. मात्र, कोड हा न सांगतो दिसतो. हा यातील मुख्य फरक आहे. त्यासाठी कोड असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच याचा स्वीकार केला पाहिजे. नवीन पिढीमध्ये हे स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, समाजाकडून होणारा त्रास कमी झाला आहे, हा एक आशेचा किरण आहे." यानिमित्ताने भारती विद्यापीठातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अविनाश दलाल यांनीही कोडाबद्दलची शास्त्रीय माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मराठे यांनी केले.
सकाळ
21 मे 2012