महाराष्ट्र टाइम्स
२१ मार्च २०१२
कुष्ठरुग्णांमध्ये महाराष्ट्र तिसरा, उत्तर प्रदेश, बिहार आघाडीवर
पुण्याच्या दापोडी, पंढरपूर, कोल्हापूर, नगर व उल्हासनगर या पाच कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत राबविण्यात येणा-या बालविकास केंदाद्वारे मुलांच्या आरोग्य, शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी कृती योजना इंटरनॅशलन लेप्रसी युनियनने तयार केली आहे. कुष्ठरुग्णांच्या पाहणीतून जाहीर झालेली आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप माजी केंदीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी केला.
देशात उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आढळले आहेत. जगाच्या तुलनेत देशात ५५ टक्के रुग्ण असून, एक लाख २६ हजार ८०० एवढे पेशंट आहेत. उत्तर प्रदेश (२५,५००), बिहार (२०,५००) आणि महाराष्ट्रात (१५,५००) एवढी संख्या आहे. नव्यानेच २४४० एवढे पेशंट राज्यात आढळल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु, कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासंदर्भात पंतप्रधानांना भेटून मागण्या करण्यात आल्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले, अशी माहिती माजी केंदीय मंत्री राम नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनचे अध्यक्ष डॉ. शरच्चंद गोखले उपस्थित होते.
' कुष्ठरुग्णांच्या सशक्तीकरणासाठी सामाजिक, आथिर्क पुनर्वसन करणारे सर्वंकष धोरण राबविणे, सोळा देशांतील कायद्यात सुधारणा, रुग्णांचा उदरनिर्वाह भत्ता दोन हजार रुपये करावा, अपंगासह कुष्ठरुग्णांना आर्थिक लाभाची तरतूद करावी, नागरी सुविधा, मुलांना उच्च शिक्षण व शिष्यवृत्त्या, उत्पादित वस्तूंवरील व्हॅट काढणे यासारख्या विविध मागण्या राष्ट्रपतींकडे करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून अद्याप त्यावर कोणतीही भूमिका घेण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रपतींसह केंदीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, केंदीय कायदा मंत्री, सामाजिक न्याय आणि अर्थमंत्र्यांची राज्याचे नेते केंदीय कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळासमवेत पुन्हा भेट घेऊ,' असेही नाईक म्हणाले. राज्यातील पाच ठिकाणी लेप्रसी युनियनने तयार केलेली कृती योजना राबवून कुष्ठपीडितांच्या वस्त्यांमध्ये मानवी हक्काबाबत जागृती केली जाईल. महिला कुष्ठपीडितांना मदत करून त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाईल, असे डॉ. गोखले यांनी सांगितले
' इथेनॉल खरेदीची गरज'
पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर इथेनॉलचा वापर हाच पर्याय असून केंद सरकारने त्याची खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी राम नाईक यांनी केली. केंदाच्या मालकीच्या तेल कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी केल्यास त्यामुळे पेट्रोलचे दर वाढणार नाहीत. पण खरेदी थांबविल्याने दर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.